शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसच्या गांधी कुटुंबाच्या जवळच्या नेत्याच्या हाती ‘तुतारी’
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत असलेले बाजीराव खाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. बाजीराव खाडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. बाजीराव खाडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून देखील काम पाहिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज कोल्हापुरात मेळावा पार पडला. या मेळव्यात कोल्हापुरातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत असलेले बाजीराव खाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. बाजीराव खाडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. बाजीराव खाडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून देखील काम पाहिलं आहे. गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून देखील बाजीराव खाडे यांची ओळख आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरल्याने पक्षाकडून त्यांच्यावर सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर त्यांचं आता राजकीय पुनर्वसन होताना दिसत आहे. त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे.
या मेळव्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी धडाकेबाज भाषण सुद्धा केलं. “पक्षामध्ये मधल्या काही काळात घटना घडल्या. मात्र तुमच्यासारखे निष्ठावंत माझ्यासोबत नेहमी राहिले. आपण काही लोकांना जबाबदारी दिली. तुम्ही देखील त्यांना पाठबळ देऊन मोठं केलं. मात्र ते पक्षाची साथ सोडून गेले. याआधी देखील असा प्रकार पक्षासोबत घडला. मात्र आपण थांबलो नाही. लोकसभा निवडणूक लढवली त्याआधी आपल्याकडे किती खासदार आणि आमदार होते? आपल्या पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं, पक्षातली माणसं गेली, तरी देखील आपण निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं”, असं शरद पवार म्हणाले.
“2019 ला राष्ट्रवादीचे 4 खासदार आणि काँग्रेसचा 1 खासदार होता. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण पाहिलं, दहा जागा आपण लढवल्या त्यातल्या आठ जिंकल्या. सगळं देऊन देखीलही पक्षाशी बांधिलकी न ठेवणाऱ्यांचा निकाल जनतेने घेतला. महाराष्ट्राने सत्ता परिवर्तनाचा निकाल आता घेतला आहे. लोकांचा प्रचंड उत्साह मिळत असल्यामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला आहे”, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.
शरद पवारांचा राज्य सरकारवर घणाघात
“महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा निर्णय अद्याप झाला नाही. मात्र काही झालं तरी आम्ही एकवाक्यता करणार आणि एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार. जनतेबद्दल आस्था नसरणारं हे सरकार आहे. राज्याचा स्वाभिमान नसणारं हे सरकार आहे”, असा घणाघात शरद पवारांनी केला.
“या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार केला, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. दुसरं काहीही सहन करतील, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिष्ठा देशातील नागरिक कधीही सहन करणार नाहीत”, असं शरद पवार म्हणाले. “निवडणूक आता दीड महिन्यावर आहे, पन्नास पंचावन्न दिवसांवर आली आहे. ज्या जागा आपल्या पक्षाला मिळतील तिथे उत्तम उमेदवार देण्याचा प्रयत्न आपला असेल. उद्याच्या काळात राज्यात आपलीच सत्ता येणार आहे हा विश्वास मला आहे”, असा दावा शरद पवारांनी केला.