Konkan Railway : कोकण रेल्वे गाड्या वाढविण्यासाठी करणार ‘पॅच डबलिंग’ ? काय आहे योजना, किती आहे खर्च ?
कोकण रेल्वेने मान्सून-2024 साठी संपूर्ण तयारी केली आहे. एकूण 672 रेल्वे ट्रॅकमन्सची पेट्रोलिंगसाठी तैनाती केली आहे. IMD च्या संपर्कात प्रशासन असून सर्व दक्षता घेतली असून रेल्वे सुरळीत ठेवून प्रवाशांना सेवा देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे.
कोकण रेल्वे महाराष्ट्रात आहे, परंतू कोकण रेल्वेत महाराष्ट्र कुठे दिसत नाही ? अशी टीका नेहमी केली जात असते. कारण कोकणात आपल्या गावात जाण्यासाठी चाकरमान्यांच्या वाटाल्या आलेल्या मोजक्यात गाड्या. कोकण रेल्वेमुळे रेल्वेला दक्षिणेकडे जाण्यासाठी वेळ वाचविणारा मार्ग मिळाला. त्यामुळे या मार्गावर साऊथच्या गाड्या जास्त चालविल्या जात असतात. आणि ज्या कोकणी चाकरमान्यांनी आपल्या लाखमोलाच्या जमीनी कोकण रेल्वेसाठी दिल्या त्यांना कोकण रेल्वेचा फायदा कमी मिळत आहे. कोकण रेल्वेचा मार्गा हा एकेरी असल्याने येथे गाड्या चालविण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे यामार्गाचे दुपदरीकरणाचा प्रस्ताव आला होता. परंतू या मार्गावर नैसर्गिक मर्यादा असल्याने आता ‘पॅच डबलिंग’ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. काय आहे पॅच डबलिंग पाहूयात…
कोकण रेल्वेचा मार्ग रोहा ते ठोकूर दरम्यान 738 किमीचा असून त्यावर 68 स्थानक आणि 4 हाल्ट स्टेशन आहेत. हा मार्ग डोंगरदऱ्यातून जाणारा आणि सह्याद्री पर्वत रांगाचा कातळ कापून तयार करण्यात आला आहे. यामार्गात 91 बोगदे खणण्यात आले आहेत. सर्वात मोठा बोगदा रत्नागिरीतील करबुडे हा आहे. याची लांबी साडे सहा किलोमीटरचा आहे. तर 179 मोठे पुल आहेत तर 879 छोटे पुल बांधले आहेत. या मार्ग संपूर्ण एकेरी बांधलेला आहे. त्यामुळे येथे ट्रेन वाढविण्यावर खूपत मर्यादा आहेत. अनेक वेळा मागच्या सुपरफास्ट ट्रेनला जागा देण्यासाठी चाकरमान्यांच्या ट्रेन सायडींगला लूप लाईनवर टाकल्या जातात. हा मार्ग दुपदरी झाल्यास अशा अडचणी येणार नाहीत. गाड्यांचा क्षमता जवळपास दुप्पट होईल. परंतू यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने जेथे शक्य आहे तेथे या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करुन टाकले आहे. तर विद्युतीकरणासाठी एकूण 1,287 कोटी रुपये खर्च केले केल्याने वार्षिक 150 कोटी रुपयांहून अधिक इंधन बचत होत आहे.
350 किमीच्या पट्ट्यात पॅच डबलिंग
कोकण रेल्वेवर सध्या 52 एक्सप्रेस आणि 18 मालगाड्या धावत आहेत. रोहा ते वीर या स्थानकांदरम्यान 50 किलोमीटरचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. जेथे प्लेन टेरिटरी आहे तेथेच दुपदरीकरण शक्य आहे. डोंगरात दोन मार्गासाठी आणखी एक दुसरा बोगदा खणणे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अशक्य असे नाही. परंतू यासाठी प्रचंड खर्च आहे. सपाट भागात मार्गाला दर किमी मागे 15 ते 20 कोटी तर डोंगराळ भागात दर किमीला 80 ते 100 कोटी इतका दुपदरी करणाचा खर्च आहे. जवळपास नव्याने कोकण रेल्वे बांधण्यासारखाच हा खर्च येणार आहे. म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर पॅचेसच्या स्वरुपात दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सपाट आणि बोगदे नसलेल्या अशा 350 किमी मार्गापैकी काही पॅचेसवर दुपदरीकरण करण्याची योजना आहे. त्याचा प्रस्ताव प्राथमिक पातळीवर असल्याचे कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी टीव्ही 9 मराठी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.