Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, एकनाथ शिंदेंकडून मोठी अपडेट
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत आता एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण सात हाफ्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. तसेच आता फेब्रुवारीचा हाफ्ता वितरणाला देखील सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हाच, या योजनेसाठी काही निकष तयार करण्यात आले होते.
मात्र ज्या महिला या निकषात बसत नाहीत अशा महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केले. या योजनेचा लाभ देखील घेतला. मात्र जेव्हा ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली तेव्हा अशा महिलांना ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांचं नाव वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आतापर्यंत पाच लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तसेच ही योजना बंद पडणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली. यावर बोलताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे. ते गोंदियात बोलत होते.
विरोधकांवर निशाणा
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. तुमच्या आशीर्वादानं 232 जागा निवडून आल्या, पायाला भिंगरी लावून मी महाराष्ट्र फिरलो. साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांचा निधी आपण एकट्या भंडारा विधानसभा मतदारसंघाला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजी आप महान हो, असं म्हटलं तरी लोकांच्या पोटात दुखत, एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो, तरी यांच्या पोटात दुखत. आधे इधर आधे उधर, मागे कोणीच नाही अशी यांची परिस्थिती झाल्याचा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.