पावसाच्या पाण्यात खेळत होता, चप्पल नाल्यात पडली म्हणून काढायला गेला अन् घात झाला !
मित्रांसोबत पावसाच्या पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद चिमुकला लुटत होता. पण इतक्यात रस्त्याशेजारील नाल्यात चप्पल पडली अन् इथेच घात झाला.
अकोला, दिनांक 13 जुलै 2023 : पावसाळा म्हटलं सर्वांचाच जिव्ह्याळ्याचा ऋतू. पावसात भिजणं, फिरायला जाणं हा तर तरुणाचा आवडता कार्यक्रम. पण बच्चे कंपनीही यात मागे नाही. बच्चे कंपनीही आपल्या परीने मनसोक्त पावसाचा आनंद लुटते. रस्त्यावर साचलेले पाणी किंवा पाण्याने भरलेल्या डबक्या उड्या मारणं हा तर बच्चे कंपनीचा पावसाळ्यातील आवडता छंद आहे. पण हा छंद कधी कधी जीवावर बेतू शकतो हे सिद्ध करणारी एक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. मित्रांसोबत पावसाच्या पाण्यात खेळत असताना नाल्यात तोल जाऊन 10 वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना अकोला शहरात घडली आहे. रात्रभर शोध घेतल्यानंतर सकाळी मुलाचा मृतदेह हाती लागला.
चप्पल काढायला वाकला अन् तोल गेला
सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचतंय. याच पाण्यात उड्या मारत चिमुकली मंडळी खेळत होती. यावेळी 10 वर्षाच्या बालकाची रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात चप्पल पडली. मुलगा आपली चप्पल काढायला खाली वाकला. मात्र यावेळी त्याचा तोल गेला आणि तो नाल्यात पडला. पावसामुळे नाल्यात पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने मुलगा वाहून गेला.
सकाळी मृतदेह सापडला
मुलगा वाहून गेल्याचे कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेत मुलाचा शोध सुरु केला. रात्रभर मुलाचा शोध सुरु होता. मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. अखेर आज सकाळी अकोट रोडवरील पाचमोरी जवळ मृतदेह सापडला. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. नदी-नाल्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाण्यापासून मुलांना रोखा आणि सावधगिरी बाळगा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडतात.