‘राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार तुम्ही….’, बंदच्या ट्वीटवर वकील गुणरत्न सदावर्तेंचा निशाणा
उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ एक दिवस महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं. पण त्यांच्या आवाहनानंतर वकील गुणरत्न सदावर्ते आणि वकील जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. या कोर्टाने ठाकरेंनी पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे. त्यामुळे तसं झाल्यास संबंधितांवर कारवाई करा, असे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला बंदचा अधिकार नाही, असंही मुंबई हायकोर्ट म्हटलं आहे. मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई हायकोर्टाने बंदबाबत दिलेल्या निर्णयानंतर शरद पवार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या ट्विटबाबत गुणरत्न सदावर्ते यांनाप्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “माझा शरद पवारांना प्रतिप्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार तुम्ही काय ट्विट केलं आहे की, उच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणून म्हणजे तुम्ही बेकायदेशीर बंदचं समर्थन करता आणि म्हणता आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जायला वेळ मिळाला नाही म्हणून तुम्ही बंद मागे घेण्याचं आवाहन करत आहात. या लबाड गोष्टी आहेत. ही संविधानाची शक्ती आहे. शरद पवारांना त्यापुढे जाता आलेलं नाही”, असं सदावर्ते म्हणाले.
कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
“मुंबई उच्च न्यायालयात वकील जयश्री पाटील आणि आम्ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर, सर्व बाजू पाहून आज बंद असतो तो असंविधानिक असतो, बंद करता येत नाही. राजकीय पक्षांना बंद करता येत नाही. संघटनांना बंद करता येत नाही. तक्रारीत स्पष्ट लिहिलेलं होतं. लहान मुलांपासून मजूर, टॅक्सी ड्रायव्हर यांना बंदचा फटका बसू शकतो. अशा प्रत्येक गोष्टीला आम्ही अत्यंत सुक्ष्मपणे आज न्यायालयासमोर ठेवलं म्हणून न्यायालयाने संविधानाच्या अख्यात्यारित निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार बंद पुकारता येणार नाही, बंद पुकारणं हे बेकायदेशीर आहे, असं म्हणत बंद पुकारणाऱ्या सगळ्या संघटनांना न्यायालायने नोटीस बजावली आहे”, अशी माहिती गुणरत्व सदावर्ते यांनी दिली.
“मी बी. जी. देशमुखांची जजमेंट वाचून दाखवली. आम्ही प्रत्येक पॅराग्राफबद्दल माहिती दिली. बंदच्या बाबत काय रचना आहे ते मी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. नोटीस कधी द्यायची, ऐकत नसतील तर अटक कशी करायची, त्याचबरोबर या सर्व बेकायदेशीर गोष्टींना पायबंद कशा करायच्या याबाबत जजमेंटमध्ये सविस्तर दिलं आहे. त्याच जजमेंटच्या आधाराव आम्ही भूमिका मांडली”, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.