‘खोक्या तर हिमनगाचे टोक…’; सतीश भोसले प्रकरणात लक्ष्मण हाकेंचे खळबळजनक आरोप
सतीश भोसले उर्फ खोक्या याने काही दिवसांपूर्वी एका कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली होती. या घटनेत वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान आता या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हं आहेत.

सतीश भोसले उर्फ खोक्या याने काही दिवसांपूर्वी एका कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली होती. या घटनेत वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान आता या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हं आहेत. आज शिरूरमधील ग्रामस्थांनी शिरूर बंदची हाक दिली आहे. मात्र अजूनही खोक्या पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. दरम्यान आता या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके?
मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, खोक्या भोसले हा हिमनगाचे टोक आहे. जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत आकाची व्याप्ती महाराष्ट्राला समजणार नाही. तो सुरेश धस यांच्यासाठी काम करतो, असं इथल्या जनतेचे मत आहे, याची निपक्षपाती चौकशी करावी आणि या माणसावर गुन्हे दाखल करावेत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वन विभाग नक्की काय करत आहे, मेंढपाळाच्या चार मेंढ्या वनात गेल्या तर त्याला सोलून काढणार. मात्र इथे 200 हरणं मारली गेली, ते कोण बघणार. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. तिथल्या माणसांनी मला सांगितलं, हरीण मारलं की हरणाचा एक डब्बा तयार करून आमदार सुरेश धस यांच्या घरी हा डबा जातो, असंही यावेळी लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
या भागामध्ये कालिकादेवी महाविद्यालयात आहे, या विद्यालयात शिक्षकांसमोर तिसरी चौथी पास झालेला हा गुन्हेगार, खोक्या भोसलेचं भाषण महाविद्यालयातील प्राचार्यांनी ठेवलं होतं. आणि तिथे या खोक्याने लहान मुलांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यामुळे तिथल्या शिक्षकांवर आणि प्राचार्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची गृहविभागाला विनंती आहे. आज मोर्चात सहभागी झालेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो, या आरोपीला कडक शासन झाल पाहिजे, अशी मागणी यावेळी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.