महाराष्ट्रात जर हरियाणा पॅटर्न लागू करायचा असेल तर…, लक्ष्मण हाकेंनी फडणवीसांना काय दिला सल्ला?
लक्ष्मण हाके हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत, मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यावर टीका करतानाच त्यांनी हरियाणा पॅटर्नबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
हरियाणामध्ये काँग्रेस विजयी होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना राज्यात पक्षाला मोठा फटका बसला. दुसरीकडे मात्र भाजपनं जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. याबाबत बोलताना आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हरियाणा पॅटर्न जर महाराष्ट्रात आणायचा असेल तर त्या पक्षांनी जास्तीत जास्त ओबीसींना संधी दिली पाहिजे. ओबीसींच्या प्रश्नावर बोलावे “जो ओबीसी की बात करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा” असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला देखील मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही जरांगे पाटील ठाम आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेत उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबत येत्या वीस ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील मोठी घोषणा करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटलांनी लोकसभेला ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे काम केले त्याच पद्धतीने विधानसभेला देखील करणार आहेत. जरांगे पाटील आमदार पाडायचं काम करू शकतील मात्र उभे करण्याचे काम करू शकणार नाहीत असं हाके यांनी म्हटलं आहे.
हाके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. ‘पवार साहेबांनी दाऊद इब्राहिम बरोबर प्रवास केलेल्या घटनेपेक्षा ओबीसीचं अठरा प्रकट जातीच प्रतिनिधित्व डावलण्याचं त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये न आणण्याचं त्यांच्यावर अन्याय करण्याचं मोठं काम पवारांनी केलं. त्यामुळे कसायापेक्षा कलम कसाई वाईटच, त्यामुळे शरद पवार हे दाऊद बरोबर फिरले काय आणि नाही फिरले काय, मात्र त्यांनी आमच्या गाव गड्यातील माणसांच्या घरावर नांगर फिरवलाय,’ असा घणाघातही यावेळी हाके यांनी केला आहे.