राणे यांना बाळासाहेब ठाकरे का म्हणाले होते वाघ?; राज ठाकरे यांनी सांगितलेला किस्सा काय?
मी सरळ चालणारा माणूस आहे. माता भगिनींनी कानात बोटं घालावीत. मध्ये मध्ये आमच्यातील ठाकरे जागा होतो... जनेटिकली प्रॉब्लेम आहे. बैल जसा मुततो तसा मी विचार नाही करत. एखादी गोष्ट पटली तर पटली. नाही पटली तर शेवटपर्यंत नाही पटणार.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी तळकोकणात सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नारायण राणे यांचं प्रचंड कौतुक केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना त्यांच्या कामाचा आवाका पाहून वाघ म्हटल्याचा किस्साही राज ठाकरे यांनी सांगितला. तसेच नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाचा अत्यंत कमी अवधी मिळाला. अवघे सहा महिनेच त्यांना मिळाले. त्यांना पाच वर्ष मिळाले असती तर आज मला या ठिकाणी सभा घ्यायलाही यायची गरज पडली नसती, असं राज ठाकरे म्हणाले.
नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाचा फार कमी वेळ मिळाला. फक्त सहा महिने मिळाले. पाच वर्ष मिळाले असती तर इथे प्रचाराला यायची कुणाला गरज पडली नसती. राणे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बाळासाहेबांसोबत चर्चा व्हायची. तेव्हा ते म्हणायचे, अंतुले नंतर कामाचा वाघ फक्त राणेच. राणेंच्या कामाचा सपाटा आणि आवाका मोठा आहे. त्यांनी माझं कौतुक केलं, म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद हाकललंय, ते भल्याभल्यांनाही जमलं नसेल, असं सांगतानाच तुम्हाला काम करणारा माणूस खासदार हवाय की नुसता बाकावर बसणारा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
दीड तास सभागृह चिडीचूप
नारायण राणे विरोधी पक्षनेते असतानाचा एक किस्साही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितला. राणे तुम्ही ही गोष्ट विसरला असाल. आमचे अनिल शिदोरे हे अभय बंग यांना घेऊन नारायण रावांकडे गेले. नारायणराव विरोधी पक्षनेते होते. सभागृह सुरु होते. बालमृत्यू आणि कुपोषणाबाबत बोलायला बंग गेले होते. नारायण रावांनी त्यांचं ऐकायला सुरुवात केली. बालमृत्यू आणि कुपोषित बालकं हा विषय नारायण रावांना अभय बंग सांगत होते.
दुसऱ्या दिवशी नारायण राणे यांनी सभागृहात जाऊन या विषयावर जे भाषण केलं, ते ऐकून स्वत: अभय बंग थक्क झाले होते. दुसऱ्या दिवशी अभय बंग म्हणाले, मी त्यांचं भाषण ऐकलं तेव्हा वाटलं हे आपल्या संस्थेचे सदस्य आहेत की काय. बालमृत्यू आणि कुपोषण या विषयावर मी त्यांच्याशी फक्त 15 मिनिटं बोललो होतो. त्यांनी मात्र दीड तास मुद्देसूद भाषण केलं. त्यांच्या भाषणावेळी सभागृही चिडीचूप झालं होतं. एखादा विषय कसा हाताळावा. कसं बोलावं हे ज्याला माहीत आहे, तो माणूस आज खासदारकीसाठी तुमच्यासमोर बसलेला आहे. नुसताच बाकड्यावर बसणारा खासदार पाहिजे की केंद्रात मंत्री बनलेला खासदार बसलेला पाहिजे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
मी सरळ चालणारा माणूस
यावेळी ठरवलं होतं कुणाला मुलाखती द्यायच्या नाहीत. विधानसभेला मुलाखती देणार. त्यामुळे कोणी पत्रकार आले नाही. भाजपला पाठिंबा दिल्यानंतरची ही पहिली जाहीर सभा. पाठिंबा का दिला. हे मी गुढीपाडव्याच्या सभेत सांगितलं होतं. मी सरळ चालणारा माणूस आहे. माता भगिनींनी कानात बोटं घालावीत. मध्ये मध्ये आमच्यातील ठाकरे जागा होतो… जनेटिकली प्रॉब्लेम आहे. बैल जसा मुततो तसा मी विचार नाही करत. एखादी गोष्ट पटली तर पटली. नाही पटली तर शेवटपर्यंत नाही पटणार. 2014 ते 2019 दरम्यान ज्या काही गोष्टी झाल्या. केंद्राने केल्या. मोदींनी केल्या. त्या नाही पटल्या. मोदींच्या काही गोष्टी आजही पटत नाही. ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्याला 2019च्या सभेत जाहीर विरोध केला. ज्या पटल्या त्याचं स्वागत केलं, असं राज ठाकरे म्हणाले.