मुख्यमंत्र्यांचे मनधरणीचे प्रयत्न, पण तरीही भाजपच्या माजी आमदार नाराज, महायुतीत नेमकं काय सुरु?
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपमधील नाराजी समोर येत आहे. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे नाराज आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 5 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर त्यानंतर आज 8 जागांसाठी मतदान पार पडलं. दोन्ही मिळून महाराष्ट्रात एकूण 13 जागांसाठी मतदान पार पडलं. महाराष्ट्रात अजून तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्यामुळे आणखी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडायच्या बाकी आहेत. विशेष म्हणजे शिर्डीत महायुतीत चांगलंच नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. अहमदनगरमध्ये महायुतीत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं चांगलं वर्चस्व आहे. पण त्यांच्यावरच भाजपच्या माजी आमदारांनी आरोप केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या विखे पाटलांवर नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्नेहलता पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांनी प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. पण त्यांना त्यांची मनधरणी करण्यात यश आलं नसल्याची माहिती समोर येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भाजप नेत्या कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे अजूनही युतीच्या प्रचारात सक्रिय झालेल्या नाहित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो आपण मान्य करणार असल्याचं स्नेहलता कोल्हे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही स्नेहलता यांचं समाधान नाही
कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केलीय. गेल्या काही दिवसांपासून विखे आणि कोल्हे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. आपल्यावर पालकमंत्री विखे पाटील जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याची भावना कोल्हे कुटूंबाची आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिर्डीत आलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेलाही कोल्हे अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यांचे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही समाधान झाले नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे.
काँग्रेसमध्येही नाराजीनाट्य
विशेष म्हणजे फक्त भाजपात नाही. तर काँग्रेसमध्येही नाराजीनाट्य सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते नसीन खान यांनी स्टार प्रचार यादीतून राजीनामा दिला आहे. नसीम खान या मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण आता वर्षा गायकवाड यांना संबंधित मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नसीम खान नाराज आहेत. याच नाराजीतून त्यांनी पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून राजीनामा दिला आहे.