सुनेविरुद्ध सासरा थेट मैदानात, एकनाथ खडसेंनी रक्षा खडसेंचा पराभव करण्यासाठी कंबर कसली
lok sabha election 2024 eknath khadse raksha khadse: छळ झाला...सगळं झालं मात्र मी ठाम राहिलो. माझा पक्ष आणि मी आहे तुम्हाला काय करायचे ते करा, अशी आपली भूमिका राहिली. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला कोणी सांगण्याची गरज नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
किशोर पाटील, जळगाव | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान आता जवळ आले आहे. या निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात विद्यामान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. या जागेसाठी एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु सासरा विरुद्ध सून किंवा नणंद-भावजय लढत टाळण्याचा एकनाथ खडसे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. यामुळे खडसे यांना विचारले असता त्यांनी रोखठोक मत मांडले. माझी सून रक्षा खडसे हिला भाजपने उमेदवारी दिली असली तरी रावेर लोकसभा मतदार संघात तुतारीच वाजवणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुतारीच कशी विजय होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांना टोला
जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारात नव्हतं त्या काळात मी एकटा लढलो. संघर्ष केला आणि भाजप वाढवली, असा टोला एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना नाव न घेता लगावला. मी संघर्ष करताना कधी खचलेलो नाही. कधी पळालो नाही. कधी विकलो नाही. सत्तेसाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेलो नाही. लाचार होवून कधी पाया पडलो नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे.
छळ झाला…पण मी ठाम राहिलो
छळ झाला…सगळं झालं मात्र मी ठाम राहिलो. माझा पक्ष आणि मी आहे तुम्हाला काय करायचे ते करा, अशी आपली भूमिका राहिली. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला कोणी सांगण्याची गरज नाही. रक्षा खडसे जरी उमेदवार दिली तरी रावेर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारीच वाजवणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुतारीच कशी विजय होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीस नकार दिल्याने होत असलेल्या आरोपांवर उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले.
रोहिणी विधानसभा लढवणार
रोहिणी खडसे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले. समोर कोणीही असो मी निवडणुकींना घाबरणारा माणूस नाही. आजपर्यंत मी घाबरलेलो नाही. निवडून आलेलो आहे, असे खडसे यांनी म्हणत रक्षा खडसे यांना आव्हान दिले.