शिंदे सेनेच्या हातून दुसरा मतदार संघही गेला…भाजपने मारली बाजी
sindhudurg ratnagiri Lok Sabha Election 2024: आता आम्ही सर्व नारायण राणे यांच्या पाठिशी आहोत. पण किरण सामंत खासदार होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही माघार घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील जागा वाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सात ते आठ जागांवर वाद आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा १९ एप्रिल शेवटचा दिवस होता. त्यापूर्वी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरील भाजप-शिवसेनेतील वाद मिटला आहे. या ठिकाणी शिवसेनेकडून एक पाऊल मागे घेण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतली. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातून दुसरा मतदार संघ गेला आहे. यापूर्वी अमरावतीची शिवसेनेची असलेल्या जागेवरही भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
उदय सामंत म्हणतात, भविष्यात किरण सामंत खासदार होणार
किरण सामंत यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करताना उदय सामंत यांनी भविष्यात किरण सामंत खासदार होणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही काही काळ थांबणार आहोत. भविष्यात किरण सामंतच खासदार असणार आहेत. आता आम्ही सर्व नारायण राणे यांच्या पाठिशी आहोत. महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही माघार घेतली आहे.
शिवसेनेसाठी महत्वाचा होता मतदार संघ
शिवसेनेसाठी कोकण महत्वाचा होता. यामुळे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा आग्रह उदय सामंत यांनी लावून धरला होता. त्या ठिकाणी त्यांचे बंधू किरण सामंत यांनी निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केली होती. दुसरीकडे नारायण राणे यांनीही प्रचार सुरु केला होता. नाव जाहीर नसताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. नारायण राणे यांचा प्रचाराचा पहिला टप्पा संपला होता.
उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच अमित शाह यांच्या सभेचे नियोजन
नारायण राणे यांच्या उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच रत्नागिरीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले. त्यांच्यासाठी रत्नागिरीतील मैदान निश्चित करण्यात आले. गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित करण्यात आली. या ठिकाणी आता शहांच्या सभेसाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. २४ एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे.