लोकसभा निवडणूक 2024 : ठाणे आणि कल्याण मतदारसंघात उमेदवारीचा सस्पेंस वाढला
कल्याण आणि ठाणे लोकसभा निवडणुकीत यंदा सस्पेंस वाढला आहे. कारण या दोन्ही जागेवर अजून शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे अशी चर्चा आहे की कल्याण मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवू शकतो. तर श्रीकांत शिंदे हे ठाण्यातून निवडणूक लढवू शकतात.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने गुरुवारी आठ उमेदवारांची घोषणा केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना राज्यात 12 ते 13 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. गुरुवारी आठ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली तेव्हा कल्याण आणि ठाणे मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार? त्याची घोषणा झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. सध्या ते कल्याण मतदारसंघातून खासदार आहेत. पण त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण लोकसभेतून उमेदवार कोण?
शिवसेनेने पहिल्या यादीत एकूण आठ उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेने एका खासदाराचे तिकीट कापले आहे. रामटेकमधून विजयी झालेले कृपाल तुमाने यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली नाही. इतर सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. रामटेकमधून शिवसेनेने राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 5 जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी चार जागा राखीव आहेत. 2008 पूर्वी राखीव जागांची संख्या 7 होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन वेगवेगळे गट पडले आहेत. फूट पडल्यानंतर पक्षाचे १३ हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर उर्वरित खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.
कल्याणमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सुधीर वंडारशेठ पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुधीर पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गटाचे ) ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत. पण त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून उमेदवारी मिळू शकते. महायुतीकडून जर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर या दोन नेत्यांमध्ये थेट लढत होऊ शकते.
श्रीकांत शिंदे ठाण्यातून लढणार?
दुसरीकडे अशी देखील चर्चा आहे की, श्रीकांत शिंदे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जावू शकते. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद आहे. याचा फटका श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत बसू शकतो अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे ठाण्याची जागा शिवसेना शिंदे गट तर कल्याणची जागा भाजपकडे जाऊ शकते.
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. ज्या पैकी उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील हे आमदार आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आमदार म्हणून निवडून आले आहेत. अंबरनाथमध्ये फक्त शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर आमदार आहेत.
भाजपची ताकद पाहता आणि भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना होत असलेला विरोध पाहता श्रीकांत शिंदे ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक आहे.
ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे हे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवू शकतात. श्रीकांत शिंदे जर कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवली तर प्रताप सरनाईक हे ठाण्यातून निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोण लढणार याबाबत सस्पेंस वाढला आहे.