लोकसभा निवडणुकीत मराठा समाज गावागावातून उमेदवारी देणार का? मनोज जरांगे यांनी सांगितला निर्णय
मराठ्यांनी कोणत्याही प्रचार सभेला जायचे नाही. त्यासाठी तुम्हाला येथून गावात जावे लागणार आणि गावात जाऊन बैठक घ्यावी लागणार आहे. मराठ्यांची शक्ती राज्याला आणि देशाला दाखवायची आहे. उमेदवार देताना कोणत्या जातीचा उमेदवार द्यायचा हे ठरवायचे आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आरक्षणावरुन आक्रमक होणार आहे. यासाठी गावागावात रणनीती तयार केली जात आहे. मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. हजारापेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दाखल करुन ईव्हीएम प्रक्रिया अडचणीत आणण्याची रणनीती मराठा समाजाच्या बैठकीत घेतली जात आहे. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी वेगळी भूमिका जाहीर केली आहे. रविवारी अंतरवली सराटीत झालेल्या समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले तर आपणच अडचणीत येऊ शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा, मला राजकारणात ओढू नका. आपला प्रश्न लोकसभेचा नाही तर विधानसभेचा आहे. लोकसभा निवडणुकीत मोठया प्रमाणात फॉर्म भरणे किचकट प्रक्रिया आहे. यामुळे एकच उमेदवार द्या. तसेच तुम्हाला गावात बैठक घ्यायची असेल तर त्याची नोंद ठेवा आणि हे 30 मार्चच्या आता निर्णय घ्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
आचारसंहिता संपल्यावर पाहू…
बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता तुम्ही ठरवले आहे, प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे, हे मी नाही ठरवले नाही. मी तुम्हाला दोन पर्याय सुचवतो. मराठा समाजाला मी सात महिन्यांत पराभूत होऊ दिले नाही. लोकसभेचा विषय समुद्रासारखा आहे. आपला विषय लोकसभेतील नाही तर विधानसभेतील आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत हा विषय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा आहे. मराठा आणि कुणबी असल्याचा आधार मिळाला आहे, आता सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, ही मागणी आहे. आचारसंहिता संपल्यावर जर सरकारने आदेश काढला नाही तर त्यावेळी बघू.
मराठ्यांचे 17 ते 18 मतदारसंघावर वर्चस्व
मराठा समाजाचे 17 ते 18 मतदारसंघावर वर्चस्व आहे. मराठ्यांनी निर्णय घेतला तर मुस्लीम आणि दलित आपल्या सोबत आहेत. यामुळे आपण लोकसभेत एकच उमेदवार द्या आणि अपक्ष द्या. दुसरा पर्याय म्हणजे आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्याकडून बॉण्ड लिहून घ्यायचा तू सग्या सोयऱ्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उचलणार का..?
प्रचार सभांना जाऊ नका
मराठ्यांनी कोणत्याही प्रचार सभेला जायचे नाही. त्यासाठी तुम्हाला येथून गावात जावे लागणार आणि गावात जाऊन बैठक घ्यावी लागणार आहे. मराठ्यांची शक्ती राज्याला आणि देशाला दाखवायची आहे. उमेदवार देताना कोणत्या जातीचा उमेदवार द्यायचा हे ठरवायचे आहे. मराठ्यांनी अपक्ष लढवायचा निर्णय घेतला तर चार जाती एकत्र आले पाहिजे. राज्यकर्त्यांना यांना हिसका दाखवायचा असेल तर लोकसभा नाही तर विधानसभा महत्त्वाची आहे. आपली मते विखुरली जाऊ नये.