अवघडंय…. रायगडमध्ये दोन सुनील तटकरे, तीन अनंत गीते आमने सामने; डोकेदुखी वाढली
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच उमेदवारांनी विजयासाठी जीवाचं रान केलं आहे. रणरणत्या उन्हात प्रचार सुरू आहे. पण रायगडमध्ये मात्र वेगळ्याच कारणाने ठाकरे गट आणि अजितदादा गटाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे या दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
नाम में क्या रखा है… अर्थात नावात काय आहे? असं थोर नाटककार शेक्सपियर यांनी म्हटलंय. काहींसाठी नावात काही नसेल. पण काहींसाठी नावातच सर्व काही आहे. नावात काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना विचारा, तेच सांगतील. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरतो आणि त्याच्यामुळे अवघ्या हजार बाराशे मतांनी जेव्हा पराभव होतो, तेव्हा नावात काय आहे? हे कळतं. आता तुम्ही म्हणाल आता हा विषय काढण्याचं कारण काय? तर कारणही तसंच आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिंकण्यासाठी सर्वच उमेदवारांनी जीवाचा आटापिटा सुरू केला आहे. पण रायगडमध्ये तीन अनंत गीते आणि दोन सुनील तटकरे मैदानात उतरल्याने पक्षाच्या चिन्हावर लढणाऱ्या अनंत गीते आणि सुनील तटकरे यांची चांगलीच गोची झाली आहे.
रायगडमध्येही सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. आरोपप्रत्यारोपाने रायगडची भूमी तापली आहे. ठाकरे गटाने अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांना मैदानात उतरवलं आहे. दोन्ही मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने रायगडमध्ये टफ फाईट होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही नेत्यांनी विजयासाठीचं प्लानिंग केलंय. विजय निश्चित करण्यासाठी कंबर कसली आहे. पण हे सर्व सुरू असताना माशी शिंकलीय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
तटकरे, गीतेंना टेन्शन
या दोन्ही नेत्यांच्या विरोधात त्यांच्याच नावाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गंगाराम गीते मैदानात असताना अनंत पद्मा गीते या अपक्ष उमेदवारानेही अर्ज भरला आहे. हे कमी की काय अनंत बाळोजी गीते नावाच्या दुसऱ्या उमेदवारानेही उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे दोन दोन अनंत गीते मैदानात उतरल्याने ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची डोकेदुखी वाढली आहे.
बरं रायगडमध्ये एकट्या अनंत गीते यांचीच डोकेदुखी वाढलेली नाही. तर सुनील तटकरे यांचीही डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीचे सुनील दत्तात्रय तटकरे यांच्या विरोधात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या सुनील दत्ताराम तटकरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनाही टेन्शन आलं आहे.
फक्त दोन हजारांनी पराभव
तुम्ही म्हणाल, नाम साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरला म्हणून काय झालं? जे नेते प्रसिद्ध आहेत, ते तर सर्वांना माहीत आहेच ना. सेम नाव असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढवली तर असा कितीसा फरक पडणार आहे? तुम्हाला जर असं वाटत असेल तर जरा 2014च्या निवडणुकीवरही नजर मारा. म्हणजे तुम्हाला कळेल सेम नाव असलेल्या व्यक्तीमुळे काय आणि कसा फरक पडतो? 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे उभे होते. या निवडणुकीत त्यांचा अवघ्या 2 हजार मतांनी पराभव झाला होता. याच निवडणुकीत सुनील तटकरे नावाचा अपक्ष उमेदवार उभा होता. त्याला 9 हजार 849 मते मिळाली होती. नाम साधर्म्यामुळे अपक्ष उमेदवाराकडे मते वळल्याने सुनील तटकरे यांचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं.
1991 मध्ये काय घडलं?
असाच एक प्रकार 1991मध्ये घडला होता. 1991च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप उमेदवार दत्ता पाटील यांच्याविरोधात काँग्रेसने दत्ता पाटील नावाचा उमेदवार दिला होता. दोन्ही उमेदवारांचे नाव सारखेच होते. दोन्ही उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढत होते. पण या नामसाधर्म्यामुळे त्याचा फटका शेकापच्या दत्ता पाटलांना बसला होता. आता येत्या 7 मे रोजी रायगडसाठी मतदान होत आहे. 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. त्यामुळे या सारखे नाव असलेल्या उमेदवारांची समजूत काढण्यात अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना यश येतं का हे पहावं लागणार आहे.