Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रातील बारामती, सिंधुदुर्गसह 11 मतदार संघात आज मतदान, अशा रंगणार लढती
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 94 जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जागा आहेत. तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून एकूण 1,351 उमेदवार नशिब आजमाविणार आहेत.
देशभरात लोकसभेच्या निवडणुकांनी राजकारण चांगलेच तापले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जागा आहेत. महत्वाच्या लक्षवेधी लढतीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून एकूण 1,351 उमेदवार नशिब आजमाविणार आहेत. महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांतून 519 उमेदवारी अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
राज्यात अशा लढती रंगणार
बारामती लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातच ही लढत होत आहे. नणंद आणि भावजय असा फॅमिली ड्रामा यावेळी चुरशीचा होणार आहे. सुप्रिया सुळे ( शरद पवार ) विरुद्ध सुनेत्रा पवार ( राष्ट्रवादी अजित पवार ) अशी ही लढत आहे. सांगलीमध्ये संजयकाका पाटील ( भाजपा ) – चंद्राहार पाटील ( ठाकरे) – विशाल पाटील ( अपक्ष ) असा तिरंगी सामना रंगणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात विनायक राऊत ( ठाकरे ) विरुद्ध नारायण राणे ( भाजपा ) यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. कोल्हापूरमधून शाहु महाराज ( कॉंग्रेस ) विरुद्ध संजय मंडलिक ( भाजपा ) असा सामना होईल. तर हातकणंगले मतदार संघात धैर्यशील माने ( शिंदे ) – राजू शेट्टी ( स्वाभीमानी पक्ष ) – सत्यजित पाटील सरुडकर ( ठाकरे) अशी तिरंगी लढत होईल. माढामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर ( भाजपा ) विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ( शरद पवार ) समोरासमोर आहेत.
सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे ( कॉंग्रेस ) विरुद्ध राम सातपुते (भाजपा ), लातूरमध्ये शिवाजी काळगे (काँग्रेस ) विरुद्ध सुधाकर श्रृंगारे ( भाजपा ), धाराशीव मतदार संघात ओमराजे निंबाळकर ( ठाकरे ) विरुद्ध अर्चना पाटील ( राष्ट्रवादी अजित पवार ), रायगडमध्ये अनंत गीते ( ठाकरे ) विरुद्ध सुनील तटकरे ( अजित पवार ) असा सामना रंगणार आहे.
देशात या आहेत महत्वाच्या लढती
गुजरातमधील गांधीनगरमधून अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडून सोनल पटेल उमेदवार आहेत. मध्यप्रदेश मधील गुनामधून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात काँग्रेसकडून यादवेंद्र सिंह यादव उमेदवार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या विरोधात उत्तर प्रदेश मधोल मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून जयवीर सिंह आणि बसपाकडून शिवप्रसाद यादव उमेदवार आहे. कर्नाटकातील धारवाडमधून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात काँग्रेसकडून विनोद असूती उमेदवार आहेत.