बीड कारागृहातील मारहाण प्रकरणात ट्विस्ट, महादेव गीतेच्या पत्नीचा गंभीर आरोप
प्रशासनाने बांगड्या भरल्यात का? एकट्या वाल्मिक कराडचे ते ऐकणार आहेत का? आमच्याकडून त्यांच्या जीवाचा धोका होता तर मग त्यांना का दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आले नाही, असा प्रश्न महादेव गीतेच्या पत्नीने विचारला.

बीड कारागृहामध्ये हिंडकर आणि अक्षय आठवलेच्या जीवितास धोका आहे. माधव गीते वाल्मिक कराड गँगला जड जातो. सर्व प्रकार त्याच्यासमोर करू शकत नाही. त्यामुळे महादेव गीतेला तेथून हलवण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. जे कट्टर गुन्हेगार आहे त्यांना का हलवण्यात आले नाही? हे न्याय नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. वाल्मीक कराड आणि त्याचा कोण आका बोका आहे त्याचा प्रशासनावर दबाव आहे. प्रशासनाला वाल्मीकची सोय करता येणार नाही. या गोष्टीला वाचा फोडणारा महादेव गीतेच होता. त्यामुळे प्रशासनाचा जावई असलेल्या वाल्मीक कराड याला सुविधा देता येत नव्हत्या. त्यामुळे महादेव यांना हलवण्यात आले, असा आरोप महादेव गीते याच्या पत्नी मीरा गीते यांनी केला.
सीसीटीव्ही पुरावे समोर आणा
बीड कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर महादेव गीते याच्या पत्नी मीरा गीते म्हणाल्या, एवढ्या लवकर सगळ्या गोष्टी कशा झाल्या हा माझा सवाल आहे? त्या म्हणाल्या, मारहाण झाली असेल आणि त्याचे सीसीटीव्ही पुरावे असतील तर ते समोर आणा. त्यात कोणी कोणाला मारले हे पहा. स्वतः कारागृह अधीक्षक म्हणत आहेत, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झालेली नाही.
महादेव गीते यांना दहा लोक येऊन मारतात. ही गँग सगळी वाल्मीक कराडची पद्धत आहे. आमच्या चार जणांची टोळी होते का? या चार जणांनी त्यांना मारहाण केली असेल तर दाखवून द्या. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर माझ्या पतीला साध्या रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आले नाही, असा आरोप मीरा गीते यांनी केला.




मग त्यांना का हलवले नाही?
माझ्या पतीला जेवढा झटपट हर्सुल कारागृहात पाठवले तेवढ्याच झटपट मला पुरावे द्या. बीड जेलमधून त्यांना हर्सुल कारागृहामध्ये नेत असताना माझे त्यांच्यासोबत बोलणे झाले. त्यात त्यांनी सांगितले की, मला वाल्मिक कराडच्या लोकांनी येऊन मारले. माझ्या बॅरेकजवळ येऊन या लोकांनी मला मारहाण केली. त्यांनी अक्षय आठवलेचे नाव घेतले. मग अक्षय आठवले याला संभाजीनगरला का नेले नाही, असा सवाल मीरा गीते यांनी उपस्थित केला.
मीरा गीते म्हणाल्या, मी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून माझा अर्ज देणार आहे. मी पहिले अर्ज दिलेला होता की वाल्मीक कराडला 307 मध्ये घ्या. प्रशासनाने बांगड्या भरल्यात का? एकट्या वाल्मिक कराडचे ते ऐकणार आहेत का? आमच्याकडून त्यांच्या जीवाचा धोका होता तर मग त्यांना का दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.