‘आपल्या चौकात, आपली अवकात….’, महादेव जानकर नेमकं काय म्हणाले?
"आता स्वतंत्र निवडणूक लढणार. आम्ही कुणाशी अलायन्स करणार नाही. आम्ही स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताकदीवर येणाऱ्या सर्व निवडणूक स्थानिक स्वराज्य निवडणूक लढणार आहोत", असं महादेव जानकर म्हणाले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. “राजकारणामध्ये एकमेकांची गरज असते म्हणून अलायन्स होत असतात. भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही गेलो म्हणून आम्ही छोटे होतो म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना काय त्यांचे मोठे पक्ष काय करतात? मोठे होत गेलं की छोट्या पक्षांची त्यांना गरज नसते. आता त्यांना मोठे प्लेयर मिळाले आहेत. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, त्यामुळे आमच्यासारखे छोट्यांची गरज नसते. आपल्या चौकात आपली अवकात वाढवायचं ते माझ्या बुद्धीला पटतं म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष बुथप्रमुखापासून वार्ड प्रमुखापर्यंत तालुकाध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष, राज्य आणि केंद्रीय पातळीवर आम्ही टार्गेट ठेवलं आहे. या वर्षात मात्र महाराष्ट्रामध्ये आम्ही 57 लाख मेंबरशिप राष्ट्रीय समाज पक्षाची उभी करणार आहेत”, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.
“मी विधानसभेच्या महायुती सोबत नव्हतो. राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती. माझी त्यांची युती नव्हती. मी तिसऱ्या आघाडीसोबत नव्हतो आणि महाविकास आघाडीसोबत देखील नव्हतो. मी 97 जागा स्वतंत्र लढवल्या. त्यातली एक जागा आम्ही विजयी झालो. आम्ही महायुतीतून विधानसभेलाच बाहेर पडलो. लोकसभेला आम्ही महायुतीत होतो. आता आम्ही त्यांच्या युतीत नाही”, असं महादेव जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
‘बिहारची देखील निवडणूक लढवणार’
“आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र मुंबई महापालिका निवडणूक लढणार आहोत. आम्ही सर्व महापालिका निवडणूक लढवणार आहोत. आम्ही तीन दिवसांपूर्वी दिल्लीत देखील उमेदवार दिले. बिहारची निवडणूक देखील आम्ही लढवत आहोत. आमचा पक्ष स्वतंत्र एकटा चलो चालला आहे”, असं महादेव जानकर म्हणाले.
‘मविआत फूट पडली तर फार चांगलं होईल’
“महाविकास आघाडीत फूट पडली तर फार चांगलं होईल. प्रत्येक पक्षाने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतंत्र लढलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने आहे ते देखील समजेल. खासदार संजय राऊत जर तसं बोलत असतील तर त्यांचं वेलकम आहे. काँग्रेसने, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी वेगळं लढावं. ही फार चांगली गोष्ट आहे. आम्ही सध्या कुणाच्या आघाडीत नाही आणि युतीत देखील नाही. आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं महादेव जानकर म्हणाले.