लोकसभेतील अपयशानंतर महायुतीमधील घटकपक्षाचा स्वबळाचा नारा, १०४ जागांवर तयारी सुरु
परभणी लोकसभेत महायुतीचे महादेव जानकर यांचा दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीकडून मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात भाजपचे आमदार आणि परभणी लोकसभेचे निरीक्षक राम पाटील रातोळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. मोदी 3.0 सरकारचे कामकाज सुरु झाले. लोकसभा निवडणुकीत एकत्र लढणारे महायुतीमधील पक्ष आता स्वबळाची तयारी करत आहे. महायुतीमध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे महादेव जानकर यांनी महायुतीपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी लोकसभा मतदार संघातून महादेव जानकर यांचा पराभव झाला होता. आता त्यांचा राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेसाठी एकूण १०४ जागांवर महादेव जानकर यांनी तयारी सुरु केली आहे.
जानकर यांचा स्वबळाचा नारा
महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत इतर लहान पक्षही आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. रासपच्या चिन्हावर महादेव जानकर निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी जानकर यांचा पराभव केला. बाहेरचे उमेदवार दिल्यामुळे महायुतीचा पराभव झाल्याचे भाजपच्या पक्ष निरीक्षकांनी माध्यमांसमोर सांगितले. त्यानंतर सोमवारी महादेव जानकर यांनी आपली वेगळी वाट निवडली आणि स्वबळाचा नारा दिला.
१०४ विधानसभा मतदार संघात तयारी करा
राष्ट्रीय समाज पक्षाने मतदारसंघाची यादी प्रसिद्ध केली आहे. १०४ विधानसभा मतदार संघात तयारी करा, अशा सूचना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केल्या आहेत. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी महादेव जानकर यांच्या पक्ष आणि महायुती समोरासमोर येणार आहे. या लढतीला मैत्रीपूर्ण लढत असे नाव दिले जाणार की विरोधक म्हणून रसप निवडणूक लढवणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
परभणीत का झाला पराभव?
परभणी लोकसभेत महायुतीचे महादेव जानकर यांचा दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीकडून मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात भाजपचे आमदार आणि परभणी लोकसभेचे निरीक्षक राम पाटील रातोळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या बैठकीत बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे पराभव झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.