Abu Salem | मुंबई स्फोटातील आरोपी अबू सालेमला सुप्रीम कोर्टाचा झटका, 2027 नव्हे 2030 नंतर जेलमधून सुटका होण्याची शक्यता
जस्टिस संजय किशन कौल आणि जस्टिस एम. एम. सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सोमवारी अबू सालेमने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय दिला.
मुंबईः 1993 मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी गँगस्टर अबू सालेम याने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पोर्तुगालमधून भारतात हस्तांतरण झाल्यानंतर अबू सालेमला (Abu Salem) भारतात शिक्षा भोगत होता. मात्र पोर्तुगीज सरकारशी हस्तांतरणावेळी झालेल्या करारानुसार त्याला 25 वर्षांचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी अबू सालेमने केली होती. आज अबू सालेमच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुनावणी झाली. सालेमला झालेल्या जन्मठेपेला त्याने कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र हस्तांतरण कराराचे नियम कोर्टाला लागू होत नाहीत. सालेमची 25 वर्षे शिक्षा पूर्ण झाल्यानंतर कोर्ट जी शिक्षा देईल, ती सालेमला भोगावी लागेल, असा निर्णय आज देण्यात आला. त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेमसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
1993 च्या बॉम्बस्फोटानंतर अबू सालेम दुबईत पळून गेला होता. तेथे त्याने व्यवसाय सुरु केला. त्यानंतर तो पोर्तुगालला पळाला. तेथे 20 सप्टेबर 2002 मध्ये त्याला अटक झाली. तिथे तीन वर्ष त्याच्यावर खटला चालल्यानंतर पोर्तुगाल कोर्टाने त्याच्या भारतातील हस्तांतरणाला परवानगी दिली. 2005 मध्ये अबू सालेमला भारतात आणलं गेलं. यावेळी पोर्तुगाल आणि भारत यांच्यात करार झाला होता. त्यावेळी पोर्तुगालने अबू सालेम दोषी आढळला तर त्याला त्यांच्या कायद्यांप्रमाणे शिक्षणा द्यावी, अशी अट घातली होती. यात अबू सालेमला फाशी देता येणार नाही तसेच 25 वर्षे एवढीच जास्तीत जास्त शिक्षा देता येईल, असे सांगितले होते. पोर्तुगालसोबतच्या या करारामुळे अबू सालेमला 25 वर्षांचीच शिक्षा झाली आहे. पोर्तुगालमधील नजरकैद आणि तेथील जेल येथील शिक्षा भोगल्यानंतर 2027 मध्ये शिक्षेची 25 संपतील असा दावा अबू सालेमच्या वतीने करण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर पुढे शिक्षा मिळू नये, अशी याचिका त्याने दाखल केली होती.
सालेमच्या याचिकेवर कोर्ट काय म्हणाले?
जस्टिस संजय किशन कौल आणि जस्टिस एम. एम. सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सोमवारी अबू सालेमने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय दिला. कोर्टाने सालेमची याचिका स्वीकारण्यास नकार दिला. पोर्तुगालला देण्यात आलेल्या आश्वासनाचा सन्मान होईल. तसेच मुंबई स्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सालेमची 25 वर्षांची शिक्षा संपल्यावर त्याला सोडण्यात येईल, असे कोर्टाने म्हटले. मात्र ही 25 वर्षांची शिक्षा 2030 मध्ये संपेल, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे 2027 मध्ये शिक्ष संपण्याची अबू सालेमची आशा मावळली आहे. त्यानंतर 2030 मध्ये त्याची कोर्टातून सुटका होण्याची शक्यता आहे.