मोठी बातमी! राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार, सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत?
राज्यसभा निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या एकूण 6 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत एका जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यसभेची ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा कार्यकाळ येत्या मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या 6 खासदारांमध्ये भाजपचे 3, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रत्येकी एक खासदारांचा समावेश आहे. भाजपच्या नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि श्री. व्ही. मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या 6 जागांवर आता कोण उमेदवार असणार आणि कुणाची नियुक्ती केली जाईल? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राज्यसभेसाठी ‘या’ नावांची जोरदार चर्चा
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांच्या जागेवर शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना राज्यसभेला पाठवण्यासाठी उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे.
काँग्रेसकडून कुमार केतकर यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी तरुण तडफदार नेता कन्हैयाकुमार यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. हे सर्व उमेदवार खरंच अंतिम ठरले तर शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून कुणीही राज्यसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून दिसणार नाही. राज्यात सत्तापालट झाल्यामुळे राज्यसभा निवडणुकीचे हे गणितं देखील आपल्याला बदलताना दिसण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीचं गणित काय?
राज्यसभेची निवडणूक कशी होते हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असतं. राज्यसभेत सध्या सक्रिय आमदारांची संख्या ही 286 आहे. तर राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक आहे. त्यामुळे 286 भागिले 6 अधिक 1 असं गणित केलं तर 40.9 असं उत्तर येतं. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी उमेदवारांना किमान 41 चा आकडा गाठणं गरजेचं असणार आहे. सध्याचं पक्षीय बलाबल पाहता भाजपचे तीन खासदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी एक खासदार निवडून आणू शकतात. ठाकरे गटाने ताकद लावली तर कदाचित त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो. पण ते खूप कठीण असणार आहे.