महाराष्ट्रात विधानसभेचा शंखनाद, महिनाभर प्रचाराचा धुरळा
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 20 नोव्हेंबर मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी असेल. निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा आहे, पाहुयात
अखेर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झालीय. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 20 नोव्हेंबर मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागतील. मतदानानंतर तिसऱ्या दिवशी 288 उमेदवारांचा फैसला होईल आणि सोबतच महायुती की महाविकास आघाडी कोणाची सत्ता येणार हेही 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम नेमका काय आहे तेही समजून घेऊया.
- 22 ऑक्टोबरला अधिसूचना निघेल
- 23 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरता येईल
- 29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे
- 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होईल
- 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे
- 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्राच्या जनतेनं 31 जागांसह महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला…आता विधानसभेला, महायुती आणि महाविकास आघाडीचं नशीब 9 कोटी 63 लाख मतदारांच्या हाती आहे. ज्यात 4 कोटी 97 लाख पुरुष मतदार आहेत..तर 4 कोटी 66 लाख महिला मतदार आहेत. पहिल्यांदा मतदान करणारे म्हणजेच फर्स्ट टाईम व्होटरची संख्या 20 लाख 93 हजार इतकी आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी 23 नोव्हेंबरला महायुतीच्याच विजयाचा जल्लोष होईल, अशी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिलीय. लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल. पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करु. भाजपच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरुन यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करु या. लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा. विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय..
लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर आता फॅक्टर बदलले आहेत. लोकसभेत थेट लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीत होती. त्याशिवाय वंचित आघाडीनं उमेदवार दिले होते. पण विधानसभेत वंचित आघाडीही मैदानात आहे…त्याशिवाय बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजेंची परिवर्तन महाशक्ती आघाडीही रणांगणात आहे. या 2 छोट्या आघाड्यांसह जरांगेही फॅक्टरही महत्वाचा आहे. उमेदवार देण्याचे संकेत जरांगेंनी दिलेत. लोकसभेत जरांगेंनी उमेदवार न दिल्यानं महाविकास आघाडीला फायदा झाला होता. आणि चौथा फॅक्टर आहे, लाडकी बहीण योजना. जवळपास 2 कोटी 30 लाख लाडक्या बहीणी आहेत आणि आतापर्यंत नोव्हेंबरचा अॅडव्हान्स पकडून साडे 7 हजार प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे गेलेत. त्यामुळं लाडक्या बहिणी ट्रम्प कार्ड असतील
निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा करताच मनोज जरांगे पाटलांनी, आता वाट लावल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा सरकारला दिलाय. जरांगेंचा दबदबा मराठवाड्यात आहे, इथं विधानसभेच्या एकूण जागा आहेत 48. त्यामुळं जरांगेंनी उमेदवार दिले तर त्याचा फटका महाविकास आघाडीला अधिक बसेल. कारण लोकसभेत ही मतं महाविकास आघाडीकडेच गेली होती. महाराष्ट्रात विधानसभेचा शंखनाद झालाय…पुढच्या 2-3 दिवसांत उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊन प्रचारालाही सुरुवात होईल…त्यामुळं पुढचा महिनाभर प्रचाराचा धुरळा असेल….