महाविकास आघाडीच्या गोटातली आतली बातमी, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती जागा?
महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. सूत्रांकडून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अतिशय महत्त्वाची माहिती 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. या जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
मोहन देशमुख, इनपूट एडिटर, Tv9 मराठी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून आता कोणत्याहीक्षणी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पण या पत्रकार परिषदेआधी सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. काँग्रेस जवळपास 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मविआत सर्वाधिक जागा लढणार आहे. ठाकरे गट 96 ते 100 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभा निवडणुकीत 80 ते 85 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचं जागावाटप आता जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. आता कोणत्या मतदारसंघात कुणाला संधी दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात याबाबतचा सस्पेन्स देखील लवकरच संपण्याची चिन्हं आहेत.
तणाव, समन्वय आणि तोडगा, काय-काय घडलं?
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. मविआतील प्रत्येक पक्षाचे प्रत्येकी दोन ते तीन नेते या बैठकीला उपस्थित असायचे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा व्हायची. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मविआच्या बैठकांमध्ये जास्त जोमाने चर्चा होऊ लागली. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना विदर्भातील काही जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मोठा संघर्ष बघायला मिळाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात वाद झाला. हा वाद इतका मोठा होता की, या वादाची दखल काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडला घ्यावी लागली.
काँग्रेस हायकमांडने या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हातात जागावाटपाच्या चर्चांची सूत्रे दिली. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावून घेतलं. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस हायकमांडची महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा सुरु होती. या बैठकांमध्ये उमेदवारी कुणाला द्यायची आणि जागावाटप यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. यानंतर आज बाळासाहेब थोरात मुंबईत आले आणि त्यांनी शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर बाळासाहेब थोरातांनी दुपारी साडेतीन वाजता बैठक होईल आणि त्यात जागावाटप निश्चित होईल, अशी माहिती दिली होती.