महाराष्ट्राचा नेमका मूड काय? विधानसभेत कोण बाजी मारणार? पाहा ओपिनियन पोलची A टू Z आकडेवारी
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? याबाबतचा ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्या चेहऱ्याला जास्त पसंती असणार आहे? याबाबतचीदेखील आकडेवारी समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण राज्यातील जनता देखील आगामी विधानसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला तब्बल 6 प्रमुख पक्ष बनले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर महाराष्ट्राची ही पहिली विधानसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजचा ओपिनियन पोल समोर आला आहे. ओपिनियन पोलनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या ओपिनियन पोलनुसार, भाजपच राज्यातला एक नंबरचा पक्ष असणार आहे. पण भाजपच्या जागा घटणार आहेत.
ओपिनियन पोलनुसार, राज्यात भाजपला सर्वाधिक 83 ते 93 जागा मिळतील. तर शिवसेना शिंदे गटाला 42 ते 52 जागा मिळतील. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 7 ते 12 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 58 ते 68 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 35 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला 26 ते 31 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांना 3 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी आवडता चेहरा कोण?
विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी आवडता चेहरा कोण? याबाबतली सर्व्हे करण्यात आला आहे. पोलनुसार, राज्यातील 37 टक्के जनतेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच चेहऱ्याला जास्त पसंती आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यांना प्रत्येकी 21 टक्के पसंती आहे. शरद पवारांना 10 टक्के आणि इतरांना 11 टक्के पसंती मिळाली आहे.
लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होणार?
विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेचा किती टक्के फायदा झाला? याबाबतची सर्व्हे करण्यात आला. यामध्ये 58 टक्के लोकांचं मत आहे की, ही योजना प्रभावी ठरली आहे. तर 24 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ही योजना काही प्रमाणात प्रभावी ठरली आबे. 6 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत काहीच फायदा होणार नाही. 5 टक्के नागरिकांनी सांगू शकत नाही, असं उत्तर दिलं आहे. तर 7 टक्के नागरिकांनी लाडकी बहीण योजना ही प्रचाराची एक पद्धत होती, असं म्हटलं आहे.