संभाजीनगर विधानसभेत कोण मारणार बाजी? वाचा राजकीय गणितं; यंदा कोणकोण निवडणुकीच्या मैदानात उतरणार?
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकींचा बिगुल वाजणार आहे. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर छत्रपती संभाजीनगर विधानसभेचं गणित काय असणार? छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा लढवण्यासाठी कोणकोण इच्छूक आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा कन्नड, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व, गंगापूर आणि वैजापूर या ६ मतदारसंघाना मिळून तयार होतो. शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंना 4 लाख 76 हजार 130 मतं पडली. ३ लाख ४१ हजार 480 मतं घेवून एमआयएमचे जलील दुसर्या क्रमांकावर, तर तिसऱ्या स्थानी ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना 2 लाख 93 हजार 450 मतं पडली. संदीपान भुमरे 1 लाख 34 हजार 650 मतांनी विजयी झाले. 2019 ला महायुतीच्या चंद्रकांत खैरेंना 32.21% मतं होती. वंचितसोबत लढलेल्या एमआयएमच्या जलीलांना 32.63%, आणि अपक्ष हर्षवर्धन जाधवांना 23.77%. यंदा मविआच्या खैरेंना 22.53%, एमआयएमच्या जलीलांना 26.22%, आणि महायुतीच्या संदीपान भुमरेंना 36.56% टक्के मतं पडली.
2019 च्या तुलनेत ठाकरे गटाच्या खैरेंच्या मतदानात 9.78 टक्के घट झाली. जलीलांच्या मतांत 6.41 टक्के, तर महायुतीच्या मतांमध्ये 4.35 टक्क्यांची वाढ झाली. विधानसभानिहाय लीड बघितलं तर संदीपान भुमरे कन्नड, संभाजीनगर पश्चिम, गंगापूर आणि वैजापुरात आघाडीवर राहिले. एमआयएमच्या जलीलांनी संभाजीनगर मध्य आणि संभाजीनगर पूर्वेत लीड घेतलं. तर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना एकाही मतदारसंघात लीड मिळू शकलं नाही.
पक्षनिहाय कुणाला किती लीड?
पक्षनिहाय गणित समजून घेतल्यास, कन्नडमधून ठाकरेंचे आमदार उदयसिंह राजपूतांच्या मतदारसंघात भुमरेंना ३१ हजारांचं लीड, संभाजीनगर पश्चिममधून शिंदेंचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भुमरेंना 40 हजार 759 लीड, गंगापुरातून भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या तालुक्यातून भुमरेंना 45 हजार 878 लीड, वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारेंच्या मतदारसंघात 68 हजारांचं लीड मिळालं. तर भाजप आमदार अतुल सावेंच्या संभाजीनगर पूर्वेतून इम्तियाज जलीलांना 25 हजारांचं लीड, आणि शिंदे गटाचे प्रदीप जैसवाल यांच्या संभाजीनगर मध्यमधूनही इम्तियाज जलीलांना 26 हजारांचं लीड मिळालं.
२०१९ चा निकाल काय?
2019 च्या विधानसभांवेळी महायुतीनं संभाजीनगर शहरातल्या सहा पैकी 2 जागा भाजपनं तर 4 जागा शिवसेनेनं लढवल्या. आघाडीत 4 जागा राष्ट्रवादी, काँग्रेस 1 आणि इतरांनी १ जागा लढवलेली. 6 पैकी शिवसेनेनं 4 तर भाजपनं २ जागा जिंकल्या होत्या. आघाडीला एकाही जागी यश मिळालं नाही.
मतविभाजनाच्या चर्चा आणि चुरशीच्या ठरलेल्या लढतीत संभाजीनगर मध्य मध्ये सेना-भाजप युतीचे प्रदीप जैस्वाल 13892 मतांनी जिंकले होते. इथं वंचितला 27 हजार 302 मतं होती. संभाजीनगर पश्चिममध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट 40 हजारानं जिंकले. इथं एमआयएमला 40 तर वंचितला 25 हजार मतं पडली. कन्नड विधानसभेत शिवसेनेचे उदयसिंह राजपूत 35 हजार 600 मतांनी जिंकले. याठिकाणी अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 60 हजार 535 मतं पडली होती.
यंदा कुणाकुणाची नावे चर्चेत?
महायुतीकडून यंदा संभाजीनगर पूर्वेसाठी अतुल सावे आणि संजय केनेकरांचं नाव इच्छूकांमध्ये आहे. तर मविआत ठाकरे गटाच्या कला ओझांचं नाव चर्चेत येतंय. संभाजीनगर मध्य मधून पुन्हा प्रदीप जैस्वाल, ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी नाव चर्चेत आहे. संभाजीनगर पश्चिममध्ये शिंदे गटाकडून संजय शिरसाट, भाजपकडून राजू शिंदे तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसकडून जितेंद्र देहाडेंचं नाव घेतलं जातंय.
गंगापूर विधानसभेत भाजपकडून प्रशांत बंब, अजितदादा गटाकडून सतीश चव्हाण, ठाकरे गटाकडून कृष्णा डोणगावकर, किंवा देवयानी डोणगावकरांचं नाव चर्चेत आहे. वैजापूर विधानसभेत शिंदेंकडून रमेश बोरनारे, ठाकरे गटाकडून भाऊसाहेब पाटील, अविनाश गलांडे, आणि काँग्रेस किंवा शरद पवार गटाकडून अभय चिकटगावकरांचं नाव आघाडीवर आहे.
कन्नड विधानसभेत शिंदे गट किंवा भाजपकडून संजना जाधव यांचं नाव चर्चेत आहे. गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांच्या त्या पत्नी आहेत. उदयसिंह राजपूत ठाकरे गटाकडून, अजितदादा गटाकडून संतोष कोल्हे यांची नावं चर्चेत आहेत. तर स्वतः हर्षवर्धन जाधव अपक्ष लढण्याचीही तयारी करत आहेत.