विधानसभा निवडणुकीआधी 4 मेळावे आणि शक्तिप्रदर्शन, मैदान कोण मारणार?
दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याची संधी चार नेत्यांना मिळणार आहे. एकीकडे मराठवाड्यात मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे यांचा मेळावा होणार आहे तर मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा मेळावा होणार आहे.
उद्या 4 मोठे मेळावे पार पडणार आहेत. दुपारी पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांचा मेळावा आहे. तर संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. दसऱ्याला एकाच दिवशी 4 मेळावे आहेत. सावरगावात पंकजा मुंडेंचा मेळावा, रायगडावर मनोज जरांगे पाटलांचा मेळावा, मराठवाड्यात पंकजा मुंडे ओबीसींवरुन तर जरांगे मराठा आरक्षणावरुन पुढची भूमिका स्पष्ट करतील. इकडे मुंबईत 2 शिवसेनेत टक्कर पाहायला मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानात आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच दसरा मेळावा घेत आहेत. नारायगडावर तयारीही जोरदार झाली आहे. पंकजा मुंडे आणि जरांगेंच्या 2 दसरा मेळाव्यांनी मराठवाड्याची दिशाच ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत विशेषत: मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसला आणि बीड लोकसभेत पंकजा मुंडे पराभूत झाल्या. त्यामुळं त्या पराभवावर पंकजा काय बोलतात, हेही कळेल. जरांगेंनी तर आधीच भाषणाचा अजेंडा मराठा आरक्षणच असेल हे दाखवून दिलं आहे. बीडमधील सर्व ओबीसी बांधवांनी मेळाव्याला वाजत गाजत येण्याचे लक्ष्मण हाके यांनी आवाहन केले आहे. लक्ष्मण हाके देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
पंकजांच्या सावरगावातल्या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे 10 वर्षात पहिल्यांदाच धनंजय मुंडे या मेळाव्याला हजर राहणार आहेत. माझ्या भावना अभूतपूर्व असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. दुपारी पंकजा मुंडे आणि जरांगेंचा मेळावा होईल. तर संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा मुंबईत मेळावा आहे. पुढच्या 2-3 दिवसांतच निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं जागा वाटप, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ते सत्तासंघर्षाचा न लागलेला निकाल आणि मुख्यमंत्री शिंदेंवर तुटून पडतील. गेल्या दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी सरकार आल्यावर उलटं टांगण्याची टीका केली होती.
अडीच वर्षांआधी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत जनता फैसला करणार आहे. त्याआधी दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचंही शक्तिप्रदर्शन दिसेल.