मुंबई | 17 जुलै 2023 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा चमत्कारीक संघर्ष पाहायला मिळणार आहे. तसेच राज्याचं विरोधी पक्षनेतेपद आता राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे जाणार आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न राहणार आहे.
याशिवाय या अधिवेशनात शेतकऱ्यांचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी अजूनही दुष्काळासारखी परिस्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. तर राज्यातील काही भागात गुन्हेगारीनेही डोके वर काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून आज दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी आक्रमक होत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडत सभात्याग केला. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहात काहीवेळ गोंधळ झाला होता.
सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली, 50 खोके, एकदम ओके… अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी आज केली. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार, असो अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकविण्यात आले होते.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील. बोगस बियाणा संदर्भात कडक कारवाई करू. सकारकडून शेतकऱ्यांना 10 हजार कोटीचीं मदत देण्यात आलीय, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. राज्यात अत्यंत कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नसल्याचं थोरात यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नव्या मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला. राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व नऊ मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला. विधिमंडळाचं कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले होते.
बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीतून वर्षा ते विधान भवनच्या दिशेने रवाना झाले होते. मंत्री पदाच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार असल्याचं आमदार बच्चू कडूंनी सांगितले होते. मी मुख्यमंत्र्यांसोबत गाडीत बसून जरी आलो असतो तरी आमची मंत्री पदाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. नाराज नसल्याचंही ते म्हणाले.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून जोरदार निदर्शने केली. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यावेळी उपस्थित होते. मात्र, आमच्याकडे 19 आमदारांचं बळ आहे म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार पायऱ्यावर उपस्थित नव्हता, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.