राजकारणातल्या अनोख्या घडामोडी, ठाकरे-फडणवीस, ठाकरे-विधानसभा अध्यक्ष भेट, राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Dec 17, 2024 | 6:46 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणाऱ्या घडामोडी आज घडलेल्या आहेत. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या दोन नेत्यांची आज भेट घडून आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीदेखील भेट घेतली आहे. या भेटीगाठींवर विधानसभा अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकारणातल्या अनोख्या घडामोडी, ठाकरे-फडणवीस, ठाकरे-विधानसभा अध्यक्ष भेट, राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया काय?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. विधिमंडळाचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आज नागपुरात मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब, सचिन अहिर हे नेतेदेखील होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जात त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांच्यातील बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन हे राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेले. या सर्व भेटीगाठीनंतंर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया काय?

“उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधीमंडळ नेते आहेत. त्याच अनुषंगाने ते विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी आले होते. ही सदिच्छा भेट होती. आपल्याकडे पाहुणे आल्यावर त्यांचा पाहुणचार आपण नेहमीच करतो. त्यात काही वावगं किंवा नवल काहीच नाही”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदासाठी कोणता प्रस्ताव आला का? असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारला असता, “अद्याप माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. माझ्याकडे तसा कोणता प्रस्ताव आला तर नियमानुसार, प्रथा परंपरेनुसार, निश्चित कारवाई केली जाईल”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस आणि महाजनांच्या भेटीवर नार्वेकरांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. यावेळी काय चर्चा झाली? असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अधिवेशन सुरु आहे. सभागृहातील कामकाजाबाबतची चर्चा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांबरोबर होत असते. त्याच अनुषंगाने एकूण कामकाजा संदर्भात चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.