‘ऐतिहासिक निकाल देणार’, विधानसभा अध्यक्षांचे संकेत, विकेट कुणाची पडणार?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अर्जावर महत्त्वाचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 15 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आता 10 जानेवारी 2024 ला निकाल जाहीर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकरणावर निकाल जाहीर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. दोन्ही गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेतला. दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली. तसेच दोन्ही पक्षाच्या आमदारांची उलटसाक्ष देखील नोंदवण्यात आली. त्यानंतर आता सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे. असं असताना विधानसभा अध्यक्षांनी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली. त्यांनी या प्रकरणावर निकाल जाहीर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली. सुप्रीम कोर्टाने तीन आठवडे न देता 10 दिवसांची मुदतवाढ दिलीय.
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आता 10 जानेवारी 2023 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या तीन आठवड्यांच्या मुदतवाढच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने तेवढी मुदतवाढ देऊ शकत नाही, असं स्पष्ट सांगितलं. पण 10 जानेवारीपर्यंत अंतिम निकाल जाहीर व्हायला हवं, असं सुप्रीम कोर्टाने बजावलं. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी देखील मान्य केलं. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राहुल नेमकं काय म्हणाले?
राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर 10 जानेवारी 2024 रोजी निकाल घोषित करणार. आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, हे देशासाठी उदाहरण असेल”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.
कुणाची विकेट पडणार?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आता पुढच्या महिन्यात 10 जानेवारीला अंतिम निकाल जाहीर होणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता विकेट कुणाची पडणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होईल. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळेल. पण उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.