भाजपमध्ये धुसफूस, पक्षाच्या कोअर कमिटीची मुंबईत महत्त्वाची बैठक, नेत्यांची नाराजी दूर होणार?

| Updated on: Aug 30, 2024 | 4:34 PM

भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. भाजपमधील नाराज नेत्यांबद्दल या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह आणखी महत्त्वाच्या नेत्यांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपमध्ये धुसफूस, पक्षाच्या कोअर कमिटीची मुंबईत महत्त्वाची बैठक, नेत्यांची नाराजी दूर होणार?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

भाजपमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर जाहीर माफी मागितली आहे. मोदींनी शिवप्रेमींचीदेखील जाहीर माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी यांचा आजचा महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर मुंबईत भाजपच्या गोटात महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी घडणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची आज मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. ही बैठक आज संध्याकाळी सहा वाजता बोलवण्यात आली आहे. या बैठकीत पक्षातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती असेल. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची आज संध्याकाळी मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भाजपचे महत्त्वाचे नेते आणि कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित असतील. हर्षवर्धन पाटील यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. राज्यातील इतर भाजप नेत्यांच्या नाराजीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत नेत्यांबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो, किंवा बैठकीमधूनच भाजप नेत्यांना संपर्क केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कागलमध्ये भाजपला खिंडार

कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. भाजप नेते समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. समरजित घाटगे यांचा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत्या 3 सप्टेंबरला पक्षप्रवेश होणार आहे. समरजित घाटगे यांच्या या निर्णयामुळे भाजपचं वैयक्तिक मोठं नुकसान होणार आहे. याशिवाय इंदापुरात हर्षवर्धन पाटील हे विधानसभेच्या तिकीटासाठी आग्रही आहेत. पण महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यामुळे त्यांना तिकीट मिळणं कठीण आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे देखील पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्याआधी भाजप नेत्यांची नाराजी ही पक्षासाठी हानिकारक ठरु शकते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचं काही जागांबाबत जागावाटप शेवटपर्यंत ठरलं नव्हतं. त्याचा मोठा फटका महायुतीमधील सर्व पक्षांना बसला. असं असताना आता भाजप पक्षातील नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करणं हा पक्षापुढील महत्त्वाचं आव्हान असणार आहे.