मुंबई | 03 जानेवारी 2024 : नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक आणि टँकर चालकांनी देशभरात संप पुकारला होता. तो आता मागे घेण्यात आला आहे. जरी हा संप मागे घेण्यात आला असला तरी त्याचे पडसाद कायम आहेत. मागच्या दोन दिवसात महाराष्ट्राला 500 कोटींचा फटका बसला आहे. तसंच राज्यभरात पेट्रोल- डिझेल यांचा तुटवडा जाणवत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193 वी जयंती आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यात आहेत. सकाळी 11 वाजता सातारा नायगावात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यासह अन्य घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा ब्लॉग फॉलो करा.
छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झालीय. व्यासपीठावर प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर.बाल्की, प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम उपस्थित आहेत. या समारंभात यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश | अयोध्येत यंदा दिवाळी साजरी होणार. मी दिवाळी अयोध्येतच साजरी करणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. तसेच कोणी काही म्हणू द्या, पण यंदा अयोध्येतच दिवाळी होणार. राम 500 वर्षांनंतर मंदिरात विराजमान होत आहेत. याचा सगळ्यांना आनंद आहे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
शिर्डी | राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. तसेच इतकी वर्ष जंगलात राहून कोण शाकाहारी राहतं का? असा सवालही आव्हाड यांनी यावेळेस उपस्थित केला. अयोध्येत एकीकडे श्रीराम मुर्तीस्थापनेची तयारी सुरु आहे. तर आव्हाडांनी केलेल्या या विधानामुळे आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंबई | जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशांक राव यांनी राजीनामा दिला आहे. तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलाय. शशांक राव यांनी जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांना पत्र लिहून आपला निर्णय कळवला. शशांक राव यांनी 2017 साली जदयूत प्रवेश केला होता. तेव्हा शशांक राव यांना मुंबई अध्यक्ष म्हणून जबाबादरी देण्यात आली. त्यानंतर 2019 साली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील परिते गावामध्ये प्रसादातून शंभरहून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या गावकऱ्यांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू आहे. त्रास सुरू झालेल्या नागरिकांवर राशिवडे, ठिपकुर्ली, इस्फुर्ली इथल्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी ईडीला पत्र लिहून म्हटले आहे की, मला समन्स का पाठवले गेले हे स्पष्ट झाले नाही. साक्षीदार किंवा संशयित म्हणून मला समन्स बजावण्यात आले आहे हे तुमच्या समन्सवरून स्पष्ट होत नाही. ईडी माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी मशीद वादाशी संबंधित खटल्याची आज सुनावणी झाली. मुस्लिम पक्षाच्या अर्जावर जिल्हा न्यायाधीश न्यायालयात होणारी सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एएसआयने कोर्टात सुनावणी चार आठवड्यांनी पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
आमचा लढा आरक्षणासाठी असून मुंबईला जाण्याची हौस नसल्याचं सांगितलं आहे. पण सरकार आडवणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. तुमचं दूध, धान्य बंद करू आम्ही शेतकरी आहोत असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सीएए घटनाविरोधी आहे. हा कायदा धर्माच्या आधारावर बनवण्यात आला आहे. NPR-NRC सोबत CAA वाचले आणि समजून घेतले पाहिजे, जे या देशात तुमचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अटी निश्चित करेल. असे झाले तर तो भारतातील मुस्लिम, दलित आणि गरिबांवर घोर अन्याय होईल. मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे असोत.
मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील लिलोंग चिंगजाओ भागात प्रतिबंधित संघटनेच्या गोळीबारात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील मृतांची एकूण संख्या पाच झाली आहे. सोमवारी रात्री पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सदस्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या 10 जणांमध्ये हा व्यक्ती होता.
मुंबई : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत आहे. त्यानिमित्त 22 जानेवारीला महाराष्ट्रात एक दिवसासाठी दारू आणि मांस बंदी करा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. तसेच, राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करून संपूर्ण देशातही त्या दिवशी दारू आणि मास बंदी करावी असेही ते म्हणाले.
मुंबई : मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करु अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. याआधी सरकारने हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करु असे सांगितले होते. मात्र, सरकारने डेडलाईन वाढवून मागितली. राज्य सरकारच्या या गलथान कारभाराबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, एक वर्षाची मुदतवाढ मान्य करत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
जालना : मोर्चामध्ये काही दुर्घटना किंवा दुसरे कोणी येऊन उद्रेक करेल याची भीती आहे. त्यासाठी सर्विलांस टीम करण्यात यावी. ही सर्विलांस टीम मुंबईकरांनी करावी असे जरांगे पाटील म्हणाले. सरकारने परवानगी दिली नाही तरी आम्ही मुंबईला येणार म्हणजे येणारच. मी मरेन पण मागे हटणार नाही असेही त्यांनी सांगितले.
नागपूर : सरकारचा उद्देश नेमका काय आहे? लोकांनी गाड्या नाही तर आता फक्त चालत जावं असं आहे का? समृद्धी माहामार्गवर अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. समृद्धी महामार्गावर वापरलेले केमिकल महागडे होते म्हणून वापरले गेले नाही. त्यामुळे रस्त्याचा दर्जा बदलला असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोकांची नाही तर सरकारमध्ये बसलेल्या लोकांची समृद्धी झाली आहे अशी टीकाही त्यांनी केली.
नवी दिल्ली : जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांच्या कामाबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारसह 11 राज्य सरकारला नोटीस पाठविली आहे. अनेक कारागृहांमध्ये कैद्यांची जात पाहून त्यांना काम दिलं जातात या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ही नोटीस जारी केली आहे.
वाशीम : चार डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने वाशिमच्या जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी करत जेलभरो आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्याना पेन्शन योजना सुरू करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्याना कामासाठी नविन मोबाईल द्यावा, मार्च २०२० पासून अमृत आहार कामाचे थकीत मानधन देण्यात यावे आधी विविध स्वरूपाच्या त्यांच्या मागण्या आहेत.
आरोग्य विभागात मोठे निर्णय आपण घेतले आहेत. 2035 पर्यंत आरोग्य विभागात आपल्याला खूप काम करायचं आहे. अनेक योजना आणायच्या आहेत- एकनाथ शिंदे
सरकारकडे जाहिरातासाठी पैसे, अंगणवाडी सेविकांसाठी नाही. अंगणवाडी सेविका म्हणजे सावित्रीच्या लेकी. अंगणवाडी सेविका रामभक्त नाहीत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आझाद मैदानातील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावेळी ते बोलत होते.
आपण शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा कशी देता येईल याचा विचार करत आहोत. सरकारने याबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. 150 कोटी पेक्षा जास्त मुख्यमंत्री सहायता निधी आपण वाटला आहे. मी गरज पहिली की ताबडतोब त्यावर सही करतो आणि पैसे मंजूर करतो
राज्य सरकारने शिक्षण आणि आरोग्याला नेहमीच महत्त्व दिल आहे. आपल्या जिल्ह्यात तिन्ही आधिकारी चांगले आहेत. आपण या जिल्ह्याचे शहराचं काहीतरी देणं लागतो असं समजून आधिकारी काम केलं की जिल्ह्याचा विकास होतो. विकासामध्ये सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रित असलं पाहिजे शेवटी लोकांचा फायदा पाहिला पाहिजे समाजाला काय मिळतं ते बघितलं पाहिजे. तेच काम आपलं सरकार करत आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आम्ही चालत येणार का गाडीने हे आम्ही 10 जानेवारीला ठरवणार आहोत. मराठयांचा गनिमी कावा कळू देणार नाही. आमच्या गाड्या आमच्यासोबत असणार आहे, आमच्या खायच्या वस्तू त्यामध्ये असणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
जालना – मुंबईतील मराठा समाजातील नागरिकांसोबत जरांगे पाटील यांची बैठक. मुंबई मध्ये दोन कोटी बांधव येणार आहे. भाऊ आणि सोयरे म्हणून सांगत आहे. आझाद मैदानावर उपोषण करण्याचे नक्की झाले आहे. असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या मुंबईच्या आझाद मैदानात दाखल. सरकारने पेन्शन लागू करावी वेतनश्रेणीत अंगणवाडी सेविकांना घ्यावे ही या अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेला सुरुवात. संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, १०० टक्के पिक-विमा, शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या.
हे सरकार म्हणजे ‘मूह मे राम, बगल मे छुरी’ आहे अशी टिका कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. रामनवमीला राम मंदिराचे उदघाट्न का घेतले नाही, कारण आता निवडणूका आल्यात म्हणून राम मंदिराचे उदघाट्न घेत असल्याचे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
सोलापूरात सावित्रीबाई फुल जयंती कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. कॉंग्रेलच्या आमदार प्रणिती शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सर्वानुमते चर्चेतून भाजपाच्या धरती देवरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुपारी 3 वाचता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची विशेष सभा.
बच्चू कडू आघाडीचा धर्म पाळणार. बच्चू कडू नवनीत राणा यांना पाठिंबा देणार बच्चू कडू यांचे आभार. प्रहार जर युती धर्म पाळला तर आम्हीही विधानसभा निवडणुकीत युती धर्म पाळू, असे रवी राणा यांनी म्हटले आहे.
PAP घोटाळ्याचा प्रसाद हा शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे. PAP घोटाळ्यात पवार परिवार सामील आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
हल्ल्याचे कनेक्शन सतेज पाटील यांच्या र्यंत पोहचत असेल तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हावा. सतेज पाटील यांनी काल कार्यकर्त्यांना उचकवण्याचे काम केले आहे, असे धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे.
शिर्डीतील शरद पवाराच्या गटाला रोहित पवार अनुपस्थित आहेत. रोहित पवार परदेशात असल्यामुळे ते आज शिबिराला आहे नाहीत असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळी रोहित पवार या शिबिराला उपस्थित राहतील असंही त्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांनी पवारांवर केलेले आरोप असत्य. पक्ष फोडून काही झालं नाही त्यामुळे पवारांवर आरोप करत आहेत असं जयंत पाटील म्हणाले.
सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे. केदार यांच्या जामीन अर्जावर राज्य सरकारला हायकोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
कुर्ला आणि भांडूपमध्ये 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
“राज्य सरकारच्या नेतृत्वात महिला संरक्षण हा महत्वाचा विषय आहे. आज आम्ही ओबीसी महामंडळाकडून एक पोर्टल लाँच करत आहोत. महिला बचत गटाला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज आम्ही देणार आहोत. त्याचं व्याजदेखील राज्य सरकार देईल. मुख्यमंत्र्याच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन होईल,” अशी माहिती अतुल सावे यांनी दिली.
केरळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज केरळ राज्याचा दौरा आहे. त्रिशूर शहरामध्ये महिलांच्या रॅलीला पंतप्रधान संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा दौरा महत्त्वाचा आहे. महिलांच्या रॅलीत पंतप्रधान नवी काही घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
नवी दिल्ली – अदानी हिंडबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज आपला निकाल देणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठ या प्रकरणाचा निकाल देणार आहे. 24 नोव्हेंबरला या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला होता. अदानी समूहाच्या संदर्भात आलेल्या हिंडबर्ग रिपोर्टच्या आधारावर कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल केल्या होत्या. त्यात या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष एजन्सीकडून किंवा एसआयटी कडून चौकशी करण्याची मागणी केली होती.
अदानीच्या शेअरमध्ये फेरफार केल्याचा आरोप याचिकेत लावला होता. त्यावेळी कोर्टाने निकाल राखून ठेवता सेबीकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली गेली आहे असं म्हटलं होतं. सेबीच्या चौकशीवर अविश्वास दाखवणे योग्य नसल्याचे कोर्टाने म्हटलं होतं.
वसई- ट्रकचालकांच्या देशव्यापी संप जरी मिटला असला तरी संपाचा फटका आज तिसऱ्या दिवशीही वसई विरार नालासोपारा परिसरातील पेट्रोल पंपाला बसला आहे. पेट्रोल डिझेलचे टँकर पंपावर आलेच नसल्याने वसई विरार नालासोपाऱ्यात पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे. ज्या पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी वाहनधारकांची पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
महानंदा हा ब्रँड पण गुजरातला पळविण्याचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हा प्रकल्प गुजरातला जात असेल तर उद्धव ठाकरे गट त्याला विरोध करणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात धुतराष्ट्राचं सरकार असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्ट गुजरातला पळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे जाणार आहेत. येथे ते नगद नारायणचे दर्शन घेतील. जरांगे पाटील अंतरवाली मधून नारायणगढ कडे रवाना झाले आहेत. नारायणगड येथे एक धार्मिक सप्ताहाला भेट देण्यासाठी जरांगे पाटील जात आहेत.
उत्तर प्रदेश एटीएसने छत्रपती सभाजीनगर शहरातील 14 जणांना नोटीस बजावली आहे. 15 ते 18 जानेवारीदरम्यान लखनऊमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जानेवारी 2024मध्ये होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. यात सदर कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर उत्तर प्रदेश एटीएस अलर्ट झाले. उत्तर प्रदेश एटीएसने ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला. युपी एटीएस पथक शहरात तपासासाठी आले होते. त्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील 14 जणांना नोटीस बजावली आहे.
नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहे. सावित्रीबाईंच्या जन्म झालेल्या वाड्यापासून दिंडीला सुरुवात होणार आहे. दिंडीसह शोभायात्रा देखील काढण्यात येणार. नायगावमधील सर्व महिला भगिनी दिंडीत सहभागी होणार आहेत. यंदा शोभायात्रेत जिवंत देखाव्याचा देखील आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाईंच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण जिवंत देखाव्यातून सादर करण्यात येणार आहे.
छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते नाहीत,सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला,त्यामुळे भुजबळांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात एकही ओबीसी नेता होऊ शकला नाही,असा गंभीर आरोप अखिल भारतीय परीट समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी केला आहे. तसेच राज्यातल्या 12 बलुतेदारांचा भव्य ओबीसी महामेळावा येत्या 21 जानेवारी रोजी सांगली मध्ये पार पडणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
भंडारा-गोंदिया मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. पार्थ पवार हे सध्या जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा लढविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.
सोने-चांदीने नवीन वर्षाला दरवाढीची सलामी दिली. गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात मौल्यवान धातूने जोरदार मुसंडी मारली होती. शेवटच्या आठवड्यात एकदाच भाववाढीला ब्रेक लागला होता. नवीन वर्षांत सोने-चांदीने उसळी घेतली. आता सोने लवकरच 65 हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. नवीन रेकॉर्ड पण या काळात होऊ शकतो.
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सयाजी शिंदे अंतरवाली सराटीमध्ये आले आहेत. जरांगे पाटील आज मुंबई समन्वयक यांच्या सोबत बैठक घेणार आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज सकाळपासून वाहतूक सुरळीत सुरू. महामार्गावरील मुंबई आणि गुजरात दोन्ही लेनवर वाहतूक सुरळीत. महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध. महामार्गावर सध्या कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती नाही.
अहमदनगर शहराजवळ नागरदेवळे गावात दोन गटात तुफान राडा. मुलांच्या भांडणातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू. लहान मुलांची भांडण झाल्यानंतर रागाने का बघतो या कारणावरून झाली हाणामारी, तर भिंगारकॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधात हाणामारी आणि खुनाचा प्रयत्न केलाचा गुन्हा दाखल
वाहतूकदरांचा संप अखेर मागे. APMC मध्ये परराज्यातून गाड्या येण्यास सुरुवात झाली आहे. काल एपीएमसीमध्ये गाड्या नसल्याने भाजांचे दर हे 10 ते 20 टक्के वाढले होते. मात्र सध्या ते दर दहा टक्के वाढलेलेच आहेत. मात्र कालच्या तुलनेत आज नवी मुंबईकरांना व गृहिणींना दिलासा आहे. परराज्यातून अर्थात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश माल येण्यास सुरुवात झालेली आहे. परराज्यातून वाटाणा व गाजर देखील आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता सातारा नायगांवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी वर्षा निवस्थानी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषद दावोस येथील दौर्याबाबत पूर्वचर्चा आणि प्रधानमंत्री मोदी यांच्या नियोजित नाशिक दौऱ्याबाबत केंद्रीय मंत्र्यांसमवेत पूर्वतयारीचा आढावा घेत महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप डिझेल पंप रात्रीपासूनच बंद आहे. अमरावती शहरातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही, असे फलक लागले आहेत. सकाळी 11 नंतर अमरावती जिल्ह्यातील पंपावर पेट्रोल आणि डिझेल येणार आहे. पेट्रोल डिझेल पंपावर पेट्रोल डिझेल नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. संप मागे घेतला मात्र 11 वाजता नंतर पेट्रोल पंप सुरळीत होणार आहे.
संप मिटला, मात्र सर्वसामान्यांचे हाल कायम आहेत. अनेक पंपांवर पेट्रोलचा खडखडाट पाहायला मिळतोय. दुपारनंतर टँकर येणार असल्याची माहिती आहे. काल संप मिटला असला, तरी बहुतांश पंपांवर अद्याप टँकर पोहोचलेले नाहीत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी नाशिककरांची पळापळ कायम आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त सावित्रीमाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नायगाव फुलं, रांगोळ्यांनी सजलं आहे. गावातील अनेक घरांवर गुडी उभारली गेली आहे. नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक देखील सजलं आहे. स्मारकाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील स्वस्त रेशन दुकानदार बेमुदत संपावर आहेत. 14 सूत्रे कार्यक्रम मंजूर करावा केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदार संपावर गेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 999 रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे.
देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा सुरु असलेला संप मागे घेण्यात आला आहे. नव्या मोटारवाहन कायद्याविरोधात हा संप पुकरण्यात आला होता. यावर आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलं. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक झाली. यात संप मागे घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. त्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे.