Maharashtra News Live | अमित शाह यांचा काँग्रेसवर घणाघात, नक्की काय म्हणाले?
Maharashtra Mumbai Marathi News Live : आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.
मुंबई : आज दीपावली पाडव्याच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी पाडव्या निमित्त पुण्यातील सारस बागेत पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. आज गोविंद बागेत पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी पवार कुटुंब एकत्र येते. शरद पवार सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते, नागरिक यांच्याकडून दिवाळी शुभेच्छांचा स्वीकार करतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आज गोविंद बागेत अजित पवार येणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान सोमवारी रात्री श्रीनिवास पवार यांच्या घरी दिवाळीच्या निमित्ताने स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला पवार कुटुंब दुसऱ्यांदा एकत्र आलं. खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे फोटो इन्स्टावर शेअर केले. य फोटोत अजित पवार दिसले नाहीयत. पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Pune News | बारामती तालुक्यात 450 नवीन कुणबी नोंदी सापडल्या
बारामती : बारामती तालुक्यात 450 नवीन कुणबी नोंदी सापडल्या आहेत. 40 गावातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने प्रशासनाला दिलेल्या सूचनेनुसार सर्व तालुक्यातून सध्या कुणबी नोंदीचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात नव्याने तब्बल 450 नवीन नोंदी सापडल्या असून 40 गावातील कुणबी नोंदी तपासणी काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.
-
Amit Shah | मोदी सरकारने मध्य प्रदेशला 9 वर्षातच वाढीव पैसे दिले
नवी दिल्ली | मध्यप्रदेश राज्यात काँग्रेसचं 10 वर्ष राज्य होतं. या दरम्यान काँग्रेसने राज्याला फक्त 2 लाख कोटी रुपये दिले. तर मोदी सरकराने 9 वर्षातच 2 लाख कोटीने वाढवून 6 लाख 33 हजार कोटी रुपये दिले. असं म्हणत शाह यांनी मोदी सरकारने मध्यप्रदेशसाठी काय केलं ते सांगितलं तसेच काँग्रेसवर टीका केली.
-
-
Amit Shah | काँग्रेस 70 वर्षांपासून राम मंदिरावरुन लक्ष हटवत होती, अमित शाह यांची काँग्रेसवर टीका
नवी दिल्ली | अमित शाह यांची राम मंदिरावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस 70 वर्षांपासून राम मंदिरावरुन लक्ष हटवत होती, अशा शब्दात शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तसेच 2019 मध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आता राम मंदीर निर्माणाधीन आहे, असंही शाह यांनी नमूद केलं.
-
गजानन कीर्तीकर यांच्यासोबत लोकसभेच्या जागेवरुन वाद
मुंबई | उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्यात वाद रंगला आहे. या मुद्द्यावरुन रामदास कदम काही वेळात वर्षा बंगल्यावर दाखल होणार आहेत. दोघांमधील टोकाचा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी आता मुख्यमंत्री स्वता मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारीच शिवसेना नेते रामदास कदम यांना फोनकरून वर्षावर चर्चेसाठी बोलावलं आहे. त्यामुळे आता चर्चेत काय होतं, याकडे राजकीय विश्वाचं लक्ष असणार आहे.
-
काँग्रेस जिथे येते तिथे फक्त विनाशच आणते – पंतप्रधान मोदी
शाजापूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेसकडे ना संघटनेत ताकद आहे, ना हेतू. राजस्थान आणि छत्तीसगड बघा, कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली आहे. आता त्यांना लॉकर उघडण्याची भीती आहे. काँग्रेस जिथे येते तिथे फक्त विनाशच आणते. त्यामुळे मध्य प्रदेशला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
-
-
उत्तराखंड : हिवाळ्यासाठी गंगोत्री धामचे दरवाजे बंद
हिवाळ्याचा हंगाम असल्याने आजपासून गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
-
लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात
लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. लोकसभेसाठी मविआची 44 जागांवर बोलणी पूर्ण झाली आहे. ठाकरे गट 19 ते 21, काँग्रेस 13 ते 15, शरद पवार गट 10 ते 11 जागा लढेल. तर चार जागांवर चर्चेतून निर्णय निघेल. महाविकास आघाडीत दोन जागा राखीव ठेवण्यात आला आहे. अकोला आणि हातकणंगलेची जागा राखीव ठेवल्या आहेत. वंचित आल्यास अकोल्याची जागा दिली जाईल. वंचित न आल्यास जागा काँग्रेसकडे जाईल. हाणकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत न आल्यास ही जागा पवार गट लढवणार आहे.
-
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी हल्ला, तीन ठार
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये दोन जवानांसह तीन जण ठार झाले. पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने एक निवेदन जारी केले की, सोमवारी उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील मीर अली तहसीलमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. यादरम्यान एक दहशतवादीही मारला गेला आहे.
-
ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण दौरा काढणार- शेंडगे
ओबीसी आरक्षण बचावासाठी आता जनजागरण दौराचं आयोजन करण्यात आलं आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ही घोषणा केली आहे. मराठा कुणबी हा काय विषय आहे यावर प्रबोधन केलं जाईल. 16 नोव्हेंबरपासून मराठवाड्यात दौरा काढणार असं शेंडगेंनी म्हंटलं आहे.
-
‘आप’ने 9 वर्षांत प्रदूषण रोखण्यासाठी कोणतेही काम केले नाही – गंभीर
दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणावर भाजप खासदार गौतम गंभीर आप पक्षावर बरसले. केवळ दिवाळीतच नव्हे तर वर्षभर प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे. दिल्ली सरकारने पायाभूत सुविधांवर खर्च करणे आवश्यक आहे. गेल्या 9 वर्षात धुळीच्या प्रदूषणावर कोणतेही काम केले गेले नाही, व्हॅक्यूम क्लिनर किंवा फवारणी यंत्रे आणली गेली नाहीत आणि तसेच कृत्रिम पाऊस पाडला गेला नाही. दिल्लीतील 70% मुले नेब्युलायझरवर आहेत.
-
Maharashta News : दिवाळीच्या दिवशी शरद पवार यांनी जवळपास अडिच हजार लोकांची भेट घेतली
दिवाळीच्या दिवशी शरद पवार यांनी जवळपास अडिच हजार लोकांची भेट घेतली. दिवाळी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते शरद पवारांना भेटायला आले होते. लोकांच्या तेहऱ्यावरचा उत्साह मला दिसत होता असं शरद पवार म्हणाले.
-
Maharashta News : विठ्ठल रूक्मिणी मातेचा गाभारा फळांनी सजला
कार्तीकी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला सुंदर अशी फळांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी पाच टन फळांचा वापर कण्यात आला आहे.
-
Maharashtra News : आग लावली तेव्हा कुटूंब घरी होतं- नेहा क्षीरसारग
बीडमध्ये घरावर झालेल्या हल्ल्यानंतर नेहा क्षीरसागर यांनी प्रतिकीया दिली आहे. घराला आग लावली तेव्हा संपूर्ण कुटूंब घरातच होतं असं नेहा क्षीरसागर म्हणाल्या. जाळपोल करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.
-
उद्यापासून मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात
धाराशिव : जिल्ह्यातील वाशी, परंडा येथे मनोज जरांगे यांची उद्या सभा होणार आहे. वाशी व परंडा येथील सभेची तयारी सुरू असून पुर्ण, वाशी येथे सकाळी 11 वाजता तर परंडा येथे दुपारी 2 वाजता होणार आहे. मराठा आरक्षणासाठी उद्यापासून मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात करतील. 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात 9 जिल्ह्यात 24 गाठीभेटी सभा घेणार आहेत.
-
ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊसाचे ट्रॅक्टर सोडणार नाही, स्वाभिमानीचा निर्धार
सांगली : मौजे डिग्रज येथे ऊस अडवल्यानंतर साखर कारखानदारांनी डिग्रज येथे धाव घेतली. दत्ता इंडिया संचलित वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि संचालकांची स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना धारेवर धरले आहे. मात्र कारखानदार आणि स्वाभिमानीची चर्चा निष्फळ ठरली आहे. ऊस दराची कोंडी फुटल्या शिवाय आडवलेले ऊसाचे ट्रॅक्टर न सोडण्याचा स्वाभिमानीचा निर्धार आहे.
-
शाखा तोडण्याची भूमिका योग्य नाही – शरद पवार
मुंब्र्यातील शाखा तोडफोडीवरून शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शाखा तोडण्याची भूमिका योग्य नसल्याचे मतही शरद पवार यांनी व्यक्त केली.
-
अनेक जिल्ह्यातील लोकं बारामतीत त्यामध्ये ७० टक्के तरूणाई – शरद पवार
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यातील लोकं बारामतीत आले, त्यांनी पाडव्याच्या शुभेच्छा आम्हाला दिल्या. नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावो, असे ते म्हणाले, लोकांचे चेहरे बघतो तेव्हा किती समाधान आहे असं दिसतं तर यामध्ये ७० टक्के लोकं हे तरुण आहेत. माझ्यात आणि त्यांच्यात अंतर आहे. नविन पिढी आले.
-
गेली ५० वर्षापासून पाडव्याच्या दिवशी लोकं बारामतीत येतात – शरद पवार
गेली ५० वर्ष ही पद्धत पाडव्याच्या दिवशी लोकं बारामतीत येतात. अलीकडच्या काळात त्यात वाढ झाली आहे. यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे आता २ दिवस आधीच लोक येतात. त्यामुळे मी २ दिवस आधी लोकांना भेटलो.
-
आज अजित पवार शरद पवारांच्या बाजूला असते तर आनंद झाला असता- प्रशांत जगताप
आज अजित पवार शरद पवारांच्या बाजूला असते तर आनंद झाला असता. पण आता राजकारणातील गोष्टी बऱ्याच पुढे गेल्या आहेत. आम्ही आज शरद पवार साहेबांना भेटलो असून आम्ही अजित पवारांना भेटायला जाणार नसल्याचं शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
-
बीडच्या राष्ट्रवादी भवनमध्ये रोहित पवारांकडून पाडवा साजरा
पाडव्यानिमित्त रोहित पवार बीडमध्ये आले आहेत. पवार कुटुंबाचं क्षीरसागर कुटुंबाकडून स्वागत करण्यात आलं. जाळपोळ झाल्यानंतर राष्ट्रवादी भवन मध्ये रोहित पवारांनी पाडवा साजरा केला.
-
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यामध्ये 7 नोव्हेंबर पासून कांदा लिलाव बंद
एकीकडे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यामध्ये 7 नोव्हेंबर पासून कांदा लिलाव बंद होणार आहे. तर दुसरीकडे लासलगावचे उपबाजार विंचूर येथे कांदा लिलाव सुरु झालाय. 750 वाहनातून 10 हजार उन्हाळ आणि नवीन लाल कांद्याची आवक विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विंचूर येथे नवीन लाल कांद्याच्या लिलावाचे शुभारंभ, 4 हजार 500 रुपये मिळाला नवीन लाल कांद्याला उच्चाकी बाजार भाव, तर उन्हाळ कांद्याला जास्तीतजास्त 4500 रुपये, कमीतकमी 2100 तर सरासरी 3800 रुपये इतका प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे.
-
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात 4 आरोपींची नावे निष्पन्न
अंमली पदार्थ प्रकरणात आणखी 4 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. हे 4 ही जण राज्यातील विविध कारागृहात असल्यामुळे त्यांना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे पुण्यात आणले जाणार आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात येत आहे. अरविंदकुमार लोहरे हा या टोळीचा प्रमुख असून त्याने ललित पाटील याला येरवडा कारागृहात मेफेड्रान बनविण्याचे सूत्र दिले होते, असे आत्तापर्यंतच्या तपासातून निष्पन्न
-
आशिष शेलार यांच्या टीकेबाबत बोलताना संजय राऊतांकडून घणाघाती टीका
कोण आशिष शेलार? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. अजित पवारांवर बोलता का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींचा आरोप केला. हसन मुश्रीफ, राहुल शेवाळे, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्याविषयी का बोलत नाही? तुमची चड्डी सुटली आहे. लोंबते आहे. नाडी सुटली ना? इक्बाल मिर्चीवर बोलता का? आमचा कचरा तुमच्या डंपिंगमध्ये घेतला ना?, असं ते म्हणाले.
-
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा कोल्हापुरात पालकमंत्र्यांकडून सत्कार
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्कार केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने सिकंदरचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सिकंदर शेखला दोन लाख 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
-
सांगलीत ऊस आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर
सांगलीत ऊस आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. तब्बल 12 तासांपासून सांगलीत ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. मौजे दिग्रजमध्ये ऊसाने भरलेले ट्रॅक्टर अडवण्यात आले आहेत. त्यामुळे 2 किलोमीटर अंतरापर्यंत गावात ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. निर्णय झाल्याशिवाय गाड्या न सोडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निर्धार केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर शहरात फटाक्यांमुळे 13 जण भाजले
छत्रपती संभाजीनगर शहरात फटाक्यांमुळे 13 जण भाजले. फटाके घेऊन मित्रांची मस्करी आणि हलगर्जीपणा भोवला. मित्राने लावलेल्या फटाक्यामुळे एकाचा डोळा भाजला. तर 3 चिमुकले, 7 किशोरवयीन आणि दोन तरुणांनाही दुखापत झाली. फटाक्यांमुळे भाजलेल्या 10 जणांना डिस्चार्ज तर 3 जणांवर उपचार सुरू आहेत.
-
31 डिसेंबरनंतर सरकारमधील गँगवॉर आणखी वाढेल- संजय राऊत
फुटीर गट शिवसेनेचं नाव बदनाम करत आहे. 31 डिसेंबरनंतर सरकारमधील गँगवॉर आणखी वाढेल. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
-
पुणे – मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील हवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील हवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड मधील हवेची गुणवत्ता ढासळली. दोन्ही शहरात वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळल्याने पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-
छत्रपती संभाजी नगर शहरात फटाक्यांमुळे 13 जण भाजले
दिवाळीच्या आनंदाला गालबोट लागले आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात फटाक्यांमुळे 13 जण भाजले. फटाके घेऊन मित्रांची मस्करी आणि हलगर्जीपणा भोवला. जखमी झालेल्या 10 जणांना डिस्चार्ज मिळाला असून 3 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
-
रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा 17 नोव्हेंबरपासून होणार सुरू
रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. नगर जिल्ह्यातील चौंडी येथून यात्रेला पुन्हा होणार सुरुवात.
युवा संघर्ष यात्रेमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील पदयात्रेमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होतील.
-
कोल्हापूर – दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे सुरू, किती दर मिळणार याकडे लक्ष
कोल्हापूरमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाच्या सौद्यांना सुरूवात झाली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर मार्केट यार्ड मध्ये मान्यवरांच्या सौदे निघणार आहेत.
यावर्षीच्या गुळाला किती दर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
अहमदनगरच्या गुहा गावात आज सर्व व्यवहार सुरळीत, काल दोन गटात झाली होती मारहाण
अहमदनगरच्या गुहा गावात आज सर्व व्यवहार सुरळीत आहेत. गावात शांततेच्या वातावरणात सकाळची आरती झाली. पूजेवरून दोन गटांत काल मारहाण झाली होती, त्या पार्श्वभूमीवर गावात पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.
-
पुणे : विहिरीत पडलेल्या बिबट्याता बछडा आणि मादीला वाचवण्यात वन विभागाला यश
आंबेगाव तालुक्यात दोन ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला व मादी बिबट्याला वाचविण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. आंबेगाव तालुक्यातील राजणी येथे विहिरीत बिबटयाचा बछडा पडला होता तर लौकी येथे विहीरीत मादी पडली होती. रेस्क्यू टिम आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याच्या बछड्यांला व विहीरीच्या बाहेर काढण्यात आले.
-
Live Update : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी जमली आहे. स्थानिक भाविकांसह बाहेरून आलेल्या भाविकांच्या गर्दीने अंबाबाई मंदिराचा परिसर फुलला आहे.
-
Live Update : मुंबईत 278 ठिकाणी बांधकाम थांबविण्याचे आदेश
मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आणि त्यामुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. बांधकामांच्या ठिकाणी अमलात आणण्यासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्याचे पालन न केल्यामुळे आतापर्यंत तब्बल २७८ विविध स्वरूपाच्या बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस देण्यात आली आहे.
-
Live Update : माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला
माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. कराडचे आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्या सोबत आहेत. बाळासाहेब पाटील यांच्यासह अशोक पवार, यशवंत माने यांनी देखील दिवाळी निमित्त पवारांची भेट घेतली.
-
Live Update : सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी थोडी संवेंदशीलता दाखवली पाहिजे – सुप्रिया सुळे
राज्य सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांनी थोडी संवेंदशीलता दाखवली पाहिजे.. असं वक्तव्य सुप्रिय सुळे यांनी केलं आहे. ‘राज्यात आरक्षणाचे प्रश्न आहेत महागाई, बेरोजगारी असे प्रश्न आहेत.. दुष्काळाचे मोठं संकट आहे. त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफी करावी.’ असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
Live Update : दिवाळी पाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची गर्दी
दिवाळी पाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची गर्दी जमली आहे. पहाटेपासून गणपतीच्या दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी जमली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक देखावा करण्यात आला आहे.
-
Diwali 2023 : फटाक्यांमुळे मुंबईत किती ठिकाणी आगी लागल्या?
प्रदूषण होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालय, राज्य सरकार आणि महापालिकेने 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. अस असताना नागरिकांनी मात्र नियमावलीकडे दुर्लक्ष करीत सायंकाळपासून सकाळपर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली. यातच फटाक्यांमुळे मुंबईत 27 ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्याने अग्निशमन दलाचीही तारांबळ उडाली.
-
Maharashtra News : ऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक
ऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आष्टा जवळ ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीपासून रोखून धरली. दुसरीकडे दत्त इंडिया कारखान्याच्या कुमठे मधील विभागीय कार्यालयाला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना टाळे ठोकले.
-
Pune news | सारस बागेत पुणेकरांची मोठी गर्दी
दिवाळी पाडव्यानिमित्त पुण्यातील सारस बागेत पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासून अनेक पुणेकर सारसबागेत आहेत. सारसबागेत असणार पेशवे कालीन गणपती मंदिर भक्तांनी गजबजलं. सारस बागेतील गणपतीच्या दर्शनाला नागरिकांची मोठी गर्दी. सारसबाग परिसरात दिवाळी पाडव्याचा उत्साह
-
Sharad pawar | अजित पवार गोविंद बागेत येणार ?
बारामतीच्या गोविंद बागेत राष्ट्रवादी काँग्रसचे कार्यकर्ते जमले आहेत. शरद पवार कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. गोविंद बागेत मंडप उभारण्यात आला आहे. शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. अजित पवार गोविंद बागेत येणार का? हा प्रश्न आहे.
Published On - Nov 14,2023 7:34 AM