मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासच्या मुद्द्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका स्पष्ट करणार. दुपारी राष्ट्रवादीची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी ग्रामीण कौशल्य विकास केद्रांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. इस्रायल आणि हमास दरम्यानचं युद्ध सुरूच आहे. हमासच्या प्रमुखांविरोधात इस्रायलने डेथ वॉरंट काढलं आहे.
पुणे | भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यातील भिडेवाडा संदर्भात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालाय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश ही त्यांनी दिली आहेत.
अहमदनगर | अहमदनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. माळीवाडा बस स्थानकासमोरील इमारतीला आग लागली आहे.अंबर प्लाझा इमारतीत तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाल आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
मुंबई | बहुजनवादाचा बुरखा पांघरणारा लांडगा राज्यात राहतो. महाराष्ट्रात भांडण कोण लावतो, हा लांडगा सगळ्यांना माहितीये, अशी टीका गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली.
मीरा बोरवणकर यांनी या संदर्भातील पुरावे सादर करावे. कायद्याची भाषा त्यांना जास्त कळते. मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण आहे अशी आम्हाला शंका आहे. त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा आम्ही कार्यवाही करणार असे, रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
मीरा बोरवणकर यांनी या संदर्भातील पुरावे सादर करावे. अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार. कायद्याची भाषा त्यांना जास्त कळते. १२ वर्षानंतर हे आरोप कसे केले जातात. आम्ही न्यायालयात जाणार, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थान परिसरात आदिवासी युवकांचं ठिय्या आंदोलन तीन तासानंतरही सुरूच आहे. नवनीत राणा आणि आंदोलकांमधील चर्चा निष्फळ झालीये. रस्त्यावर बसून युवकांचे ठिय्या आंदोलन सुरूच आहे.
पुण्यातील भिडे वाड्याचा निकाल पुणे महानगरपालिकेच्या बाजूने लागलाय. न्यायालयाच्या निकालाच्या समर्थनात भाजपचा पुण्यात जल्लोष बघायला मिळतोय. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी महापालिकेने केली होती याचिका दाखल.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 6 निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. गरज पडल्यास रॅलींची संख्या वाढवता येईल. भाजपा तेलंगणात 40 मोठ्या निवडणूक रॅली काढणार आहे. जेणेकरुन तेलंगणातील सर्व विधानसभा जागा कव्हर करता येतील. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं असून आझाद मैदानात निश्चित झालं आहे. मुंबईत शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा, तर शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर होईल.
एका महिलेने 26 आठवड्यांच्या गर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली होती. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने गर्भपाताची परवानगी नाकारली आहे. एम्सच्या अहवालात गर्भात बाळ सामान्य असल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने हा निर्णय घेतला.
अहमदनगरमध्ये DMU ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळत आहे. पॅसेंजर ट्रेनच्या पुढील दोन डब्यांना आग लागल्याचे तपासात समोर आले आहे. दरेवाडी गावाजवळील गेट क्रमांक २ येथे ही घटना घडली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अजित दादा यांचं नाव मी पुस्तकात कुठे घेतलं नाही. पण ते पालकमंत्री होते. त्यांचं असं म्हणणं होतं की ही प्रक्रिया संपलेली आहे तुम्ही हँडओव्हर करा. या प्रोसेसमध्ये जर आधीचे कमिश्नर होते तर त्यांनी का हँडओव्हर केलं नाही. मलाच तेव्हा असं का सांगितलं गेलं.
एक बिल्डर तुमच्याकडे येतो आणि तो सांगतो काही जागा इथे आणि काही जागा तिथे आहे. मधे तुमचं पोलीस स्टेशन पडतं. तो शासनाला विनंती करतो तुम्ही तुमचं पोलीस स्टेशन हटवा आणि ही जागा मला द्या. मी तेव्हा पुणे पोलीस कमिश्नर होते. आमचं म्हणणं असं होतं की पोलिसांच्या जागा त्याला देऊ नका.
मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकाचं अनावरण आहे. या पुस्तकात त्यांनी आतापर्यंतची कारकिर्द मांडली आहे. 38 चॅप्टरमधून वेगवेगळ्या प्रकरणांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. तसेच येरवडा पोलिसांच्या जमीन लिलावाबाबतही सांगितलं आहे. त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर आरोप केला आहे.
कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी घरात आल्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर 30 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण कोळशेवाडी पोलीस स्थानकात रितेश मिश्रा नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
भूषण पाटील ड्रग्स प्रकरणी तपास अधिकारी यांना कोर्टाने फटकारले आहे. सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांना कोर्टाने नोटीस दिली आहे. पोलीस गणवेश न घालता तपास अधिकारी कोर्टात न्यायाधीश यांनी नोटीस काढली आहे. तुम्ही जबाबदार पदावर आहात तुम्हाला हे वागणं शोभत नाही, कोर्टाने पोलिसांना ऐकवले आहे. तर कोर्टात येताना गणवेश का परिधान केले नाही याचे उत्तर पुढच्या १५ दिवसात द्या, कोर्टाने सहायक पोलिस आयुक्तांना अशी नोटीस दिली आहे.
नाशिक : ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाशिक-मुंबई-पुणे पोलिसांच्या वतीने ड्रग्स प्रकरणी ही संयुक्त कारवाई करण्यात आली. नाशिक ड्रग्स प्रकरणी संयुक्त कारवाईत आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली. नाशिकमध्ये तयार होणाऱ्या ड्रग्सची विक्री नाशिक बाहेरच होत असल्याचे समोर आले. नाशिकमधील दोन कारखाने एकाच टोळीचे असल्याचा मोठा खुलासा पोलीस आयुक्त अंकुश शिंदें यांनी केला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या सर्व खासदारांची आज वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा दसरा मेळावा तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. पूर्ण शक्तीनिशी हा मेळावा यशस्वी करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी तरुणांची शिक्षक, तलाठी, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, वनपाल,कोतवाल, सह आदी पदभरती करण्याची मागणी अमरावतीत तरूण-तरूणींनी केली. यासाठी खासदार नवनीत राणांच्या निवासस्थान परिसरात आदिवासी तरुण-तरुणींनी ठिय्या आंदोलन केले. मेळघाटमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी देण्यात यावी तसेच पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. तरुणांच्या आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलाय. तोडगा निघेपर्यत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आदिवासी तरुणांनी इशारा दिला आहे.
सोलापूर : शहरातील रंगभवन शेजारी असलेल्या दुकानांना मोठी आग लागली आहे. या आगीत लाखोंचे फर्निचर जळून खाक झाले. शेजारी असलेल्या झोपडपट्टीतील घरांनाही आगेची झळ बसली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
पुणे : आदिवासी जमातीतील कोणत्याही आमदाराने टिका केली तरी मला काही वाटत नाही. कारण ते आमचे भाऊबंद आहेत. त्यामुळं ते काहीही बोलले तरी मला काही वाटत नाही. मी राज्यभर फिरतोय त्यामुळे त्यांचा रोष माझ्यावर असेल. त्यांचं आमचं भांडण नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत असं शपथपत्रावर लिहून देत हे भांडण मिटवलं. त्यामुळे आमची लढाई एकदम रास्त मार्गाने सुरु आहे.
धुळे : धुळ्यात भारत राष्ट्र समितीच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला. 62 हजार सरकारी शाळा खाजगी स्तरावर चालवण्यासाठी देण्याचा घाट घातला असल्याचा आरोप यावेळी भारत राष्ट्र समितीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी केला.
नागपूर : ५८ कोटीची ऑनलाईन गेमिंग फसवणूक करणारा आरोप अनंत उर्फ सोंटू जैन याने न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. सोंटू जैन याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर सुरुवातीला दीड महिना तो दुबईला पळून गेला होता. भारतात परतल्यानंतर त्याला काही दिवस अटकपूर्व अग्रीम जामीन मिळाला होता. मात्र, तो जामीन रद्द होताच सोंटू जैन पुन्हा एकदा पळून गेला होता. आज तो अचानक न्यायालयासमोर हजर झाला. त्याने न्यायालयासमोर शरणागती पत्करली.
रायगड : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या आत्मचरित्र पुस्तकामध्ये केलेले विधान हे पुस्तकाचा खप वाढावा म्हणून केले असावे असा टोला राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला. त्याला महत्त्व नाही असे मी म्हणत नाही पण, कुठल्याही प्रकारे त्या प्रकरणाचा संबंध पालकमंत्र्यांशी येत नाही. मीरा बोरवणकर यांनी जे लिहिलेला आहे ते किती फोल आहे याची प्रचिती पाहायला मिळाली असेही ते म्हणाले.
ललीत पाटील ड्रग्ज प्रकरण. भूषण पाटील आणि अभिषेक बालकवडे यांची आज पोलिस कोठडी संपणार. आज ३ वाजता पुणे न्यायालयात केलं जाणार हजर. पुणे पोलिसांना त्यांची आणखी पोलिस कोठडी वाढवून मिळणार का ? दुपार नंतर होणार सुनावणी
आम्हीही भुजबळांविरोधात काही बोलणार नाही. भुजबळांनी विरोध केल्यानंतरच आम्ही बोलतो. मराठा आरक्षणाविरोधात भुजबळांनी बोलणं बंद करावं. मराठा आरक्षण आमच्या हक्काचं! मराठा कुणबी असल्याचे 5 हजार पुरावे सापडले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर आम्ही ठाम. आमच्या कुणबी प्रमाणपत्राला विरोध का? – मनोज जरांगे पाटील
आमच्या कुणबी प्रमाणपत्राला विरोध का? भुजबळांनी विरोध केल्यानंतरच आम्ही बोलतो. सरकारनेच आमच्याकडे वेळ मागितला. आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेला नाही. सरकारला दिलेली वेळ संपत आली, आता 8 दिवस शिल्लक.
मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर पुस्तकात अजित पवारांबद्दल केला गौप्यस्फोट. येरवड्यातील गृह विभागाची 3 एकर जागा ही एका बिल्डरला देण्याचं प्रस्तावित होतं. मात्र मीरा बोरवणकर यांनी याला विरोध केला. सध्या या जागेवर येरवडा पोलिस स्टेशन आणि वाहतूक विभागाचं कार्यालय आहे.
सोलापूरातील चिंचोली एमआयडीसीत पोलीसांनी छापा टाकून 8 किलोग्रॅम एमडीचा साठा जप्त केला आहे.
स्वच्छ असलेल्यांनी आम्हाला प्रश्न विचारावे अशी टीका उद्धव ठाकरेंवर भाजप नेते आशीष शेलार यांनी केली. क्रिकेट विश्वचषक हा बीसीसीआयचा इव्हेंट नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. बांगलादेशने संत्र्यावर आयात शुल्क वाढवल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसह प्रहारचे कार्यकर्ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत.
मनसे मुंबई उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांच्यासह मनसे पदाधिकारी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने पाहणी करण्यासाठी आले आहेत. दरोरोज किती वाहने टोल वरून जात येत असतात… त्या बाबत cctv कॅमेरे, पिवळा पट्टा, पुरुष शौचालय, महिला शौचालय, रुग्णालय, पिण्याच्या पाण्याची सोय… इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींची पाहणी मनसेकडून करण्यात येत आहे.
पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील पुणे लेनवर आयटीएमएस प्रोजेक्ट अंतर्गत आडोशी बोगद्याजवळ ओव्हर हेड ग्रॅंटी बसवण्यात येणार आहे. आज पुन्हा बारा ते एकच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गावर शिंग्रोबा घाटातून वाहतूक वळवण्यात येणार आहे. उर्वरित जड वाहतुक खोपोली टोलनाका या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
अजित पवार यांच्याकडून निलेश लंकेंच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. ते म्हणाले, “जागृत लोकप्रतिनिधी कसा असावा हे निलेश लंके यांच्या उदाहरणातून स्पष्ट होतं. कोरोना काळात निलेश लंकेंनी कौतुकास्पद काम केलं. आमच्यावर अनेक वेळा घराणेशाहीची टीका होते. तुमच्या घरात कुणीतरी राजकारणात आहे म्हणून तुम्हाला संधी मिळते, असं म्हटलं जातं. मात्र निलेश लंकेंच्या माध्यमातून त्या लोकांना उत्तर आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील यांचा आधुनिक गाडगेबाबा म्हणून उल्लेख व्हायचा. तसंच निलेश लंके यांना आधुनिक श्रावणबाळ म्हटलं जातंय. एक दमदार आमदार म्हणून लंके यांची ओळख आहे.”
“आई मोहटा देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो. अहमदनगर जिल्हा हा तसा पसरलेला जिल्हा आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून याची ओळख आहे. पाणी आपला आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मातेच्या आशीर्वादाने संकट दूर झालं पाहिजे यासाठी आपण साकडं घालुया,” असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.
अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर असून पारनेरमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, “पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांवर संकट उद्भवलं आहे. यंदा उजनी धरण फक्त 60 टक्के भरलंय. काही भागांमध्ये धरणं भरली आहेत, तर काही भागांमध्ये परिस्थिती बिकट आहे.”
अंबादास दानवे यांनी नाशिकच्या शासकीय रुग्णाल्याला भेट दिली. नांदेड घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. त्याचसोबत औषधांची उपलब्धता आणि आरोग्य यंत्रणा यांचीदेखील त्यांनी माहिती घेतली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेत चर्चा करणार आहेत. ड्रग्ज प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत आहेत. नाशिक रोड परिसरात असलेल्या ड्रग्ज कारखान्यांवर मुंबई पोलीस आणि नाशिक पोलिसांनी कारवाई केली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेरच्या हंगा इथं दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या हस्ते ‘माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रे’चा शुभारंभ होणार आहे. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
कोविड काळातील बीएमसीकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या रडारवर आहेत . मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी छापे मारण्यात आले.
आर्थिक गुन्हे शाखा, ईडीच्या तपासानंतर आता आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे.
फुकटच्या मद्यासाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. हॉटेल बंद असतानाही दारूची मागणी केली, नकार मिळाल्यानंतर हॉटेल मॅनेजर आणि वेटरला मारहाण. हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.
वैतरणा ते विरार दरम्यान मालगाडीच्या इंजिनवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली. वैतरणा रेल्वे स्थानकातून मालवाहतूक ट्रेन सुटल्या नंतर केला हल्ला. इंजिनावर दगड मारल्याने इंजिनाच्या काचा फुटून सहाय्यक लोको पायलट जखमी. दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा वसई लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरच्या दौऱ्यावर असून आमदार निलेश लंके यांच्या घरी दाखल झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गावर कायम मोठी वर्दळ पाहायला मिळते. मात्र महामार्गाच्या दुरावस्थेमुळे सातत्याने अपघाताचे सत्र सुरू आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांकडून केली जात आहे.
बाळासाहेब ठाकरे सर्वसमावेशक नेते होते. त्यांनी कोणालाही दूर ठेवलं नाही. शिंदेंचं कार्यक्षेत्र फक्त ठाण्यापुरतंच मर्यादित , असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.
समाजवादी नेत्यांनी कधीही देश तोडण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र संघ परिवार राज्य तोडण्याची भाषा करत असतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या माहिती आहे का ते आधी विचारा, असे संजय राऊत यांनी म्हटले. शिंदेना बाळासाहेब – समाजवादी नेत्यांच्या संबंधांविषयी विचारा.
ठाणे येथील शिळ फाटा या परिसरात एका चालत्या गाडीने अचानक पेट घेतली. चालकासह दोन प्रवासी सुखरूप बचावले. यावेळी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली.
मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवली सराटीत मराठा आरक्षणासंदर्भात सभा घेतली. यासभेवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. त्यावर आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची गाढवावरून धिंड काढू असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे.
पुस्तक प्रकाशन करताना त्याची चर्चा व्हावी, आपण प्रसिद्धी झोतात यावं यासाठी मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर खोटे आरोप केलेले आहेत. मीरा बोरवणकर यांनी यासंदर्भात पुरावे द्यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
नाशिक शहरात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. सध्या नाशिकमध्ये ३३ अंश सेल्सिअस इतके तापमान झाले आहे. दिवसभर ऊन आणि रात्री थंडी यामुळे आजार वाढले आहे. नैसर्गिक फळांचा रस, घरगुती शितपेये, सुती कपडे घालण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.
मुलुंड टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. ठाण्यातील कोपरी रेल्वे ब्रिज ते ऐरोली मार्गापर्यंत मुंबईला जाणाऱ्या लेनच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर. ससून प्रशासनाला जाग. येरवडा कारागृहातून आलेल्या कैद्यांना ड्रेस कोड देण्याचा विचार. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये अशा कैद्यावर उपचार केले जातात. ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये यासाठी हा खटाटोप सुरु असल्याची माहिती. लवकरच आशा कैद्याना ड्रेस कोड दिला जाणार असल्याची माहिती
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात छताचा भाग कोसळून रुग्णालयातील वॉर्डबॉय जखमी झाला आहे. सदानंद गोतारणे वय 28 वर्षे असे जखमी झालेल्या वॉर्डबॉयचे नाव असून त्याला आयसीयू मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री 1.45 वा.ही दुर्घटना घडली.
धाराशिव जिल्ह्यातील 3 तालुक्यात दुष्काळाचे ढग गडद. धाराशिव, वाशी व लोहारा या 3 तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर 2 लागू. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांची माहिती. तीन तालुक्यात प्रत्येकी 5 गावात पीक पाहणी, पाणी टंचाई, भुजल स्तर याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार. 20 ऑक्टोबरपर्यंत अहवाल शासनास कळविला जाणार. त्यानंतर सरकार 30 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करेल. पिकाचे नुकसान 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास दुष्काळ व नुकसान 50 टक्के पेक्षा जास्त असल्यास तीव्र दुष्काळ जाहीर होणार
समृद्धी महामार्गावरील अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक. प्रदीप राठोड आणि नितीन गणोरकर या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक. वैजापूर ग्रामीण पोलिसांनी केली दोन्ही अधिकाऱ्यांना अटक. समृद्धी महामार्गावर ट्रक थांबवल्याप्रकर्णी झाला होता गुन्हा दाखल. महामार्गावर ट्रक थांबवल्यामुळे अपघातात 12 जणांचा झाला होता मृत्यू.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यामुळे ओबीसी समाजात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांच्या ओबीसी सेलच्या बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाची मागणी यावर चर्चा होणार आहे.
संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर काल भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जण ठार झाले. हा अपघात कसा झाला हे समोर आलं आहे. अपघाताचा व्हिडीओ आला असून त्यात आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक थांबवल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
इस्रायलने आता हमासच्या प्रमुखांकडे मोर्चा वळवला आहे. हमासच्या टॉप नेत्यांविरोधात इस्रायलने डेथ वॉरंट जारी केलं आहे. त्यासाठी एक सीक्रेट मिशन तयार केलं आहे. हे मिशन यशस्वी करण्यासाठी इस्रायलचे 10 हजार जवान सज्ज झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी आज दुपारी 12 वाजता खासदारांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि मतदारसंघाचा आढावा यावर चर्चा होणार आहे.