Maharashtra Marathi News Live | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
Maharashtra Mumbai Marathi News Live : आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गुरुवारी रात्री मोठा राडा झाला होता. शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप होत आहे. स्मृतीस्थळावर शिंदे गटाचे कार्यकर्ते दोन तास का थांबले? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे. मनोज जरांगे पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेच्या ३०० जागांसाठी आज मतदान होणार आहे. टोमॅटोचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत. मुंबईतील एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोला ४५ रुपये किलो दर मिळाला आहे. विश्वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. यामुळे आता १९ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगणार आहे. देश, राज्यातील आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर…
LIVE NEWS & UPDATES
-
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई | देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानी जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली आहे.
-
धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इंदापूर बंदची हाक
पुणे | गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी बारामतीत धनगर समाजातील युवक चंद्रकांत वाघमोडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने राज्यातील धनगर समाज आक्रमक झालाय. यावेळी आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इंदापुरातील धनगर समाजाच्या वतीने इंदापूर बंदची हाक देण्यात आली. यावेळी इंदापुरात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहेत. यावेळी उद्या अकरा वाजता पुणे सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलनाका येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आलीय.
-
-
‘तुम्ही महाराष्ट्र सदन घोटाळा करून दोन वर्ष जेलात खडी फोडली, त्याचं काय?’, अंतरवली सराटीच्या गावकऱ्यांचा सवाल
जालना | “मंत्री छगन भुजबळ यांनी संविधानाची शपथ घेवून मंत्री झाले आहेत. त्यांनी अशी एकेरी टीका करायला नको होती. जरांगे पाटील पाचवी जरी शिकले असले तरी ते समाजासाठी काम करत आहेत, त्यांनी सासरवाडीत बसून तुकडे तोडले हे वैयक्तिक बोलायला नको होतं. तुम्ही महाराष्ट्र सदन घोटाळा करून दोन वर्ष जेलात खडी फोडली. त्याचं काय?”, अशी टीका अंतरवली सराटीच्या गावकऱ्यांनी केलीय.
-
रक्तरंजित प्रकार घडला तेंव्हा भुजबळ कुठे होते, अंतरवाली सराटी ग्रामस्थांचा सवाल
जालना | मंत्री छगन भुजबळ यांनी संविधानाची शपथ घेवून मंत्री झाले आहेत. त्यांनी अशी एकेरी टीका करायला नको होती. तसेच रक्तरंजित प्रकार घडला तेंव्हा भुजबळ कुठे होते, असा सवाल अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनी छगन भुजबळ यांना केला आहे.
ग्रामस्थ काय म्हणाले?
जरांगे पाटील पाचवी जरी शिकले असले तरी ते समाजासाठी काम करत आहेत. त्यांनी सासरवाडीत बसून तुकडे तोडले हे वयक्तिक बोलायला नको होते. तुम्ही महाराष्ट्र सदन घोटाळा करून दोन वर्ष जेलात खडी फोडली. त्याच काय?, असा प्रश्नही गावकऱ्यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या महिलांना अमानुष मारहाण झाली, रक्तरंजित प्रकार घडला तेंव्हा भुजबळ कुठे होते, असंही गावकऱ्यांनी म्हटलं.
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांडगे याची तडकाफडकी बदली
कल्याण | कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांडगे याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र बदलीचे कारण अजून समजू शकलेलं नाही. तर दांडगे यांच्या जागी आता इदूरणी जाखड याची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला महिला आयुक्त लाभल्या आहेत. इदूरणी जाखड या महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई येथे कार्यरत होत्या.
-
-
लाखो विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया टांगणीवर, APS प्रमाणपत्रसाठी 4- 6 महिन्यांचा वेळ
मुंबई | जर्मनीत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक अशा शैक्षणिक अभ्यासक्रम मूल्यमापन प्रमाणपत्र (APS) मिळवण्यासाठी सध्या चार ते सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया आणि व्हीसा प्रक्रीया टांगणीवर लागली आहे. परिणामी कर्ज काढून शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्तप सहन करावा लागत आहे. या बाबीकडे आता आमदार सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधलंय. सत्यजीत तांबे यांनी जर्मनीच्या मुंबईतील वाणिज्य दुतावासाचे प्रमुख अखीम फॅबिग यांना पत्र पाठवलंय. पत्राद्वारे एपीएस प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
-
गेहलोत सरकारने राजस्थानमधील जनतेचे जगणे कठीण केले आहे – अमित शाह
राजस्थानमधील विजयनगर, अजमेर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, गुन्हेगारी, महिला आणि दलितांवरील अत्याचाराच्या बाबतीतही राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर आहे. महिलांवरील बलात्काराच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर आहे. पेपरफुटीच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर आहे. गेहलोत सरकारने राजस्थानमधील जनतेचे जगणे कठीण केले आहे.
-
कोणाचंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण देता येईल- प्रकाश आंबेडकर
कोणचंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. योग्य वेळ आल्यावर आपण याची व्याप्ती काय आहे सांगू, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
-
ओबीसी आरक्षण कमी होणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ओबीसी आरक्षण कुठेही कमी होणार नाही. मराठा समाजाला न्याय कसा मिळेल ही सरकारची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी होणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
-
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ग्रामपंचायत कार्यालये बांधली जाणार
ग्रामपंचायत कार्यालयांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यात 28 हजार ग्रामपंचायती आहेत. सुमारे चार हजार ग्रामपंचायतींना कार्यालये नाहीत.
-
काय जे काय घडलं ते दुर्देवी होतं, मी निषेध केला आहे- एकनाथ शिंदे
ठाकरे गटाकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. काल झालेला प्रकार निंदनीय आहे. वाद होऊ नये म्हणून मी कालच दर्शन घेतलं. पण उबाठा गटाच्या लोकांनी गालबोट लावलं ते निंदनीय आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
-
बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असतं- एकनाथ शिंदे
अयोध्येत राममंदिर 2024 साली पूर्णत्वास येणार आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून येत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं असतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शासनाच्या प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहीजेत ही हे बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्णत्वास नेत आहोत.
-
हरियाणा सरकारला मोठा झटका, खासगी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाकडून हरियाणा सरकारला मोठा झटका बसला आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये हरियाणा सरकारने दिलेली 75 टक्के आरक्षणाची तरतूद हायकोर्टाने रद्द केली आहे.
-
आरक्षण मिळालेल्या मराठ्यांचे आरक्षण संपवणार-जरांगे पाटील
सर्व मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या लढाईला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मराठ्यांकडे आता लाखोंनी पुरावे मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंदी मिळत आहे. त्यांनी आपले आरक्षण 70 वर्षे खाल्ले, असा आरोप त्यांनी केला. आता तरी मराठा समाजाने शहाणं होणं गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणाला विरोध होत आहे. काही मराठा विरोध करत आहे. कुणबी म्हणून ज्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. त्यांचे आरक्षण पण धोक्यात असल्याचे ते म्हणाले. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध सुरु आहे. मराठे संपले तर सध्या आरक्षण मिळणाऱ्या मराठ्यांचे आरक्षण संपवायला सुद्धा ते मागेपुढे पाहणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.
-
नैनीताल मध्ये भीषण अपघात
नैनीतालमध्ये मोठा अपघात झाला. या अपघातात सात लोकांचा मृत्यू झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जीप मधील चालकासह सर्व सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
-
भुजबळ राज्यातील वातावरण बिघडवत आहेत
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत,असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला. त्यांनी याविषयीचे ट्विट केले आहे. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली.
-
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणारच असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. मराठा समाजाचे पुरावे उपलब्ध होत आहे. त्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली. छगन भुजबळांचे वय झाले आहे. त्यामुळेच ते अशी खालच्या पातळीची वक्तव्य करत आहेत. पण मराठा समाज आपला दर्जा घसरु देणार नाही. त्यांना मराठे महत्व देणार नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले.
-
दंगली घडवण्याची भाषा करु नये – मनोज जरांगे
मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मराठे त्यांना महत्व देणार नाहीत असे ते म्हणाले. दंगली घडवण्याची भाषा करु नये. आम्हाला वातावरण खराब करायचे नाही, असे त्यांनी सांगितले. आमच्या शेपटावर पाय देऊ नका, नाही तर मराठा काय करु शकतो हे दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला.
-
संभाजी भिडे यांच्याकडून जरांगे पाटील यांचे स्वागत
सांगलीत मनोज जरांगे पाटील यांचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याकडून स्वागत करण्यात आले. तरुण भारत स्टेडियममध्ये जात असताना संभाजी भिडे यांनी केले स्वागत
-
मराठा आरक्षणात आहेत हे सिद्ध झाले आहे- जरांगे पाटील
समितीने पुरावे शोधायला सुरवात केली. लाखो पुरावे सापडले आहेत. मराठा आरक्षणात आहे हे सिद्ध झाले आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
आपली जात आणि पोरं उध्वस्त होता कामा नये- जरांगे पाटील
आपल्याला आव्हान पेलायचे आहे स्वतःच्या मुलासाठी. आपली जात आणि पोरं उध्वस्त होता कामा नये. यावर टाकलेले षडयंत्र तोडायची वेळ आली आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
मराठ्यांना हुशार झाल्याशिवाय पर्याय नाही, मराठ्यांना चारी बाजूने घेरण्यात आले आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
राज्यात त्सुनामी आला आहे- मनोज जरांगे पाटील
राज्यात त्सुनामी आला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आपल्याला एकजुटीची गरज आहे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.
-
महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर आहे का?- छगन भुजबळ
गावात नेत्यांना गावबंदी करता…, काय महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर आहे का. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असे थेट छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
-
पंढरपूरच्या देवाला पण जात लागली का? – भुजबळ
जालना : पंढरपूरला अजित पवारांनी यायचं नाही असे म्हटले. पंढरपूरच्या देवाला पण जात लागली का? आरक्षणांचा त्याच्याशी काय संबंध. कृष्ण पण यादव म्हणजेच ओबीसी. आता जातच लावायची ठरली तर लावा जात. – भुजबळ
-
मला तर रोज धमक्या आणि शिव्या – भुजबळ
जालना : चार पोटी निघतात म्हणतात याचा राजीनामा घ्या. काही लोकं म्हणतात भडकाऊ भाषण करु नका. पवार साहेब पण मराठा त्यांच्यासोबत काम केले मी कधी द्वेष केला. भुजबळ
-
गावबंदीचे लावलेले फलक ताबडतोब हटवले पाहिजे- भुजबळ
गावबंदीचे लावलेले फलक ताबडतोब हटवले पाहिजे. हे लोकाशाहीचे राज्य आहे. सरकार आहे की नाही. तुम्ही जर पक्षपात कराल तर ओबीसी शांत बसणार नाही. ही दादागिरी बंद करु – भुजबळ
-
हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही- भुजबळ
जालना : जातनिहाय जनगनणा झाली पाहिजे. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. जिल्ह्यात, तालुक्यात सभा घेतले पाहिजे – छगन भुजबळ
-
प्रकाश सोळंके यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले – भुजबळ
जालना : आत कुटुंब असतानाही जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला झाला. त्यांचं ऑफिस पेटवलं. – भुजबळ
-
हे काय याचे लांगुलचालन सुरुये – छगन भुजबळांची जरांगे पाटील यांच्यावर टीका
जालना : देवेंद्र फडणवीस यांनी सांगायला हवे होते की माझे पोलीस जखमी झाले. या उलट गृहमंत्री यांनी पोलिसांचे निलंबन केले. हे काय याचे लांगुलचालन सुरू आहे – छगन भुजबळ
-
लाठीचार्ज झाल्यावर शूर सरदार घरी जाऊन झोपले – भुजबळ
उपोषण केले, पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तो लाठीचार्ज सगळयांनी पहिला. फक्त 70 पोलीस कर्मचारी होते तिथे तेव्हा दगडाचा मारा सुरु झाला. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?. महिला आयोगाने त्या महिला पोलिसांना विचारा. शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सुनेला परत पाठवले पण यांनी काय केले तर महिला पोलिसांवर दगडफेक केली. छगन भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका
-
आरक्षण कसे मिळाले हे यांना काहीच माहित नाही – भुजबळ
जालना : आरक्षण कसे मिळाले हे यांना काहीच माहित नाही. सकाळी उठतो आणि आमची लेकरं बाळ… लेकरं बाळ… करतो. छगन भुजबळ पिठलं भाकर खाऊन आला. अरे होय मी पिठलं भाकरी खाऊन आलो आणि दिवाळीत पण मी घरी पिठलं भाकरी खातो. पण तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही. अशी टीका भुजबळांनी जरांंगे पाटील यांच्यावर केली आहे.
-
तुम्ही दादागिरी करून आरक्षण घ्यायचा विचार करताय – भुजबळ
जालना : मराठा समजाला काही मिळत नाही असे नाही. अनेक योजनेतून कोट्यावढी रुपये निधी मिळतोय – छगन भुजबळ
-
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही – भुजबळ
अंबड : फडणवीस सरकारने मराठा आरक्षण कायदा मांडला त्यावेळी हात वर करून सांगितलं द्या असं छगन भुजबळ म्हणाले.
-
ओबीसीच्या मूळावर उठणाऱ्यांविरोधात एकजूट दाखवा – गोपीचंद पडळकर
ओबीसीच्या मूळावर उठणाऱ्यांविरोधात एकजूट दाखवा. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसींनी एकजूट कायम ठेवावी अशी मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जालना येथील महायल्गार सभेत केली.
-
महाराष्ट्रात ओबीसी आंदोलनचा वणवा पेटवायचा आहे – देवयानी फरांदे
माळी, धनगर, वंजारी समाज म्हणजे माधवला एकत्र केल तर महाराष्ट्र जिंकल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी नेत्यावर कोणी बोट दाखवले तर आम्ही हात दाखवल्याशिवाय राहणार नाही, आजपासून घोषणा द्या, एक ओबीसी, एक कोटी ओबीसी ! इथून पुढे महाराष्ट्रात ओबीसी आंदोलनचा वणवा पेटवायचा आहे असे वक्तव्य भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जालना मेळाव्यात केले आहे.
-
ओबीसीच्या एल्गार मेळाव्याला पंकजा मुंडे अनुपस्थित
जालना येथे सुरु असलेल्या ओबीसीच्या एल्गार मेळाव्याला भाजपा नेत्या पंकजा मुंडे अनुपस्थित राहील्या आहेत. व्यासपीठावर मात्र त्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
-
अण्णांच्या राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन
देशभरातील माजी सैनिक सरकार विरोधात 19 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत एकटवणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार सैनिकांच्या आंदोलनाला मार्गदर्शन करणार आहेत.
-
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजू शेट्टी यांना फोन
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजू शेट्टी यांना फोन आला. चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी राजू शेट्टी यांना फोन केला. राजू शेट्टी यांच्या मागण्यांबाबत एकत्र बसून तोडगा काढण्याचे संकेत वळसे पाटलांनी दिले आहेत. ऊस कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी वळसे पाटील प्रयत्न करत आहेत.
-
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. मंत्रालयात आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्याचा आढावा घेत दुष्काळग्रस्त घोषित करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
डेंग्युतून बरे झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा मंत्रालयात
अजित पवार मंत्रालयात दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी ते मंत्रालयात आले आहेत. डेंग्युतून बरं झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंत्रालयात आले आहेत.
-
माझं शरीर साथ देत नाही, पण आराम केला तर मराठा समाजाचं वाटोळं होणार- जरांगे पाटील
सांगली : आरक्षणासाठी आता गावागावात साखळी उपोषण करायला सुरुवात करा, असं आवाहन सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. फक्त शांततेत राहा. माझं शरीर साथ देत नाही, पण आराम केला तर मराठा समाजाचं वाटोळं होणार, असं जरांगे पाटील म्हणाले.
-
Live Update : जालन्यातील सभेत अर्धनग्न होत कार्यकर्ते सामील
जालन्यातील सभेत अर्धनग्न होत कार्यकर्ते सामील झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे सातत्याने छगन भुजबळ साहेबांचा अवमान करत आहेत. भुजबळ साहेबांवर खालच्या पातळीत बोलत आहेत. त्यामुळे आम्ही जरांगे पाटलांच्या निषेधार्थ अर्धनग्न होत निषेध करत आहोत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कोणालाही आरक्षण द्या
-
Live Update : 24 डिंसेंबर पण आपली कसोटी आहे, लेकरासाठी लढा आहे – जरांगे पाटील
24 डिंसेंबर पण आपली कसोटी आहे, लेकरासाठी लढा आहे, शाततेत आंदोलन करा. आरक्षणसाठी आता इथून पुढे एकानेही आत्महत्या करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एक इंच ही मागे हटणार नाही… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
Live Update : उद्धव ठाकरेंसह कुटुंबिय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर
उद्धव ठाकरेंसह कुटुंबिय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांचा 11 वा स्मृतीदिन आहे.
-
ते आरक्षण जर 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा समाजाची आज प्रगत झाला असता – मनोज जरांगे पाटील
1805 पासून 1967 ते 2023 पपर्यत जे पुरावे सापडले ते आरक्षण जर 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा समाज हा आज प्रगत जात झाली असती. 70 वर्षात आम्हाला कुणी आरक्षण दिले नाही याचे उत्तर आम्हाला पाहिजे. 70 मध्ये आरक्षण होते, पण ओबीसी नेत्याचा दबाव होता, त्यामुळे पुरावे दडवले गेले. पण आज मराठाची एकजूट पाहून सरकारने पुरावे शोधायला सुरुवात केली.
-
आज पश्चिम महाराष्ट्राने ‘तो’ रेकॉर्ड तोडला – मनोज जरांगे पाटील
पश्चिम महाराष्ट्राबाबतीत एक चर्चा होती की , उशीर झाला की लोक सभेला थांबत नाही, पण आज पश्चिम महाराष्ट्राने तो रेकॉर्ड तोडला. एकही गाव नाही जिथे आज मला थांबवले जात नाही. मराठ्यांना डावलून पुढे जाणारी माझी औलाद नाही, मी सर्वांना भेटतो, म्हणून सभांना उशीर पोचतो.
-
आरक्षण समजून घेतले नाही, त्यामुळे आपल्यावर ही वेळ आली – मनोज जरांगे पाटील
आरक्षण समजून घेतलं नाही, त्यामुळे आपल्यावर ही वेळ आली. ज्यांना ज्यांना वाटले मराठा आरक्षणासाठी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा एकत्र येत नाही,खोटी बातमी ज्यांनी पेरली त्यांनी विट्यात येऊन बघावे.
सरकारने लक्षात घेतले पाहिजे, यांना काही काम नाही म्हणून एकत्र आले नाहीत. सरकारने शहाणपणा शिकला पाहिजे, नाहीतर पुढचा काळ जड गेल्याशिवाय राहणार नाही.
-
आरक्षण समजून घेणं गरजेचं आहे – मनोज जरांगे पाटील
आरक्षण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांना आरक्षण समजलं त्यांच्या पोरांना नोकऱ्या लागल्या. आरक्षण मराठ्यांना समजायला वेळ लागला म्हणून ही वेळ आली, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले
-
सांगली – मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थळी आगमन
मनोज जरांगे पाटील यांचे विटा शहरामधील सभास्थळी आगमन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण करण्यात येणार आहे.
विठ्ठलाची काठी आणि घोंगडी देऊन जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
-
धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा, अन्यथा… पडळकरांचा सरकारला इशारा
धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा, अन्यथा रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला आहे.
समित्या गठीत करून धनगर समाजाच्या पदरात काहीही पडणार नाही. विशिष्ट समाजासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे, असं शिंदेंबाबत सध्या तरी दिसत आहे, असेही पडळकर यावेळी म्हणाले.
-
ओबीसी समाजाचं संरक्षण ही आमची जबाबदारी – विजय वडेट्टीवार
ओबीसी समाजाचं संरक्षण ही आमची जबाबदारी आहे , असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दुसऱ्याच्या हक्काचं आरक्षण कोणी हिरावून घेऊ नये असेही ते म्हणाले.
-
जालन्यातील ओबीसीएल्गार सभेसाठी आचारसंहिता लागू , पोलिसांची माहिती
जालन्यातील ओबीसी एल्गार सभेसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
आजच्या ओबीसी आरक्षण बचाव बेलदार सभेसाठी बाराशे पोलीस, 3 एसआरपीएफ तुडक्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील विविध भागांमध्ये सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शहराबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
मराठ्यांना आरक्षण द्या, असं ओबीसी नेते म्हणतील, आम्हाला आशा आहे – मनोज जरांगे पाटील
मराठ्यांना आरक्षण द्या, असं ओबीसी नेते म्हणतील अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. अंबडमध्ये आजा ओबीसी एल्गार मेळावा असून त्या संदर्भात ते बोलत होते
-
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी थोड्याच वेळात येणार उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे थोड्याच वेळात येणार आहे. मातोश्री येथून थोड्याच वेळात निघणार उद्धव ठाकरे.
-
बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी
कल्याण डोंबिवलीमधून शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येणार आहेत. डोंबिवली युवा सेना सचिव शिवसेना नेते दीपेश मात्रे यांनी ही माहिती दिलीय. दुपारी 1 वाजता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल होत अभिवादन करणार आहेत.
-
धाराशिवला होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख खेळणार नाही
धाराशिवला होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख खेळणार नाही. ६५ वी महाराष्ट्र केसरी कोथरुडला झाली. त्यामुळे मी त्या स्पर्धेत खेळणार नाही, असं सिकंदर शेखनं सांगितलं आहे. फुलगाव इथे खेळलेल्या जिल्हा संघांना धाराशिवमधल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळता येणार नसल्याची माहिती आहे. प्रवेशिका पाहूनच मल्लांना खेळायला जाणार दिलं आहे, असा निर्णय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.
-
ओबीसी महासभेसाठी येणाऱ्यांसाठी जेवणाची खास सोय
जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाज शक्ती प्रदर्शन करत आहे. ओबीसी समाजाकडून आरक्षण बचाव एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी 30 क्विंटल खिचडी शिजवण्यात येत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो बांधवांसाठी खिचडी देण्यात येतेय. 30 क्विंटल खिचडी आणि जवळपास ट्रकभर पाणी पाऊचची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठमोठ्या घमेल्यात ही खिचडी शिजवण्यात येत आहे. अंबडच्या ओबीसी समाजातर्फे ही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांची न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. पुण्यात अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता. नाशिकप्रमाणे या प्रकरणातील आरोपींना पुण्यातही अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता. मात्र प्रकरण उघडकीस आल्याने त्यांचा डाव फसला. काल मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. हरिश्चंद्र पंत याचा नाशिक येथील एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सक्रिय सहभाग होता. इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला आरोपींनी मुंबईत मेफेड्रोनची विक्री केल्याचं निष्पन्न झालं आहे.
-
Railway news | मुंबईतल्या या स्थानकांवर 24 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटावर बंदी
दिवाळी आणि छटपूजेसाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या आहेत. प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने सीएसएमटी, दादर, ठाणे, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या महत्वाच्या टर्मिनसमध्ये संध्याकाळी सहा ते रात्री साडे बारा वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट देण्यावर बंदी घातली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही.
-
Sharad Pawar | शरद पवार यांचा दौरा रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द. खाजगी कारणास्तव शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा झाला रद्द. कोल्हापुरात मुख्याध्यापक संघटनेच्या अधिवेशनाला शरद पवार लावणार होते हजेरी.
-
Lalit Patil case | ललित पाटील प्रकरणात आणखी दोघांना अटक
ललित पाटीलच्या आणखी दोन साथीदारांना पुणे पोलिसांकडून अटक. ललित पाटील प्रकरणातील आणखीन दोन आरोपींचा पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून घेतला ताबा. प्रोडक्शन वॉरंट देत पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आणखीन दोन आरोपींना ललित पाटील प्रकरणात केली अटक. इम्रान शेख ऊर्फ अधिक अमर आणि हरिश्चंद्र पंथ असं ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावं आहेत. या दोन्ही आरोपींनी ललित पाटीलला ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा संशय
-
Manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील यांची आज कोल्हापुरात भव्य सभा
मनोज जरांगे पाटील यांची आज कोल्हापुरात सभा. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत होणार सभा. कोल्हापूरच्या दसरा चौकात दुपारी तीन वाजता होणार सभा. सकल मराठा समाजाकडून दसरा चौकातील सभेची तयारी पूर्ण. जिल्हाभरातून जवळपास दोन लाख लोक सभेसाठी येण्याचा अंदाज.
-
Marathi News | प्रज्ञा कांबळे हिचा जामीन अर्ज फेटाळला
ललित पाटील प्रकरणात अटकेत असलेल्या प्रज्ञा कांबळे हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तिने पुणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ललित पाटील प्रकरणी प्रज्ञा कांबळे हिला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी नाशिक येथून अटक केली होती.
-
Maharashtra Marathi News | मनोज जरांगे पाटील यांची आज सायंकाळी सभा
मनोज जरांगे पाटील यांची आज सायंकाळी कराडमध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव येणार आहे. मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
-
Maharashtra Marathi News Live | जालन्यात आज ओबीसींची सभा
जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाची सभा होणार आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांकडून अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर आणि पंकजा मुंडे हे एल्गार परिषदेचे नेतृत्व करणार आहे.
-
assembly election | मध्य प्रदेश विधानसभेसाठी मतदान सुरु
मध्य प्रदेशातील २३० आणि छत्तीसगडमधील ७० विधानसभेच्या जागांसाठी सकाळी सात वाजता मतदान सुरु झाले. सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. दोन्ही राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आहे.
Published On - Nov 17,2023 7:23 AM