मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत देशात आयुष्यमान भव ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आजपासून मराठवाड्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन. गणेशोत्सवाला दोन दिवस बाकी असून बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. पुण्यात गणेशोत्सवात जड वाहनास बंदी. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
मुंबई : मढ येथील खडकावर आदळून लक्ष्मीनारायन नौका समुद्रात बुडाल्याची घटना घडली. आकाश भालचंद्र कोळी यांची मालकीची 60 फूट लांबीची लक्ष्मीनारायन नौका मासेमारी करण्यासाठी निघाली. मढ कोळीवाड्याच्या पश्चिम समुद्रात 2 किलोमीटर अंतरावर ही नौका पोहोचली. येथील एका मोठ्या खडकावर जाऊन नौका जोरदार वेगाने आदळली. नौकेला खालच्या बाजूने मोठे भगदाड पडले आणि पाणी नौकेत शिरून ती बुडाली. घटनेची माहिती मिळताच गावातील 3 ते 4 नौका घटनास्थळी निघाल्या. मढ गावातील सर्व तरुणांनी बचाव कार्यासाठी धाव घेतली आहे.
परभणी : संभाजीनगर येथून वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चावरून परत जात असलेल्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. अपघातात 40 जण जखमी झाले आहेत. यात काही महिलांचाही समावेश आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील लिंबाळा शिवार येथे ही घटना घडली. जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. टेम्पो चालकांचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
नवी दिल्ली : मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण संदर्भात केंद्र सरकारने या विशेष अधिवेशनात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केली. तसेच, केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विषयक धोरणाला शिवसेना पक्षाचे समर्थन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष संसदीय अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत शेवाळे यांनी ही मागणी केली.
काशमीर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये हजेरी लावली आहे . ‘हम सब एक हैं’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली आहे. श्रीनगर येथील एसकेआईसीसी मध्ये हा कार्यक्रम सुरु आहे.
पिंपरी चिंचवड | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी चिंचवड मधील रोड शो नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता सक्रीय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सोमवारी 18 सप्टेंबरला पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही दुचाकी रॅली आयोजन करणयात आलंय.
ही दुचारी रॅली निगडीतील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भक्ती-शक्ती शिल्प समूहापासून सुरु होईल. तर ही रॅली पिंपरी मधील मुख्य चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत इथे संपेल.
नुकताच संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे. संजय राऊत राऊत म्हणाले की, उद्या सुप्रीम कोर्ट सुनावणी आहे. सुनावणीमध्ये सत्याचा विजय होणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना होती, मात्र, त्यांनी घटनेत बदल केला आणि स्वतःकडे अधिकार घेतले. ते सुद्धा निवडणूक आयोगाने फेटाळले. आमचा विजय निश्चित होणार आम्हाला विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल
दीपक केसरकर यांनी नुकताच मोठे विधान केले आहे. दीपक केसरकर म्हणाले की, कोकणात जाण्यासाठी आमच्या पक्षामार्फत गाड्या सोडल्या जात आहेत. सर्वसामान्यांची मुंबई आहे, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सदा सरवणकर करत आहेत. आज गणपती अडला होता, तिथे गेलो आणि ब्रिज खुला करून दिला. आम्हाला गणपती बाप्पा सोबत राजकारण करायचे नाही, मुंबईत विकास होत आहे.
गौरी गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी मागाठाणे डेपोजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. कोकणात जाण्यासाठी बसची वाट पाहत हजारो लोक बसले आहेत. मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे आज कोकणासाठी 50 बस सोडणार आहेत.लोक दुपारपासूनच मागाठाणे डेपोजवळ बसची वाट पाहत बसले आहेत.
पुणे – बंगरुळू महामार्गासह चांदणी चौकात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक सुरळीत बघायला मिळतंय. इतर वेळी चांदणी चौकात तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा असतात. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौक उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते सहभाग होतील. यावेळी ते जवान आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद साधतील.
मुख्यमंत्री @mieknathshinde २ दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान @narendramodi यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासह जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमात ते सहभागी होतील. pic.twitter.com/dT3QkJg3Pf
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 17, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या आमदार, खासदारांची संख्या वाढवायची आहे, असा कानमंत्र अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. महायुतीचे उमेदवार देणार आहोत. जमिनीवर पाय ठेवून लोकांमध्ये मिसाळायला पाहिजे, असा सल्ला पण त्यांनी दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात घराकडे जाणाऱ्या भक्तांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यामुळे वाहतूक वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मंदावली आहे. आज दिवसभर परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि गुढीपाडवा या निमित्ताने देखील हा शिधा देण्यात येईल. आरक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजातील कित्येक लोकं मोठे अधिकारी झाले. बाबासाहेब आंबेडकर, फुले यांचे लेखन सर्वांनी वाचले पाहिजे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, म्हणून तुमचं-आमचं कल्याण झालं. बोधी वृक्षाची फांदी आपल्या नाशिकमध्ये येणार आहे.
नाशिकमध्ये २६०९ दुकानांच्या माध्यमातून ३६ लाख नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले. सरकारकडून सर्व दुकानांमध्ये हा शिधा देण्यात आलाय. आतापर्यंत ५० टक्के नागरिकांनी याचा लाभ घेतला असेल. शहरात ४ ते ५ लाख लोकांना याचा लाभ होईल. राज्यात ७ ते ८ कोटी लोकांना याचा लाभ होईल. दिवाळीचा शिधा देखील मिळणार आहे, लवकरच प्रक्रिया होईल.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सभागृहात लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्यात येणार आहे. भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम होत आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळावर नवविवाहित जोडप्याने भेट दिली आहे. लग्न झाल्यावर लग्न मंडपातून थेट आंदोलन स्थळावर उपोषणकर्त्यांची नव्या जोडप्याने घेतली भेट. आम्हाला आरक्षण मिळावा यासाठी पाठिंबा देण्यासाठी याठिकाणी आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची मंडई परिसरात भली मोठी गर्दी जमली आहे. घरगुती गणपतीचे देखावे, सजावट साहित्य आणि फुल खरेदीसाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील मंडई परिसर गर्दीने गजबजला असल्याचं चित्र दिसत आहे.
अपुऱ्या कामामुळे मुंबई – गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. रायगडच्या कोलाड गावाजवळ २ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. पळस गावाजवळ वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ चौकाचं उद्धघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
डोंबिवलीमध्ये राहणारा एक व्यक्ती खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारा दरम्यान 12 तारखेला मृत्यू झाला असून त्यांचा covid रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या कोरोनाचे तीन ते चार रुग्ण उपचार घेत आहेत. लक्षणं जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावेत असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
आमच्यात कितीही मतभेद असो, त्यांना वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य देवो देशाची सेवा घडत राहो नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठीण काळात देशाचे नेतृत्व केले आहे हे मान्य केले पाहिजे असं संजय राऊत यांनी सांगितले.
अजून वेळ गेलेली नाही, मराठा आरक्षण बाबत केंद्रात कायदा करणारे विधेयक आणावे लागेल. मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री या ट्रिपल इंजिन सरकारने आपले राजकीय वजन नरेंद्र मोदी यांच्याकडे वापरावे व मराठा आरक्षण द्यावे. मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण द्यायचे असेल तर लोकसभेत आरक्षणाची मर्यादा कायदा करुन वाढवावी. विधेयक न आणल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे.
पुण्याचे साखर आयुक्त कार्यालय हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे खळ लुटणार कोठार आहे. त्याला आम्ही आग लावू. राष्ट्रवादीची वळू बैल शेतकऱ्यांच्या शेतावर सोडू नका. अन्यथा त्यांना देखील आम्ही ठेचून काढू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. दुसऱ्या राज्यात ऊस नेण्यास बंदी घातल्याच्या निर्णयाविरोधात ते बोलत होते.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. अमृत महोत्सवानिमित्त अल्पसंख्याक आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मानवंदना देत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी मीना उपस्थित होते.
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी दोन कोटी रुपये दिले आहे. मराठवाड्याच्या पाठिशी हे सरकार खंबीरपणे उभे राहिल. मराठवाड्यास देशातील अग्रण्य भाग करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज 75 वा अमृतमहोत्सवी दिवस साजरा होत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यास आता मागास या शब्दापासून मुक्ती मिळणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याचा विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. आगामी तीन दिवस पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज 75 वा अमृतमहोत्सवी दिवस आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभावर मुक्तीसंग्राम दिन साजरा होणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.
गणेशोत्सवानिमित्त नाशिक शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शालिमार, सीबीएस, नेहरू गार्डन, गाडगे महाराज पुतळा, दहीपुल या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. पाचव्या आणि सातव्या दिवशी भाविकांची गर्दी बघता वाहतुकीच्या मार्गात काही बदल करण्याच आलेत. जास्त गर्दी होणारे मंडळ आणि प्रमुख बाजारपेठ या ठिकाणी वाहतूक वळवली जाणार आहे.
पुण्यात गणेशोत्सवात दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी असेल. पुणे वाहतूक पोलिसांनी तसे आदेश दिलेत. शहरात गर्दी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. 16 सप्टेंबरपासून गणपती विसर्जनापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावर जड वाहनांना बंदी असेल. लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, जंगली महाराज रोड, एफसी कॉलेज रोडवर जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.
प्रदीप कुरुलकर प्रकरणी ATS चा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. प्रदीप कुरुलकर यांच्या पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाईस लेयर चाचणीच्या मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. प्रदीप कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचा एटीएसकडून आरोप करण्यात आलाय. त्यासाठी कुरुलकरांची पॉलीग्राफ चाचणी करू द्या असा अर्ज ATS कडून करण्यात आला होता. पण पॉलीग्राफ चाचणीला कुरुलकरांनी नकार दिला. अशा चाचण्या करण्यासाठी आरोपीची परवानगी आवश्यक असते. असा निकष न्यायालयाने दिलाय. त्यामुळे ATS ने केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.
चंद्रपुरात आज ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार उपोषण मंडपाला भेट देऊन या मोर्चात सहभागी होणार आहेत. 11 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रवींद्र टोंगे या ओबीसी कार्यकर्त्याचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सरसकट समाविष्ट करू नका ही अन्नत्याग आंदोलकाची प्रमुख मागणी आहे. हे अन्नत्याग आंदोलन कार्यकर्त्यांनी संपवावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमानी गावाकडे जायला निघाले आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी काल रात्रीपासूनच दिवा स्टेशनवर प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे दिवा स्टेशन गर्दीने फुलून गेलं आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजर पकडण्यासाठी हे प्रवासी आले होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभावर होणार मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येणार आहे. राज्यातही अनेक ठिकाणी मरााठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. भाजप मोदींचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहे. तसेच 2 ऑक्टोबरपर्यंत आयुष्यमान भव मोहीम राबवणार आहे.