Maharashatra Marathi News Live | लोकसभेनंतर राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर

| Updated on: Sep 22, 2023 | 7:05 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashatra Marathi News Live | लोकसभेनंतर राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर
Follow us on

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता आज हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. राज्यसभेत चर्चेनंतर या विधेयकावर मतदान होऊन ते मंजूर केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक मंजूर होतं का? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विघ्नहर्त्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबागचा राजाचा परिसर फुलून गेला आहे. रात्रभर या परिसरात प्रचंड गर्दी आहे. कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरूच. आजही कांदा लिलाव बंद राहणार. मराठा आरक्षण प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नांदेडच्या पिंपरी महिपाल गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Sep 2023 10:30 PM (IST)

    Womens Reservation Bill Pass In Rajyasabha | राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर

    नवी दिल्ली | लोकसभेनंतर राज्यसभेतही महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे महिलांना 33 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 21 Sep 2023 08:55 PM (IST)

    Ganeshotsav 2023 | चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस शहरात गणेशोत्सवानिमित्त सर्वधर्मीय आरती, सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

    चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात गणेशोत्सवानिमित्त सर्वधर्मीय आरती पार पडली. या आरतीत घुग्गुस शहरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख आणि बौद्ध धर्मातील प्रमुख लोकांनी सामील होऊन गणपती बाप्पाची आरती केली. घुग्गुस शहरात सर्व धर्मीय लोकं अतिशय गुण्या-गोविंदाने राहतात. त्याचाच प्रयत्य देत सर्वधर्मियांनी एकत्र येत गणपतीची आरती केली. या सर्व धर्मीय आरतीला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांनी आरती केली.


  • 21 Sep 2023 08:27 PM (IST)

    Vijay Wadettivar | भाजपचं 2024 मध्ये सरकार येणार नाही : विजय वडेट्टीवार

    मुंबई | भाजप लोकसभेच्या 48 ऐवजी 52 जागा निवडून आणू असंही म्हणेल, असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. तसेच 2024 मध्ये भाजपचं सरकार येणार नाही.तसेच विरोधकांना सत्तेसाठी 2047 ची वाट पाहावी लागेल, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केलाय.

  • 21 Sep 2023 08:18 PM (IST)

    Bacchu Kadu | अमरावती लोकसभा मतदारसंघावर बच्चू कडू यांचा दावा

    अमरावती | आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आता येत्या काळात नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्या संघर्ष पाहायला मिळू शकतो. येत्या निवडणुकीत लोकसभेच्या 2 विधानसभेच्या 15 जागा लढवणार असल्याचं कडू यांनी म्हटलंय.

     

  • 21 Sep 2023 07:59 PM (IST)

    धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे निर्देश

    धाराशिव जिल्ह्यातील 206 प्रकल्पात केवळ 10 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याकरिता आरक्षित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी भरारी पथके स्थापन करण्याबाबत देखील निर्देश दिले.

  • 21 Sep 2023 07:41 PM (IST)

    Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या साई गणेश मंडळाला देवेंद्र फडणवीस यांची भेट

    माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या साई गणेश मंडळाला देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. यंदा मुरलीधर मोहोळ यांच्या गणेश मंडळाकडून साकारण्यात आला आहे अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा. मोहोळ यांच्या मंडळाला भेट देत देवेंद्र फडणवीस करणार प्रभू श्रीरामाची आरती

     

     

  • 21 Sep 2023 07:31 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांनी दिला सरकारला मोठा इशारा

    मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, अनंतरवालीमध्ये महिलांवर लाठीचार्ज केला आणि आता तुमच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेणार आहे. 40 दिवसात आरक्षण द्या नाही तर गाठ माझ्याशी आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

     

  • 21 Sep 2023 07:15 PM (IST)

    Pune News : चंद्रशेखर बावनकुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका

    पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. गणपती दर्शनासाठी आलेल्या बावनकुळे यांनी केला दुचाकीवरून प्रवास. गणपती दर्शनासाठी बावनकुळे पुण्यात दुचाकीवरून फिरले आहेत.

  • 21 Sep 2023 07:07 PM (IST)

    Pune News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत रोहित टिळक यांनी केले

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या पुणे दाैऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात केसरी वाड्यात देवेंद्र फडणवीस येतील. केसरी गणपतीचे दर्शन घेत फडणवीस आरती करणार आहेत. पुण्याचा मानाचा पाचव्या गणपतीचे फडणवीस दर्शन घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रोहित टिळक यांच्यासह टिळक कुटुंबीय आहेत.

  • 21 Sep 2023 06:46 PM (IST)

    वंदे भारत एक्स्प्रेस 25 सप्टेंबर रोजी हैदराबाद ते बंगळुरूसाठी सुरू होणार

    हैदराबाद आणि बंगळुरू 25 सप्टेंबरपासून वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले जाणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, काचीगुडा-यशवंतपूर वंदे भारत या मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबर रोजी दिल्लीहून हिरवा झेंडा दाखवतील. दुसऱ्या दिवशी व्यावसायिक कामकाज सुरू होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • 21 Sep 2023 06:34 PM (IST)

    संसदेचे विशेष अधिवेशन एक दिवस लवकर संपू शकते

    संसदेची दोन्ही अधिवेशने आजच अनिश्चित काळासाठी स्थगित केली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत आजच राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल, अशी पूर्ण आशा आहे. मोदी सरकारने 18 सप्टेंबरपासून पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते, जे 22 सप्टेंबर रोजी संपणार होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेचे विशेष अधिवेशन आता एक दिवस आधी संपू शकते.

  • 21 Sep 2023 06:25 PM (IST)

    सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडामध्ये भारतीय व्हिसा निलंबित: परराष्ट्र मंत्रालय

    परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कॅनडाने अद्याप निज्जर हत्याकांडाची कोणतीही माहिती शेअर दिलेली नाही. दुसरीकडे भारताने कॅनडात उपस्थित असलेल्या गुन्हेगारांबाबत ठोस पुरावे दिले आहेत. यावर कॅनडाने कोणतीही कारवाई केलेली नाही.असं असताना सुरक्षेच्या कारणास्तव भारताने कॅनडामध्ये भारतीय व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 21 Sep 2023 06:10 PM (IST)

    मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी शनिवारी जयपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी जयपूर दौऱ्यावर जाणार आहेत. काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीची पायाभरणी करण्यासोबतच हे दोन्ही नेते जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत सांगितलं की की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी 23 सप्टेंबर रोजी जयपूरमध्ये राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी करण्यासाठी आणि जाहीर सभेसाठी येणार आहेत.

  • 21 Sep 2023 06:02 PM (IST)

    Gondia News | गोंदियात ओबीसी वसतीगृहांकरीता ओबीसी कार्यकर्त्यांकडून भीक मांगो आंदोलन

    गोंदिया : गोंदियात ओबीसी वसतीगृहांकरीता ओबीसी कार्यकर्त्यांकडून भीक मांगो आंदोलन सुरु आहे. ओबीसी समाजाने रस्त्यावर भीक मागून आंदोलन केले. आंदोलकांकडून जमा झालेले पैसे सरकारला पाठविण्यात येणार आहे.

  • 21 Sep 2023 05:43 PM (IST)

    Dhangar Reservation | धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक संपली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

    मुंबई | धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. धनगर समाजाच्या शिष्ठमंडळासोबत सकारात्मक बैठक झाली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीला सीएम एकनाथ शिंदे, डीसीएम देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे उपस्थित होते. या बैठकीत सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागितल्याची माहिती समोर आलीय. तसेच सरकार दोन दिवसात समिती स्थापन करणार असल्याचीदेखील माहिती समोर आलीय.

  • 21 Sep 2023 05:34 PM (IST)

    Pune News | देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर

    पुणे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. फडणवीस पुण्यातील गणेश मंडळाचे दर्शन घेणार आहेत. ते पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीच्या दर्शनाने सुरुवात करणार आहेत.

     

  • 21 Sep 2023 05:23 PM (IST)

    Buldhana Rain | बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकरी सुखावले

    बुलढाणा | बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलाय. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारलेली होती. पण आज आलेल्या पावसाने बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे.

     

  • 21 Sep 2023 05:09 PM (IST)

    Shah Rukh Khan | शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनाला

    मुंबई |  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलाय. शाहरुख खान आपल्या लहान मुलासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलाय. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकार लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी आहे. या गर्दीत मार्ग काळत शाहरुख खान बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी आलाय.

  • 21 Sep 2023 05:06 PM (IST)

    Amravati Rain | वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, गाय वाहून गेली

    अमरावती | अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडतोय. अमरावतीच्या वरुड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीय. दुसरीकडे पुलावरून पाणी वाहत असल्याने एक गाय वाहून गेल्याची घटना घडलीय.

  • 21 Sep 2023 04:59 PM (IST)

    Glass Skywalk : लोणावळ्यात ग्लास स्कायवॉकला लवकरच मुहूर्त

    लोणावळा येथील टायगर पाईंट, लायन्स पाईंट येथे पर्यटन विकासासाठी ग्लास स्कायवॉक उभारल्या जाऊ शकतो. त्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात सादर करावा. त्यासाठी निधी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सांगितले.

  • 21 Sep 2023 04:42 PM (IST)

    Aditya Thackeray : आदित्य ठाकरे भजनात तल्लीन

    आदित्य ठाकरे यांनी भजनावर ठेका ठरला. ते सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विनायक राऊत यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतले. त्यावेळी भजनात ते तल्लीन झाले होते. राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. अनेक नेते एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेत आहेत.

  • 21 Sep 2023 04:26 PM (IST)

    Dhangar Reservation : दोन दिवसांत समिती गठित होणार

    धनगर समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत राज्य सरकारने तातडीने सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. त्याबद्दल राज्य सरकारचे आभार, गोपीचंद पडळकर यांनी मानले. धनगर आरक्षणाबाबत सरकारने धनगर समाजाच्या नेत्याशी चर्चा केली. धनगर आणि धनगड याविषयीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. राज्य सरकारने दोन महिन्यांचा कालावधी मागितल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांत याविषयीची समिती गठीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 21 Sep 2023 04:04 PM (IST)

    Dhangar Reservation : सरकार सकारात्मक, पण हाती निराशा

    राज्य सरकार धनगर आरक्षणाविषयी सकारात्मक असले तरी ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सह्याद्रीवरील धनगर आरक्षणासंदर्भातील बैठक यामुळ निष्फळ ठरली. आरक्षणासाठी आंदोलनावर ठाम असल्याचे बैठकीनंतर आंदोलकांनी जाहीर केले.

  • 21 Sep 2023 03:59 PM (IST)

    विरारमध्ये विसर्जनावेळी गणेश भक्ताचा नदीत बुडून मृत्यू

    दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करताना विरार मध्ये एका गणेश भक्ताचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. विरार पूर्व पारोळा- शिरवली च्या नदीत ही रात्री 8 वाजता घटना घडली आहे. पाच तासानंतर रात्री उशिरा मृतदेह शोधण्यात स्थानिक नागरिक आणि पोलिसांना यश आले आहे. संजय हरिश्चंद्र पाटील ( वय 45) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या गणेशभक्त चे नाव असून हे पारोळा गावचे राहणारे होते.

  • 21 Sep 2023 03:28 PM (IST)

    महाडला जाताना वरंध घाटात फोर्चूनर गाडी 200 फूट दरीत कोसळली

    पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात वारवंड गावाच्या हद्दीत फोर्चूनर गाडी 200 फूट दरीत कोसळून अपघात झाला. सुदैवाने गाडीतले तिघही जण बचावले असून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना दरीतून बाहेर काढलं. सुनील गोविंद मोरे, सुरेखा सुनील मोरे आणि अशोक सुरेश कांबळे अशी अपघातातून बचावलेल्यांची नावे आहेत.

     

  • 21 Sep 2023 03:14 PM (IST)

    तृतीय पंथीयांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती

    पुण्यात तृतीय पंथीयांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली आहे. 100 तृतीय पंथीयांकडून एकाच वेळी बाप्पांची आरती करण्यात आली.

  • 21 Sep 2023 02:48 PM (IST)

    जरांगे पाटील यांचे सरकारला अल्टीमेटम

    मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा गाठ माझ्याशी आहे असे जरांगे पाटील यांनी केले आहे. 14 तारखेला सरकारला दिलेल्या वेळेला 30 दिवस पूर्ण होतात आणि त्या दिवशी आपण सरकारला जाब विचारणार आहोत, तुमच्याकडे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत असेही ते म्हणाले.

     

  • 21 Sep 2023 02:30 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

    व्यापाऱ्यांचे काही मागण्या आहेत त्या राज्यसरकार आणि केंद्र सरकारच्या संबधित आहेत. आज झालेल्या या बैठकीत आम्ही लिलाव सुरू करण्याचे आवाहन केल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. याबत पणन विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार बैठक घेणार आहेत, तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचे आम्ही आवाहन केले आहे. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.

  • 21 Sep 2023 01:57 PM (IST)

    दहा दिवसांच्या विश्रांतीनतर वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला

    ज्येष्ठ गौरीच्या आगमनासोबत वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा आल्याने शेतकरी सुखावला आहे.

  • 21 Sep 2023 01:32 PM (IST)

    नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांची बैठक सुरू

    नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहे. अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर लिलाव सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 21 Sep 2023 01:27 PM (IST)

    पडळकरांचे वक्तव्य संस्कृतीला धरून नाही – चंद्रशेखर बावनकुळे

    अजित पवार यांच्याबद्दल पडळकरांनी केलेले वक्तव्य संस्कृतीला धरून नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली.

  • 21 Sep 2023 01:06 PM (IST)

    महिला आरक्षणावरून यशोमती ठाकूर यांची केंद्र सरकारवर टीका

    2014 मध्ये बहुमत असतानाही भाजपाने महिला आरक्षण विधेयक आणलं नाही. भाजपाने तेव्हाच हे विधेयक का आणलं नाही ? असा सवाल विचारत यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

  • 21 Sep 2023 01:03 PM (IST)

    2029 च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य – सुप्रिया सुळे

    2029 च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तसेच महिला आरक्षणासाठी प्रत्येक पक्षानं प्रयत्न केलेत, असेही त्यानी नमूद केले.

  • 21 Sep 2023 12:57 PM (IST)

    बीडमध्ये ओबीसींचा जनआक्रोश मोर्चा

    बीडमध्ये ओबीसींचा जनआक्रोश मोर्चा सुरु आहे. ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्या, असं म्हणत ओबीसी नेते टीपी मुंडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येत आहे.  बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर हा मोर्चा काढण्यात आलाय.  हजारो ओबीसी बांधव या मोर्चात सहभागी झालेत.

  • 21 Sep 2023 12:45 PM (IST)

    चौंडीतील शिष्टमंडळ थोड्याच वेळात सह्याद्री अतिगृहावर शिष्टमंडळ दाखल होणार

    धनगर समाजाला आरक्षण मिळावं,  या मागणीसाठी जामखेडच्या चौंडी गावात 16 दिवसंपासून उपोषण सुरु आहे. यशवंत सेनेकडून हे आंदोलन करण्यात येतंय.  धनगर आरक्षणासंदर्भात आत मुंबईत महत्वाची बैठक होतेय.  या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे. आरक्षणात निर्णय न झाल्यास प्राण जाईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, अशी भूमिका उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी घेतली आहे.  त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

     

  • 21 Sep 2023 12:30 PM (IST)

    PM Naredra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भाजप मुख्यालयात जाणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी भाजप मुख्यालयात जाणार आहेत.  राजधानी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात सकाळी नऊ वाजता जाणार आहेत. भाजप महिला मोर्चा पंतप्रधान मोदी यांचं स्वागत करणार आहेत. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी भाजप मुख्यालयात जाणार आहेत.

  • 21 Sep 2023 12:15 PM (IST)

    राज्यसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा

    राज्यसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. आम्ही महिला शक्तीला देवीच्या स्वरूपात पाहतो.  महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असेल. भारताच्या संस्कृतीत महिलांना मोठं स्थान आहे. ते कायम राहावं, असं जेपी नड्डा यांनी राज्यसभेत बोलताना म्हटलं.

  • 21 Sep 2023 11:57 AM (IST)

    India vs Canada | भारताने कॅनडाबाबत घेतला मोठा निर्णय

    भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवा स्थगित केली. कॅनडातून भारतात येणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित. बीएलएस इंटरनॅशनल वेबसाइटच्या द्वारे माहिती.

  • 21 Sep 2023 11:37 AM (IST)

    Vijay wadettiwar | ‘जनतेच्या प्रश्नांशी ज्यांना काही देणघेण नाही त्यांना घालव’

    “जनतेच्या प्रश्नांशी ज्यांना काही देणघेण नाही, त्यांना पुढच्यावर्षी तुझ्या आगमनाआधी घालव अशी मागणी मी गणपती बाप्पाकडे केली आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात गणरायाच्या दर्शनासाठी आले होते.

  • 21 Sep 2023 11:22 AM (IST)

    Onion Market | जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार कारवाई होणार

    “व्यापाऱ्यांच्या काही मागण्यांसाठी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. पण मार्केट सुरू राहावे यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे. व्यापारी वर्गाची भूमिका बघता ते बंदवर ठाम आहेत. जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार कारवाई होणार. परवाने रद्द, भूखंड जमा करण्याची कारवाई केली जाणार. 131 व्यापारी आहेत, सर्वांवर कारवाई होईल. 25 ते 27 व्यापाऱ्यांनी परवाने आमच्याकडे सादर केले आहेत” असं बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले.

  • 21 Sep 2023 11:07 AM (IST)

    Women Reservation Bill | लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू

    लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू. राज्यसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. “काल भारताच्या संसदीय यात्रेचा सुवर्णक्षण होता. मी सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 21 Sep 2023 11:01 AM (IST)

    Sukhdool Singh : खलिस्तान्यांची रसद तुटली, कॅनडात गँगस्टर सुखदूल याची हत्या

    कॅनडात खलिस्तानी समर्थक गँगस्टर सुखदूल सिंग याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी गोळी मारून त्याची हत्या केली आहे. तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड गँगस्टरच्या लिस्टमध्ये होता. खलिस्तान्यांना आर्थिक रसद पोहोचवण्याचं तो काम करायचा.

  • 21 Sep 2023 10:45 AM (IST)

    devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस आज पुण्यात, दगडऊ शेठ हलवाई गणपतीचं घेणार दर्शन

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीस मानाच्या गणपतीसह दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. इतर सार्वजनिक गणपती मंडळाला पण ते भेट देणार आहेत. फडणवीस आज सायंकाळी 6 वाजल्यापासून गणेश मंडळाना भेटी देणार आहेत.

  • 21 Sep 2023 10:42 AM (IST)

    onion price : कांदा व्यापाऱ्यांचा संप मिटणार?; पालकमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी थोड्याच वेळात चर्चा

    कांदा व्यापाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे कांदा लिलाव बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी कांदा व्यापाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक बोलावली आहे. दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यतील कांदा लिलाव बंद आहेत. पालकमंत्र्यांच्या मध्यस्तीने लिलाव सुरू होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

  • 21 Sep 2023 10:36 AM (IST)

    Women Reservation Bill : 27 वर्षाची प्रतिक्षा पूर्ण होणार, महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मंजूर होणार?

    राज्यसभेत आज महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी साडे सात तास देण्यात आले आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख नेते या विधेयकावर बोलतील. त्यानंतर मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार का? महिलांना आरक्षण मिळणार का? 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.