मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : पुण्यातील रस्ते आजपासून 27 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेनंतर बंद राहणार. गणपतीचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांची पाहणी करणार. वन नेशन वन इलेक्शनसाठी आज समितीची पहिली बैठक. बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता. नागपुरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती. अनेक भागात पाणई शिरलं. घरातही पाणी साचलं. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
बारामती | उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. “मी अर्थमंत्री असल्याने कामांना झुकतं माप मिळतं. मात्र अर्थखातं पुढे टिकेल की नाही, हे नाही” असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या मनात नक्की काय चाललंय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
नागपूर | नागपुरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. जवळपास 10 हजार घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलं. अनेक दुकांनाचंही नुकसान झालं. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर फडणवीस यांनी पूरग्रस्तांना आर्थिक मदत देणार असल्याचं जाहीर केलं. घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार तर दुकानाचं नुकसान झालेल्यांना 50 हजार रुपये देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई | शिवसेना 16 आमदार अपात्रतेप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी पार पडणार आहे. वकीलांमार्फत बाजू मांडलेल्या आमदारांच्या वकीलांना हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच वकीलांकडून प्रतिज्ञापत्र सादर न केलेल्या आमदारांना व्यक्तिगत हजेरी लावावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार आहे.
मुंबई | मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसे यांचा कुटुंबापुरताच पक्ष आहे. खडसेंना जिल्हा बँक, दूध संघासह आमदाराकीही पाहिजे. खडसेंना सर्व पद घरातल्या घरात पाहिजेत, अशा शब्दात महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधला. तर महाजन यांना आमदारकी आणि नगराध्यक्ष पद घरात कशाला हवं, असा पलटवार खडसे यांनी केला.
तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे उपमुख्यमंत्री झालो आणि अर्थ खाते माझ्याकडे आले. सर्व खात्यांना निधी देण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. २८८ मतदारसंघात निधी देतोच. पण वाढप्या ओळखीचा असेल तर बारामतीकर दिसल्यावर दोन पोळ्या जास्त पडतात, असे अजित पवार म्हणाले आहेत.
घनसावंगी तालुक्यातील रवना परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी येथील सकलादी बाबाच्या दर्ग्याच्या आत घुसले. परतूर तालुक्यातील टाकळी गावातील कसुरा नदी आज झालेल्या दमदार पावसानंतर दुथडी भरून वाहत आहे.
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहर आणि परिसरात पुन्हा दमदार पाऊस सुरू झालाय. पावसातही गणेशभक्त पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचण्यात दंग आहेत. गणरायाच्या निरोपाला पावसाने हजेरी लावल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.
तुम्ही सगळे मला पाठिंबा देता. विश्वास ठेवता त्या विश्वासाला तडा जाऊ न देता जेवढं काही बारामती शहर आणि तालुक्यासाठी करता येईल ते मी करत असतो, असे अजित पवार यांनी नुकताच म्हटले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केलीये. मंदिर परिसरात मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत. सुट्टीचा दिवस असल्याने दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दगडुशेठ मंदिरात दाखल झाले.
मुंबई | राज्यातील प्रत्येक समस्यांसाठी पुढाकार घ्या. लोकसभा निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठातील अमित शहा यांच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणीवस अनुपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमला उपस्थित न राहता देवेंद्र फडणीवस नागपूरला जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. अजित पवार पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी पुण्यात आहेत. त्यामुळे ते निमंत्रण पत्रिकेत नाव असूनसुद्धा या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहेत.
बीड : आष्टी तालुक्यातील बावी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस पडलाय. आष्टी, डोईठानसह चार गावात मुसळधार पाऊस पडतोय. या पावसात बावी गावसह चार गावांना जोडणारा पुल वाहून गेलाय. पावसात अनेक गावंचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झालीय. पुरात एका शेतकऱ्याच्या पाच शेळ्या वाहून गेल्या आहेत.
पुणे | पुण्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जात आहे. विसर्जन घाटावर बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी बघायला मिळत आहे. पुण्यातील जवळपास सगळ्याच विसर्जन घाटावर बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेकडून तयारी करण्यात आलीय. विद्युत पूजा आणि आरती करत बाप्पाला निरोप दिला जातोय. राज्यभर आज पाच दिवसांच्या घरगुती गणरायाचे विसर्जन केलं जात आहे.
नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: नागपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसामुळे नागपुरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय.
अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावलीय. जुलैपासून विश्रांती घेतल्यानंतर आज सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळत आहे. अहमदनगर शहरात देखील जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सखोल भागात पाणी साचलं आहे.
राज्यात मोठी राजकीय घडामोड झाली आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लाईव्ह दाखवावी, अशी मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सर्वसामान्य जनतेला या सुनावणीत काय झाले. कोणी काय बाजू मांडली हे समोर यावे, यासाठी सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे, अशी मागणी त्यांनी केली. संजय राऊत यांनी पण या मागणीला दुजोरा दिला आहे. तर भाजप, शिंदे गटाने सुनावणीवर शंका घेण्याची गरज नसल्याचे मत मांडले आहे.
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात हमसफर एक्सप्रेसच्या एका डब्ब्याला आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस, सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
केंद्रीय उपमुख्यमंत्री अमित शाह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहचले आहेत. ते गणपती बाप्पाचे दर्शन घेतील. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले होते. तर दरवर्षीप्रमाणे ते लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाप्पाचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. यापूर्वी शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. ते दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेतात.
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील मानाचा गणपतीसह इतर मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेतलं. शनिवार असल्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर मोठी गर्दी आहे. या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी दुचाकीवरून प्रवास केला. राष्ट्रवादीची कोथरूड युवा पदाधिकारी ऋतुजा देशमुख हिच्या दुचाकीवर बसून सुप्रिया सुळे यांनी गणपतीचे दर्शन घेतलं.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज मुंबईत आगमन झाले. मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचे अमित शाह यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते लालबागच्या राज्याच्या दिशेने रवाना झाले. दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार, खासदार मनोज कोटक उपस्थित होते.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राज्याच्या दर्शनाला येणार असल्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. तर, संपूर्ण मंडप रिकामी करण्यात आला आहे. लालबागच्या राजाचे मोजके कार्यकर्ते वगळता पोलिसांनी मंडपाचा ताबा घेतला आहे.
कल्याण : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांची भेट झाली. या भेटीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली असेल. शरद पवार हे अदानी, अंबानी यांच्यासारख्यांना सगळ्यांना भेटतात. या सर्वांना भेटल्यानंतर आपल्या राज्याचा विकास कसा करता येईल याबाबतीत कुठे ना कुठेतरी चर्चा होत असते. त्यानंतर त्याच्यावर पॉलिसी करत असतो. सर्व घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी कधी करता येत नाही असे रोहित पवार म्हणालेत.
केंद्रीय गृहमंत्री अराजकीय दौऱ्यावर मुंबईत आले असून थोड्याच वेळात ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशीष शेलार यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.
नंदूरबार येथील धडगाव शहरात गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन वाहनासह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुटख्यावर महाराष्ट्रात बंदी आहे. गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी महाराष्ट्रात असते.
पाच दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईतील दादर, गिरगाव, जुहू चौपाटीसह अन्य चौपाट्यांवर सर्व तयारी करण्यात आली आहे. महापालिका आणि पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले असून, गणेशभक्तांना कोणतीही अडचण येऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
पुण्यातील NDRF टीम नागपूर मध्ये दाखल झाली आहे. पुरातून अनेक लोकांना बाहेर काढण्यात NDRF जवानांना यश मिळालं आहे. अजूनही अनेक लोक पुरात अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. NDRF कडून 6 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. NDRF च्या 4 तुकड्या नागपूरकडे रवाना झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसानंतर शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. खरीप पिकांचं नुकसान झालं असलं तरी रब्बी पिकाला या पावसामुळे होऊ शकतो फायदा
उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीत स्फोट झाला आहे. स्फोटात ४ ते ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी उल्हासनगर पलिकेचं अग्निशमन दल दाखल झालं असून बचाव कार्य सुरु आहे.
नागपुरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. ४०० जणांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. अनेक रस्ते, घरं, दुकानं आणि वाहनं पाण्याखाली गेल्याचं चित्र सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे.
बुलढाणामधील चिखली इथल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात धक्कादायक घटना घडली आहे. वसतिगृहातील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाली आहे. काल रात्री त्यांनी खिचडी खाल्ली होती. सध्या बाधित मुलींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शरद पवार हे गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील घरी दाखल झाले आहेत. अदानींच्या घरातील खासगी कार्यक्रमात पवार सहभागी होणार आहेत.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जनावरून प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटना आमने-सामने आहेत. पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनाला प्रशासनाकडून बंदी आहे. यासाठी पंचगगा नदी घाटाच्या संपूर्ण परिसराला बॅरिकेटिंग केलं असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र हिंदुत्ववादी संघटना नदीतच मूर्ती विसर्जित करण्यावर ठाम आहेत. संध्याकाळी चार वाजता हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते मूर्ती विसर्जनासाठी नदीकडे येणार आहेत. मैला मिश्रित नाल्यांचं पाणी नदीत मिसळत असताना प्रशासनाला जाग आली नाही का,असा सवाल या संघटनांनी केला आहे.
घरगुती गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. पंचगंगा नदीत गणपती विसर्जन करायला बंदी घालण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दाखला देत ही बंदी घातली आहे. पंचगंगा नदी घाट परिसरात बॅरिकेटिंग आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कृत्रिम कुंडातच गणेश विसर्जन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असून संपूर्ण मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त आहे. एयरपोर्ट ते ‘वर्षा’ बंगल्यापर्यंत त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डिंग्ज लागले आहेत. गणेशोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शहा यांचं मुंबई नगरीत स्वागत, अशा आशयाचे बॅनर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “राजकारणात ज्या पद्धतीचं द्वेष पसरवलं जातंय, ते बाजूला सारून सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना शक्ती द्यावी, अशी प्रार्थना गणरायाकडे केली.”
दादरमधील १५ मजली इमारतीत सकाळी आग लागली. आगीमुळे गुदमरून एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दल व पोलिसांचे पथक सध्या घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच बचावकार्याबद्दलही माहिती घेतली.
अमरावती शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीला बॅड टच केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून आरोपी शिक्षका विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस झाला असून ठिकठिकाणी पाणी साचले असून खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत पाणी साचले आहे. नागपूरमध्ये बचाव कार्य सुरु आहे.
पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बचाव पथकं सक्रीय झाली आहेत. एनडीआरएफचे एक आणि एसडीआरएफच्या 2 टीम्स बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे रस्ते बंद झाले आहे. यामुळे काही गावांच्या तालुक्याशी संबंध तुटला आहे. सालेकसा तालुक्यातील नानाव्हा, घोन्सी या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे.
एटीएम सेंटर लुटण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून कांदिवली पोलिसांनी 4 दरोडेखोरांना अटक केली आहे.
काही लोक एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्यांचा प्लॅन अंमलात आणण्याआधीच पोलिसांनी दरोडेखोरांना रंगेहाथ पकडले.
लातूरात पोलीस कर्मचाऱ्याकडून पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आला. लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यातील ही घटना घडली. पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. पांडुरंग पिटले असे गोळीबार करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.
राज्यात दीड लाख जागांवर भरती करण्यात येणार आहे. परंतु कंत्राटी भरतीबद्दल गैरसमज निर्माण केले गेला आहे. विरोधकांकडून तरुण, तरुणींना भडकवले जात आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातच घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सांगितले.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये दमदार सुरुवात केलीय. पहिला वनडे सामनाा जिंकलाय. पण एका खेळाडूमुळे टेन्शन आहे. कोण आहे तो प्लेयर, वाचा सविस्तर…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. लोकसभा सचिवालयाकडे पाठवली हक्कभंगाची नोटीस. रमेश बिधुडी यांनी केलेलं वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. सुप्रिया सुळे यांची नोटीसद्वारे मागणी.
गोंदियामध्ये पुजारीठ्रा धरणाचे 4 गेट तर कालीसरार धरणाचे 2 गेट उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावाना सतर्कतेच्या इशारा देण्यात आलाय. गेट 0.30 मी. ने उघडण्यात आले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील एकमेव हाजरा फॉल धबधबा ओसंडून वहायला सुरूवात झाली आहे. हाजरा फॉल धबधब्याचे पावसामुळे रौद्र रूप समोर आलं आहे. हाजरा फॉल परिसर संपूर्णपणे जलमय झाला आहे. सुरक्षेच्या कारणाने हाजरा फॉल तात्पुरता बंद आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस कोसळला. गंगापूर धरणासह इतर धरणात पाण्याची पातळी वाढली. गंगापूर धरणातून रात्रीच्या सुमारास 6752 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदा घाट परिसरात पाणी वाढले. सध्या मात्र पावसाने विश्रांती घेतलीय.
राज्यात येत्या 48 तासात राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 25 आणि 26 तारखेला राज्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचा आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सुप्रिया सुळे शहरभरातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. शहरातील मानांच्या गणपती मंडळासह एकूण 28 गणेश मंडळांना सुप्रिया सुळे भेट देणार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीत ते विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत.
पुणे शहरातील प्रमुख रस्ते आजपासून 27 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 5 नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. गणपतीचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाचही मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत. शहरातील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता तसेच या अंतर्गत येणारे रस्ते सायंकाळी बंद राहतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागपुरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाली आहे. प्रचंड पावासामुळे नागपुरात महापूर आला असून घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शेतीतही पाणीच पाणी झाल्याने शेतीची वाट लागली आहे. एसटी स्टँडमध्ये पाच फुटापर्यंत पाणी भरल्याने एसटी पाण्यात बुडाल्या आहेत. या महापुरामुळे नागपूरकर हवालदिल झाले आहेत.