मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनानंतर अनेक निर्णय घेण्यात आले होते. न्या. शिंदे समितीची व्याप्ती वाढवली. त्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक झाले आहे. त्यांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेतली. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची आज दुपारी १ वाजता बैठक होत आहे. या बैठकीत शिंदे गटातील मंत्री विरुद्ध छगन भुजबळ असे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज एका तास बंद राहणार आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी आज होणार आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा फेक व्हिडिओ तयार करण्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य, देश, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज नांदेड महापालिकेचे अपक्ष नगरसेवक संदीप सिंह गाडीवाले यांनी प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई | “मुंबई महापालिका आणि बीएसटी कर्मचाऱ्यांना 26 हजार रुपये बोनस द्यायचा निर्णय घेतला आहे. मुंबई स्वच्छ ठेवणं आणि सुंदर करण्यासाठी जे काम करतात त्यांची दिवाळी सुखाची जावी यासाठी 26 हजार बोनस देण्याचा निर्णय घेतला. पाच लाख रुपयांपर्यत गट विमा दिला जाणार आहे. शिक्षकांचे विषय देखील सोडवण्याचा निर्णय घेतलाय. 700 ते 800 कामगार बहुउद्देशीय म्हणून काम करतात. त्यांना देखील बोनस देण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांना देखील अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. अंगणवाडी सेविकाना देखील बोनस देण्याचा निर्णय घेतला”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.
ठाणे : कळवा पारसिक बोगद्याजवळ ओव्हर हेड वायर तुटल्याचा परिणाम ठाणे स्थानकात दिसून येत आहे. ठाणे रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 10 ते 15 मिनिटे मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. एकीकडे दिवाळी सणानिमित्त गर्दी तर दुसरीकडे घरी परततानाची गर्दी ठाणे स्थानकाकडे दिसत आहे.
जळगाव : जिल्ह्यात केवळ भाजप खासदाराचा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला. एकाच पट्ट्यात असलेले इतरही तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. चाळीसगाव बरोबरच पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल हे तालुकेही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा अशी मागणी ठाकरे गटाने केली.
मुंबई : मुंबई महापालिका कर्मचारी यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका कर्मचाऱ्यांना सरसकट बोनस जाहीर केलंय. २६ हजार रुपये इतका बोनस पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे प्रथमच कुत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. 20 नोव्हेंबर च्या दरम्यान कृत्रिम पाऊस तयार करण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरकडे केजरीवाल सरकारने ही जबाबदारी दिली आहे. येत्या शुक्रवारी दिल्ली सरकार सुप्रीम कोर्टाला याबाबतची माहिती देणार आहे.
भीमा कोरेगावचा विजयस्तंभ अभिवादन सोहळा यंदा 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी असा दोन दिवस साजरा केला जाणार आहे. दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. शौर्य दिनाच्या नियोजनासाठी 20 कोटींची तरतूद करण्याची मागणी राहुल डंबाळे यांची राज्य सरकारकडे केली आहे. 20 लाख अनुयायी अभिवादनास येणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.
मुंबई | राज्य सरकराने मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समजासाठी मोठा निर्णय घेतलाय. धनगरांना अनुसूचित जमातींसारख्या योजना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार धनगर समाजासाठी 13 योजना असणार आहे. त्यासाठी 140 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तसेच तात्काळ अमंलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
पुणे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर निघाले आहेत. फडणवीस महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लावणार हजेरी लावणार आहेत. गादी आणि माती विभागातून अंतिम महाराष्ट्र केसरी साठी उद्या 9 नोव्हेंबर रोजी पैलवान निवडला जाणार आहे. गादी विभागातून एक आणि माती विभागातून एक पैलवान अंतिम कुस्ती खेळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही अंतिम स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. रामदास तडस गटाची फुलगाव मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे.
एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी चंद्रयांगुट्टा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आले होते.
मध्य प्रदेशातील मुरैना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मतांसाठी दलित आणि मागासलेल्या लोकांबद्दल बोलणारे काँग्रेस नेते कुटुंबासमोर कोणालाही महत्त्व देत नाहीत. त्यांच्या जाहीरनाम्यातही घराणेशाही प्रचलित आहे.
मुंबई | मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका, असा टोला जरांगे पाटील यांनी तानाजी सावंताना लगावला. तसेच आम्ही काय केलं हे विचारणारा हा कोण?, असंही जरांगे पाटील म्हणालेत.
नितीश कुमार यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे. नितीश यांनी देशाचा अपमान केला आहे. विधानसभेत माता-भगिनींचा अपमान झाला आहे. इंडिया आघाडीचे नेते गप्प का?, असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला.
पहिलं आरक्षण रद्द झाल्यावर 2 वर्षे कोणीत काही बोललं नाही. आरक्षणासाठी आज शासनाची दमछाक केली जात आहे, अशी टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली. आरक्षण आताच द्या ही भूमिका घेतली जात आहे. पण ते कायद्याच्या चौकटीत बसलं पण पाहीजे, असं तानाजी सावंत पुढे म्हणाले.
मराठा आरक्षणा संदर्भात सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. उदय सामंत, संदिपान भुमरे, अतुल सावे जरांगेंना भेटणार आहेत. मराठा आरक्षणासाठीची डेडलाईन 24 डिसेंबर की 2 जानेवारी यावर चर्चा होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबाला मंत्र तानाजी सावंत यांनी मदत केली आहे. कुटुंबाला धनादेशाचं वाटप करण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटं चर्चा झाली. दिवाळीत वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न करावेत, याबाबत चर्चा झाली.
मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.आरक्षणावर बोलताना काळजी घ्या, असं बैठकीत सांगण्यात आलं. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही याची खात्री बाळगा.
बीडमधील घटना दुर्दैवी आहे. आरक्षणासाठी घरं जाळण्याची काय गरज होती? पण तपास यंत्रणांचं हे अपयश आहे. इतकी मोठी घटना घडते आणि माहिती नसावी, याबाबत आश्चर्य वाटते. आता या घटनेची सखोल चौकशी करावी, जेणेकरून सर्व गोष्टी बाहेर येतील.
बीडमधील घटनेची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीडमधील घटनेनंतर सर्व जाती धर्माचे लोक मदतीला धावले. एवढा मोठा घातपात कधीही पाहिला नाही. आंदोलनाचे एवढे तीव्र पडसाद कधीही उमटले नाहीत. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे, असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या. पण कोणच्याही आरक्षणाला धक्का लागू नये असंही त्यांनी पुढे सांगितलं.
बीड जिल्ह्यातील जाळपोळींचा आढावा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतला. या घटनांचा निषेध झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे आंदोलन होणे आवश्यक आहे. ओबीसी आणि मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रकार होऊ देणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरण 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. दिवाळी काळात इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे. समन्स बजावून देखील आज इंदोरीकर महाराज अनुपस्थित होते. संगमनेर कनिष्ठ न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. मूळ फिर्यादीच्या अर्जावरही होणार 21नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल.
खूनप्रकरणात जिल्हा न्यायालयाने 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धुळे जिल्ह्यातील अनकवाडी येथील खून प्रकरणांमध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदाच 14 जणांना एकत्र जन्मठेपेची सुनावण्यात आली. विशेष सरकारी वकील एड देवेंद्र तवर यांनी ही माहिती दिली.
ओबीसी समाजाला वेठीस धरणं अयोग्य असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली. सरकारने सरसकट नोंदी दिल्या तर रस्त्यावर उतरुन लढू असा इशारा त्यांनी दिला. छगन भुजबळ यांना टार्गेट करण्यात येत आहे. ते सरकारमध्ये असोत वा नसतो, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. मराठा समाज हा मागास नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. राज्यात ओबीसी समाज मोठा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकात आम्ही पण कमी नाही, हे दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलीस पाटलांचे आमरण उपोषण सुरु आहे. आयुक्तलयासमोर मराठवाड्यातील पोलीस पाटील जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पोलीस पाटील यांना दर महा 25 हजार रुपये मानधन देण्यात यावे, नुतनीकरण अट रद्द करण्यात यावी, निवृत्ती वयो मर्यादा 60 वर्षावरून 65 वर्ष करण्यात यावी यासह आठ मागण्यासाठी हे पोलीस पाटलांचे आमरण उपोषण सुरु आहे.
धनगर आरक्षण एसटीतून द्यावे ही आमची आग्रही मागणी, त्यासाठी आम्ही लढत राहू, येत्या जानेवारीपर्यंत थांबा तुम्ही पाहाल की आम्ही आरक्षण घेऊनच राहू , दाखले द्यायला सरकार सुरुवात करेल, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या विधानाला नीट ऐकणं गरजेचं आहे, सरकार सकारात्मक आहे, असे ही ते म्हणाले.
नवी मुंबईतील राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अर्थात दिवाळी बोनस जाहीर केला आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि सरचिटणीस जे. टी. पाटील यांनी मंगळवारी द्वारसभा घेऊन व्यवस्थापनाच्या या निर्णयाची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि हितासाठी सिडको एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे हक्क आणि हितासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला जातो. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात प्रत्येक वर्षी वाढ केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बोनसच्या रकमेत वाढ केल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आज शहरात परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे आज मी सत्कार घेणार नाही. महिला कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा पंकजा मुंडे यांनी नाकारला आहे. रंजना नागरे यांनी ठेवला होता सत्कार सोहळा. जाळपोळ झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नाकारला सत्कार
मंत्रिमंडळ बैठकीत महत्वचे निर्णय झाले आहेत. निर्यात पॉलिसीला मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे. आजपर्यत निर्यात होत होती त्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. उद्योग विभाग ज्या ज्या भागात काम करत त्या निर्यात पॉलिसीला मान्यता दिली. यामुळ रोजगार निर्मिती होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलीस पाटलांचे आमरण उपोषण सुरू आहे. याठिकाणी मराठवाड्यातील पोलीस पाटील जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पोलीस पाटलांना दर महा 25 हजार रुपये मानधन देण्यात यावे, नुतनीकरण अट रद्द करण्यात यावी, निवृत्ती वयो मर्यादा 60 वर्षावरून 65 वर्ष करण्यात यावी. या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथे श्रीकृष्ण मंगल कार्यालयात भव्य बहुजन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी
करेंगे या मरेंगे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
भाजप नेत्या पंकजा मुंडे बीड दौऱ्यावर आहेत. जाळपोळ प्रकरणी पाहणी करण्यासाठी मुंडे बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. भाजप कार्यालय, सेना कार्यालयाची पाहणी केली आहे. आता पंकजा मुंडे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यावर पोहचल्या आहेत आणि तिथे चर्चा करत आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महिला आयोग आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. महिला आयोगाकडून नितीशकुमार यांचा निषेध करण्यात आलाय. नितीशकुमार यांनी माफी मागण्याची महिला आयोगाची मागणी केलीये. नितीनकुमारांनी बिहार विधीमंडळात महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
सराटेंच्या ओबीसी याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. प्रकरण जूनं असल्याने महाधिवक्त्यांंकडून वेळ वाढवून द्या अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे वेळ वाढवून देऊ नका अशी मागणी याचिका कर्त्यांनी कोर्टाला केली आहे.
कार्तीकी एकादशीच्या महा पुजेला देवेंद्र फडणवीसांना बोलावणार की अजित पवारांना बोलावणार हे विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून ठरवणार असल्याचं मंदिर समितीनं सांगितलं. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली आहे. मंदिर समिती पूजेसाठी आमंत्रण देण्यासाठी जाणार नाही असंही ते म्हणाले.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी दोन ते अडीच हा ब्लॉक घेतला जातोय. दुपारी दोन ते अडीच हा ब्लॉक आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून आता वंजारी समाज आक्रमक झाला आहे. वंजारी समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. जय भगवान महासंघाचे अध्यक्ष वाळासाहेब सानब यांनी ही मागणी केली आहे.
सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. संध्याकाळी पाच वाजता जरांगे सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटणार असल्याची माहिती आहे. टाईम बाँड संदर्भात सरकारचं शिष्ट मंडळ जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आज ईडी चौकशीसाठी हजर राहाणार नाही अशी माहिती त्यांच्या वकीलाने दिली आहे. ईडीकडे कागदपत्र जमा करण्यासाठी त्यांनी चार आठवड्यांचा वेळ त्यांनी मागितला आहे.
सावंतवाडीत मराठा समाजाने बाईक रॅलीचे आयोजन केले होते.संपूर्ण सावंतवाडी शहरातून निघालेल्या या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. जरांगे पाटील यांचे समर्थन करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यात आली.
नगर येथील एक कोटीच्या लाच प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी गणेश वाघ अद्याप फरार आहे. त्याच्याविरोधात देशभरात लूकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. धुळे एमआयडीसी येथील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला शोधण्यासाठी आणखी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
मराठा आरक्षणप्रश्नी 8 जिल्हाधिकाऱ्यांची उद्या मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या नोंदीवर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
कोल्हापूरात ऊस आंदोलक आक्रमक झाले आहेत. कारगदा परिसरात शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं आहे. सीमाभागातून महाराष्ट्रात येणारे ट्रॅक्टर पेटवण्यात आले.
मुंबई पोलिसांनी सौरभ चंद्राकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महादेव ॲपप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ॲपद्वारे 15 हजार कोटींची फसवणूक करण्यात आली होती.
बीड : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाले असून आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. बीडमध्ये धनगर समाज रस्त्यावर उतरला असून बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात हजारो धनगर बांधव सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय
नाशिक : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी हास्यास्पद असल्याचे म्हणत देवयानी फरांदे यांनी समान पाणी वाटपाचा कायदा फक्त नाशिक साठीच का ? असा सवाल केलाय. नाशिक जिल्ह्यात सध्या अनेक भागात दुष्काळ परिस्थिती आहे. पाणी सोडलं तर येणाऱ्या दिवसात नाशिकला ट्रेनने पाणी पुरवावे लागेल. मेंढीगिरी अहवालाचा पुन्हा आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटलेय. सर्वाधिक पाणी वाटपाच्या संस्था नाशिकमध्ये, तशा संस्था मराठवाड्यात का नाही, यासंदर्भात 5 तारखेला न्यायालय देईल तो निर्णय मान्य असणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेत. दुपारी एक वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक असून यावर आणि मराठा आरक्षणावर छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर गोंधळ होण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी आले असल्याची सूत्रांची माहिती
बीड : आदिवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये धनगर समाज हा रस्त्यावर उतरला असून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा धनगर समाजाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा थेट बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला आहे. हातात पिवळे झेंडे आणि भंडारा उधळत धनगर समाजाने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.
जुनी पेंशन योजना लागू केली नाही तर १४ डिसेंबरपासून शिक्षक संघटना बेमुदत संपावर जाणार आहे. पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगजवळ शिक्षक संघटनांचा आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा. जुनी पेंशन मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असून सेंट्रल बिल्डिंगमध्ये ठिय्या मांडण्यात आलं आहे. यामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले आहेत.
ओबीसीमध्ये मराठा आले तर कुणाला काहीच मिळणार नाही. ओबीसी आरक्षण संपण्याचा घाट घातला जातोय.
ओबीसीसाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. ओबीसी आरक्षण टिकवणं हा माझ्या समोर प्रश्न – छगन भुजबळ
मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पण ओबीसी प्रवर्गात नको – छगन भुजबळ
ओबीसीमध्ये जे आहेत त्यांना बाहेर ढकलण्याचं काम सुरू आहे – छगन भुजबळ
ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली होती. यासुनावणीसाठी छगन भुजबळ मुंबई हायकोर्टात दाखल झालेत. यावेळी त्यांनी राज्यातील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करून ओबीसी आरक्षणाचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी अनेक आरक्षित गाड्यांचे बुकिंग 15 दिवसांपूर्वीच झाले फुल झालेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
मराठा हा कुणबी नाही तर मग कोण? मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र भेटेलच. मराठा काय अमेरिकेतून किंवा पाकिस्तानातून आला आहे का? भुजबळ अभ्यासू नेते असून विरोध करतात याचं नवल वाटत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
पवन कल्याणच्या जनसेना पक्षाचे आठ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. जनसेना पक्षाची भाजपसोबत तेलंगणा राज्यात आघाडी आहे. कोडाद, कुकटपली सह नगरकर्नुल मध्ये जनसेना पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाची निवडणूक होणार आहे. संचालक मंडळाची बैठक सुरु आहे. दत्ता भरणे आणि संजय जगताप यांची नावं चर्चेत आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागितली आहे. काल विधानसभेत महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. विरोधकांच्या सडकून टीकेनंतर नितेश कुमार यांनी जाहीर माफी मागितली आहे.
रोहित पवारांनी पुन्हा शरद पवारांचा साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो ट्विट केला आहे. परिस्थिती कितीही विरोधात असली.. मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं… नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते… मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं…, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
परिस्थिती कितीही विरोधात असली.. मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं… नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते…
मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय!… pic.twitter.com/lzkST86EWE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 8, 2023
सोलापुरातील बार्शी तालुक्यात जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू आहे. बार्शीतील साखळी उपोषणाचा तेरावा दिवस सुरू आहे. सकल मराठा समाजातर्फे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मंत्रीपदावर राहून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका ही मागणी असंविधानिक असल्याने भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
पुरावे असतानाही 40 वर्षे मराठा समाजाचं वाटोळं झालं. पण आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय. आम्हाला आरक्षण मिळतंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत. मराठा नेत्यांमुळेच मराठा समाजाचं नुकसान झालंय.
पंचगंगा नदीला पुन्हा एकदा प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. नदीत मृत माशांचा मोठा खच पडला आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यावर पहाटेपासून पाण्यातील माशांचा प्रदूषणामुळे तडफडून मृत्यू
गोव्यात 20 नोव्हेंबर पासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाला सलमान खानची उपस्थिती असणार आहे. गोव्यातील इफ्फीमध्ये यंदा तीन ठिकाणी चित्रपटांचे ओपन स्क्रीनिंग केलं जाणार आहे.
पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यामध्ये माजी नगरसेविकांसह नव्या व जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी कार्यकारिणी जाहीर केली.
दक्षिण रत्नागिरीत मध्यरात्री पावसाच्या कोसळधारा
रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वरमध्ये पाऊस
विजांच्या कडकडाटासह पाऊस,
सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ हवामान. आज देखील पावसाचा हवामान खात्याचा इशारा.
भात कापणी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पोटात गोळा.
रत्नागिरी मुंबई प्रवास 50 रुपयांनी महागला
रत्नागिरी मुंबई पुर्वी 525 रुपये आता मोजावे लागणार ५७५ रुपये
रत्नागिरी बोरिवली 550 ऐवजी आता 606, रत्नागिरी ठाणे 505 ऐवजी आता 560 रुपये लागणार.
राजापूर मुंबईसाठी 595 रुपये आता 655 रुपये, लांजा बोरिवलीसाठी पूर्वी 557 रुपये आता 635 रुपये मोजावे लागणार.
7 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यत ही दरवाढ असणार आहे.
हिवाळी सुट्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांना लालपरी भाडेवाढीचा देणार झटका.
सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाच्या सरी, पलूस भागात पहाटेपासून अवकाळी पाऊस तर जत तालुक्यातील उमदी भागात देखील पाऊस. या अवकाळी पाऊसाने द्राक्ष बागांसह अन्य पिकांवर रोगांचा धोका.
अहमदनगर येथील एक कोटीच्या लाच प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी गणेश वाघ अद्याप फरार आहे. एमआयडीसी धुळ्याचा कार्यकारी अभियंता असलेल्या गणेश वाघ विरोधात देशभरात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट असणार आहे. यामुळे प्रशासनाकडून संभाव्य टंचाई आराखडा तयार करुन सरकारकडे पाठवला आहे. डिसेंबरनंतर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होणार आहे.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी आज निवडणूक होत आहे. अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे. नव्या संचालक निवडीचे सर्व अधिकार अजित पवार यांच्याकडे दिले आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत छगन भुजबळ विरुद्ध शिंदे गटातील मंत्री असा पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळ यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यावर शिंदे गटातील मंत्री भुजबळ यांच्यावर टीका करत आहे.