Maharashtra Breaking News in Marathi : राहुल गांधी यांची भाजपवर चौफेर टीका
Maharashtra Breaking News in Marathi : आज 17 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई | 17 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता होणार आहे. त्यासाठी मुंबईत आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेण्यात येणार आहे. सभेतून इंडिया आघाडीचे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी या स्थानकांदरम्यान रविवारी दिवसा ब्लॉक घोषित केला आहे. कोकण मंडळातील वर्षानुवर्षे विक्री न झालेल्या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा सवलत योजना राबवणार आहे. त्यानुसार एकगठ्ठा किमान शंभर घरे खरेदी करणाऱ्यांना १५ टक्क्यांची घसघशीत सवलत दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील ३० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
प्रकाश आंबेडकर सभास्थळी दाखल
मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीच्या सभास्थळी दाखल झाले आहेत.
-
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
मुंबई | उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मंचावर दाखल झाले आहेत. व्यासपीठावर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.
-
-
उद्धव ठाकरे सभास्थळाकडे रवाना
मुंबई : शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथील इंडिया आघाडीच्या सभेसाठी ‘मातोश्री’हून रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील सोबत आहेत.
-
राहुल गांधी सभास्थळी दाखल
मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर आज भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होतोय. या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होत आहे.
-
उबाठा गटाचे विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश
उबाठा गटाचे नंदुरबारमधील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
-
-
शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे, आज काळा दिवस- एकनाथ शिंदे
आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्या ठिकाणी काँग्रेसची सभा होतं असून त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. ज्या राहुल गांधीनी सावरकर यांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडीलावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
-
वाशिमच्या मंगरूळपीर आणि कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस
वाशिमच्या मंगरूळपीर आणि कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे संत्रा बागेचे नुकसान होणार आहे. तर या अवकाळी पावसामुळे मागील दहा ते पंधरा दिवसापासून उकाड्यांने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
-
फाळणी हे काँग्रेसचे एकमेव आणि सर्वात मोठं पुण्य कर्म – आनंद दवे
पुणे : फाळणी हे काँग्रेसचे एकमेव आणि सर्वात मोठं पुण्य कर्म आहे. या निर्णयामुळे एकाच फटक्यात 60% वरून देशातील हिंदूंची संख्या 85% झाली. या निर्णयामुळे बहुसंख्य मुस्लिम संख्या पाकिस्तानला गेली. हजारो वर्ष एकत्र राहूनसुद्धा कधीच एकत्र न आलेल्या संस्कृती आणि विकृती काँग्रेसने वेगळ्या केल्या असे आनंद दवे यांनी म्हटले आहे.
-
महायुतीत नाराजी, मोहिते पाटील यांनी बोलावली बैठक
अकलूज : माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली आहे. फलटणचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील , धैर्यशील मोहिते पाटील या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह उर्फ बाळ दादा मोहिते पाटील बैठकीला उपस्थित रहाणार आहेत.
-
तर पालकांवर गुन्हे दाखल होणार, अमितेश कुमार
पुणे : अल्पवयीन मुलांकडून कुठला गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे काम त्यांच्या पालकांचे सुद्धा आहे. त्यामुळे जर अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर त्या मुलांच्या पालकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तसेच, पुण्यात कोयत्याने हल्ले रोखण्यासाठी शहरात कुठे कुठे कोयते विकले जातात यावर लक्ष देण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
-
पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या महायुतीची समन्वय बैठक
पुणे : मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे लोकसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघाची ही बैठक होत आहे. या बैठकीला महायुतीमधील घटक पक्षाच्या पदाधिकारी यांना बोलविण्यात आले आहे. सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय रहावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
-
सोलापूर लोकसभेसाठी भाजप आमदार राम सातपुते यांचा नावाची शक्यता?
सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध भाजप आमदार राम सातपुते यांना लोकसभेला उतरवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. आमदार राम सातपुते यांना पक्षाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राम सातपुते हे भाजपचे माळशिरसचे आमदार आहेत.
-
‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत आता शाळांमध्ये वाजविले जाणार
‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत आता शाळांमध्ये गायले आणि वाजविले जाणार असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. मनसेने यासंदर्भात मागणी केली होती.
-
खासदार उन्मेश पाटील यांना पुन्हा तिकीट मिळावे यासाठी गावकऱ्यांचे आंदोलन
खासदार उन्मेश पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी जळगाव तालुक्यातील बारा गावांमधील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी एल्गार पुकारात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
-
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप 24 तासात ?
महायुतीच जागावाटप येत्या 24 तासात जाहीर होणार , सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजप हायकमांड चर्चा करणार
-
फारुख अब्दुल्ला यांचे मुंबई विमानतळावर आगमन
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, ही खूप चांगली गोष्ट आहे, भारताला एकत्र करण्याचा प्रयत्न आहे, आपली परंपरा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे,
-
आमश्या पाडवी यांचा शिवसेना प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान उबाठा गटाचे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी याचा पक्ष प्रवेश होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आमदार आमश्या पाडवीसह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधणार आहे.
-
वर्षा गायकवाड यांच्याकडून पाहणी
मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी भारत जोडो न्याय यात्राच्या समारोप सभास्थळाची पाहणी केली आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्षाचे नेते येणार आहेत. देशाचे संविधान वाचविण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे.
-
सुडाचे राजकारण सुरु
निवडणुका आल्या आहेत, उन्हाळा वाढत चालला आहे, सुडाचे राजकारण सुरू असल्याचे सुप्रिया सुळे यांनी अरविंद केजरीवाल यांना समन्स प्रकरणात मत व्यक्त केले. कालच त्यांना रिलीफ मिळाला होता मात्र पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावण्यात आल्या आहेत.
-
सोने-चांदीत चढउतार
या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र होते. सोन्याने मोठी मजल मारली नसली तरी चांदीत किलोमागे मोठी पडझड झालीच तशी जोरदार दरवाढ पण झाली.
-
अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा ईडीचे समन्स आले आहे. तब्बल 9 व्या वेळा ईडीकडून केजरीवाल यांना समन्स पाठविण्यात आले आहे. येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राजधानी दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडी कडून समन्स पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत एकाही वेळेला केजरीवाल ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत.
-
गुहागरमध्ये शिमगोत्सव धूम
रत्नागिरीतील गुहागरमध्ये शिमगोत्सव धूम सुरु आहे. नमन मंडळाचे खेळे सुरू आहे. खेम झोलाई नमन मंडळमधील संकासुर लक्षवेधी असतो.
-
इंडिया आघाडीला ३०० जागा
इंडिया आघाडीला ३०० जागा मिळतील तर राज्यात महाविकास आघाडी ४० जागा खेचून आणतील अशी आमची गॅरंटी असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
-
काँग्रेसमुळे देशाला नेतृत्व मिळाले
काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाला नेतृत्व मिळाले. विज्ञानवादी दृष्टिकोन मिळाला. तर भाजपमुळे देशात धार्मिक दंगे झाले. ज्या देशाचा राजा व्यापारी असतो तिथली जनता भिकारी असते, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
-
महायुतीचे नेते दिल्लीला जाणार
दिल्लीतून निरोप आल्यानंतर महायुतीचे नेते रवाना होणार आहेत. आज किंवा उद्या जागा वाटपाबाबत महायुतीची बैठक दिल्लीत होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत बैठक होईल.मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मित्र पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी होतील.
-
Live Update | लिफ्टमध्ये अडकलेल्या सात जणांची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप
लिफ्टमध्ये अडकलेल्या सात जणांची पिंपरी- चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केलीय… इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट अडकली.. यात सात जण अडकले होते, अडकलेल्या व्यक्तींमध्ये दहा वर्षीय मुलाचा देखील समावेश होता… या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी इतर व्यक्तींच्या मदतीने सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
-
Live Update | ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपावरून नाराजी – सुत्र
कोल्हापूनंतर, हातकंणगले, अमरावती आणि रामटेकही सोडण्याची शक्यता… मतदारसंघ क्राँगेसला सोडत असल्यानं कार्यकर्ते ठाकरेंच्या नेत्यांवर नाराज… शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याचा राजू शेट्टींना ठाकरेंचा प्रस्ताव, राजू शेट्टी मातोश्रीवर आल्यानं ऊबाठा सैनिकांचं टेन्शन वाढले
-
Live Update | शिरुरच्या जागेसंदर्भात अजित पवारांनी मुंबईत बोलवली बैठक
शिरुरच्या जागेसंदर्भात अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलवली आहे. अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
Live Update | दिल्लीतून निरोप आल्यानंतर महायुतीचे नेते रवाना होणार
आज किंवा उद्या जागा वाटपाबाबत महायुतीची बैठक दिल्लीत होण्याची शक्यता… केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत होणार बैठक… मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मित्र पक्षांचे नेते बैठकीत सहभागी होणार… महायुतीच्या नेत्यांना अद्याप दिल्लीतून बैठकीची वेळ कळवण्यात आली नाही
-
लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
कल्याण लोकसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे सह अनेक पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे.
-
महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार, आरोपीला 2 वर्षांची शिक्षा
बातमी गोंदियातून… शौचास गेलेल्या महिलेला लैंगिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपीला 2 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला आहे. पाच साक्षीदारांची न्यायालयात तपासणी केली गेली. त्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिलाय.
-
गडचिरोली- चिमूरमध्ये मतदारांची संख्या किती?
गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात क्षेत्रासाठी सहा विधानसभाच्या समावेश आहे. तर एकूण 16 लाख 13 हजार 096 मतदारांच्या अधिकार बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी 1886 मतदान केंद्राच्या समावेश आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात अहेरी गडचिरोली आरमोरी आमगाव चिमूर ब्रह्मपुरी या सहा विधानसभा क्षेत्राच्या समावेश आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया तीन जिल्ह्यांच्या समावेश आहे.
-
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाण्याची शक्यता
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. जागा वाटपाबाबत दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार आहेत. जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. महायुतीत ५ जागांबाबतचा तीढा अद्यापही कायम आहे. आज महत्वाचा निर्णय होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
-
Marathi News | आमदार आमश्या पाडवी शिंदे सेनेत
ठाकरे गटाचे नेते आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आमदार पाडवी कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशांनी निघाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
-
Marathi News | भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता आज मुंबईत शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने होणार आहे. या सभेतून इंडिया आघाडीचे देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. दक्षिण भारतातील कन्याकुमारी येथून राहुल गांधी यांनी पहिली भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू केली होती.
-
Marathi News | मुंबईतून व्हिसा अर्जात ३० टक्क्यांची वाढ
मुंबई गेल्या वर्षात मुंबईतून जगप्रवास करण्यासाठी व्हिसा मागण्याच्या अर्जात त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनापूर्व काळात झालेल्या अर्जांच्या ९० टक्केपर्यंत अर्ज मागील वर्षी आल्याची माहिती समोर आली आहे.
-
Marathi News | म्हाडा घराच्या विक्रीसाठी सवलत
कोकण मंडळातील वर्षानुवर्षे विक्री न झालेल्या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा सवलत योजना राबवणार आहे. त्यानुसार एकगठ्ठा किमान शंभर घरे खरेदी करणाऱ्यांना १५ टक्क्यांची घसघशीत सवलत दिली असून याबाबतची निविदा म्हाडाने काढली आहे.
Published On - Mar 17,2024 7:13 AM