Ajit Pawar New Cabinet Ministers : अजित पवारांचा मोठा गेम, 9 पैकी तब्बल 5 नव्या चेहऱ्यांना थेट मंत्रिपदाची संधी, वाचा A टू Z
देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 5 नवीन चेहरे आहेत. विशेष म्हणजे दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. या नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये 5 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात तीनही पक्षांकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी देखील 9 पैकी तब्बल 5 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. इंद्रनील नाईक यांना पहिल्यांदाच राज्य मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. या सर्व 5 नव्या मंत्र्यांचा राजकीय प्रवास काय पाहिला आहे त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
1) माणिकराव कोकाटे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमजार माणिकराव कोकाटे यांनी आज मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. माणिकराव कोकाटे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी परिस्थितीनुरुप विविध पक्षांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते जिंकून आले होते. तसेच 2004 मध्येही ते जिंकून आले होते. यानंतर ते 2009 मध्ये काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळात काँग्रेसमध्ये काम केलं होतं. त्यामुळे त्यांची घरवापसी झाल्याचं बोललं जात होतं.
माणिकराव कोकाटे 2009 मध्ये तिसऱ्यांदा निवडून आले होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश करत निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. पण 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत विधानसभेत कमबॅक केलं होतं. यानंतर 2024 च्या निवडणुकीत ते अजित पवार गटाकडून लढत होते. अजित पवार यांनी सिन्नरच्या नागरिकांना कोकाटे यांना आमदार म्हणून जिंकून आणलं तर मंत्री करणार, असं वचन दिलं होतं. ते वचन अजित पवारांनी पाळलं आहे.
2) नरहरी झिरवळ
नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. नरहरी झिरवळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सलग चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जायचे. पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं. त्यांना आधी विधानसभेचं उपाध्यक्षपद आणि आता मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
3) मकरंद जाधव
राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनीदेखील आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते वाई मतदारसंघातून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना अजित पवारांनी आता मंत्रिपदाची संधी दिली आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील अशा दिग्गज नेत्यांना डच्चू देत अजित पवार यांनी मकरंद जाधव यांना संधी दिली आहे.
4) बाबासाहेब पाटील
अजित पवार यांनी नव्या मंत्रिमंडळात आपल्या पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनादेखील संधी दिली आहे. बाबासाहेब पाटील हे 2019 आणि आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2019 मध्ये अहमदपूर हे भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होतं. तरीही त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर ते 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही जिंकून आले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्यावर खूश होत त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे.
5) इंद्रनील नाईक – राज्य मंत्रीपद
अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार आमदार इंद्रनील नाईक यांनादेखील मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. इंद्रनील नाईक यांनी आज राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. इंद्रनील नाईक हे पुसद मतदारसंघातून सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर ते पुसद येथून त्यांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे इंद्रनील नाईक हे धाकटे चिरंजीव आहेत.