Shiv Sena New Ministers : सर्वसाधारण शिवसैनिक ते आमदार आणि आज मंत्री, 6 नव्या शिवसैनिकांना मंत्रिपदाची शपथ, वाचा त्यांची कारकीर्द
शिवसेनेच्या एकूण 11 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज अखेर 15 डिसेंबरला नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नव्या सरकारच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये 4 मंत्री आणि 2 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे संजय राठोड यांनादेखील मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात डच्चू दिला जाईल, अशी चर्चा होती. त्यांना आता परत संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या एकूण 11 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. दरम्यान, शिवसेनेच्या कोणकोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
1) संजय शिरसाट
संजय शिरसाट हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नेते आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर संजय शिरसाट यांनी अनेकदा माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे यांची बाजू खमकेपणाने मांडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या प्रवक्ता पदाची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर संजय शिरसाट सातत्याने आपल्या पक्षाची भूमिका मांडत राहिले. ते विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देत आले. 2022 मध्ये शिंदे सरकार स्थापन झालं तेव्हाच ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. त्यामुळे शिरसाट यांना संधी मिळालीच नाही. अखेर विधानसभा निवडणुकीआधी त्यांना सरकारकडून महामंडळाच्या वाटपात सिडकोच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती.
यानंतर आता शिरसाट यांना मंत्रिपदाची अखेर संधी देण्यात आली आहे. शिरसाट हे 2000 साली संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर 2001 मध्ये ते सभागृह नेता झाले होते. त्यांना 2009 मध्ये शिवसेनेकडून आमदारकीचं तिकीट मिळालं होतं. तेव्हापासून ते सलग चारवेळा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची आज इच्छा पूर्ण झाली आहे.
2) भरत गोगावले
भरत गोगावले हे देखील एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक नेते आहेत. गेल्या सरकारमध्येच भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण काही कारणस्तव त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. गोगावले हे सलग चारवेळा महाड विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले आहेत. भरत गोगावले यांचा मोठा राजकीय प्रवास आहे. त्यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. सरपंच ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
भरत गोगावले दोनवेळा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. तसेच पशू, अर्थ, बांधकाम अशा विविध खात्यांचे दोनवेळा त्यांनी सभापतीपदही भूषवलं आहे. त्यांनी महाडमध्ये शिवसेना पक्ष वाढवला. ते रायगडमधील शिवसेनेचे मोठे नेते आहेत. ते 2009 मध्ये पहिल्यांदा आमदारकीसाठी विधानसभा निवडणूक लढले होते. तेव्हापासून सलग चारवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.
3) प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक हे देखील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नेते आहेत. प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवाळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. चारवेळा आमदार झाल्यानंतर ते आज पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत.
4) प्रकाश आबिटकर
प्रकाश आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2014, 2019 आणि 2024 असं सलग तीनवेळा आमदार म्हणून जिंकून आले आहेत.
5) आशिष जैस्वाल – राज्यमंत्रीपद
आशिष जैस्वाल यांना पहिल्यांचा मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. त्यांना नव्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आशिष जैस्वाल हे 2019 मध्ये रामटेक मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्याआधी 2009 मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावर जिंकून आले होते. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर जिंकून आले आहेत. त्यांच्यावर खूश होत एकनाथ शिंदे यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे.
6) योगेश कदम – राज्यमंत्रीपद
योगेश कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत. योगेश कदम हे 2019 आणि आता 2024 असे सगल दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्य मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.