मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित, पण गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना, महायुतीच्या आजच्या बैठकीत तोडगा निघणार?
या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला किती मंत्रिपद द्यायची, कोणती मंत्रिपद कोणाला मिळणार यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत गृहमंत्रिपद कोणाला मिळणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला.
Maharashtra Cabinet Formation : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून दोन आठवडे उलटले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर त्यांचे सरकार स्थापन झाले. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झाले. तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका पार पडताना दिसत आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील राजकारणात मंत्रिमंडळ विस्तारावरुन जोरदार हालचाली सुरु असताना आज महायुतीची मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
महायुतीच्या खातेवाटपाटाचा तिढा संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तिन्हीही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला किती मंत्रिपद द्यायची, कोणती मंत्रिपद कोणाला मिळणार यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत गृहमंत्रिपद कोणाला मिळणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला.
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युलाही निश्चित
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, येत्या १४ डिसेंबरला महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गृहखाते, महसूल खात्याऐवजी नगरविकास मंत्रिपद मिळेल. तर भाजप स्वत:कडे गृहमंत्रिपद ठेवेल, असे म्हटले जात आहे. या बैठकीत महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला आहे. यानुसार भाजप 20, शिंदे गट 13, अजित पवार गट 10 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रात्री मुंबईत महायुतीची बैठक
दिल्लीत खातेवाटपाच्या या बैठकीनंतर आज रात्री मुंबईत महायुतीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तिघेही उपस्थितीत असणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. तसेच कोणते खाते, कोणत्या आमदाराला मिळणार यावरही आजच शिक्कामोर्तब केला जाणार आहे. तसेच गृहमंत्रिपद कोणाला दिले जाणार यावर निर्णय होणार आहे.