संध्याकाळी 6 वाजेनंतरची 17 लाख मतं कुठून आली? ईव्हीएमच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात सडेतोड उत्तर
"मारकडवाडीत काय काय चाललं? मला कुणाचं आश्चर्य वाटलं नाही. मला फक्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आश्चर्य वाटलं. पवार हे बॅलन्स नेते आहेत. काँग्रेसने अनेकवेळा ईव्हीएमवर आरोप केले. पण पवार कधीच बोलले नाहीत", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक यश आलं आहे. पण या यशानंतर विरोधकांकडून ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. संध्याकाळी 6 वाजेनंतर अचानक मतदानाची आकडेवारी कशी वाढली? असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. ईव्हीएमबाबतच्या या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात प्रत्युत्तर दिलं. विधिमंडळाचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांकडून केल्या जात असेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
“सहा वाजेनंतरचं मतदान १७ लाख आहे. ५ ते ६ वाजेचं मतदान गृहित धरलं नाही आणि ७५ लाख मतदान आलं कुठून? रोज विचारलं तर कसं चालेल? कुठून आलं नाही. जनतेनेच आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही जिंकून आलो”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.
मारकडवाडीच्या आरोपांवर फडणवीस काय म्हणाले?
“मारकडवाडीत काय काय चाललं? मला कुणाचं आश्चर्य वाटलं नाही. मला फक्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आश्चर्य वाटलं. पवार हे बॅलन्स नेते आहेत. काँग्रेसने अनेकवेळा ईव्हीएमवर आरोप केले. पण पवार कधीच बोलले नाहीत. यावेळी पवार बोलले. म्हणाले, छोटी राज्य काँग्रेसला आणि मोठी राज्य भाजपला. मला सांगा, पश्चिम बंगाल छोटं राज्य आहे? ममता दीदी आणि ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या, असा सल्ला दिला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
‘ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही’
“मारकडवाडीत २०१४ची निवडणूक झाली. विजयसिंह मोहिते पाटलांना ५३३ मते आहेत. सदाभाऊ खोत यांना ६६४ मते आहेत. लोकसभेत, २०१९ची लोकसभेची निवडणूक पाहा. रणजितसिंह निंबाळकर ९५६ मते आणि संजय मामा शिंदे यांना ३०० मते आहेत. सर्वच आकडेवारी माझ्याकडे आहे. राम सातपुते सारखा सामान्य कार्यकर्ता पाच वर्ष राबतो. एकट्या मारकडवाडीत २२ कोटींची कामे करतो. त्याला जास्त मते मिळाल्यावर तुम्ही लोकांना धमकावता. ही धमकी होती. हे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. बॅलेटचं वोटिंग घ्यायचं. त्यात मतदान पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे. ही कोणती पद्धत आहे? ही कोणती लोकशाही आहे? ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
‘राज्यात २०१२ नंतर व्हिव्हीपॅट आहे’
“पहिल्यांदा लक्षात ठेवा. या देशात २०१२ पर्यंत ईव्हीएम होतं. त्यानंतर ईव्हीएम नाही. २०१२ नंतर व्हिव्हीपॅट आहे. व्हिव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे. आपण मतदान केल्यावर आपल्याला चिन्ह दिसतं. ते चिन्ह बॅलेट बॉक्समध्ये जातं. ईव्हीएमच्या मोजणीत व्हीव्हीपॅटचं मतदानही मोजलं जातं. ते जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो. आपण एकप्रकारे बॅलटवरच मतदान करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.