Devendra Fadnavis : शिंदेंच्या प्रोजेक्टसना स्थगिती देण्याच्या बातम्यांवर अखेर फडणवीसांनी सोडलं मौन
Devendra Fadnavis : "आम्ही कधीच छत्रपतींच्या वारसांकडे दाखले मागितले नाहीत. तुम्ही छत्रपतींचे वारस आहात याचा दाखला काय, असं मागणारे आम्ही नाही. शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही आहोत असं मानणारे आम्ही आहोत" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“जनादेश जसा दणदणीत आहे, तसाच तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून चालण्याचा जो मार्ग दिला आहे. त्या मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे, असं मानतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. “गड किल्ल्यांचं अतिक्रमण हटवत आहोत. 12 किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज झाले पाहिजेत, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. आशिथ शेलार पॅरिसला जाऊन आले. त्यांनी तिथे प्रेझेंटेशन दिलं” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. “शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबाबत अतिउच्च आदर असलेलं हे सरकार आहे. आम्ही कधीच छत्रपतींच्या वारसांकडे दाखले मागितले नाहीत. तुम्ही छत्रपतींचे वारस आहात याचा दाखला काय, असं मागणारे आम्ही नाही. शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही आहोत असं मानणारे आम्ही आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आम्ही 100 दिवसांचं मिशन हाती घेतलं आहे. तालुका स्तरापर्यंतची कार्यालये आहेत. त्यांना सात गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात लोकाभिमुखतेपासून तिथलं रेकॉर्ड चांगलं ठेवण्यापासून ते सोयी सुविधा आणि लोकांना भेटण्याच्या वेळा ठरवण्याप्रमाणेच तसेच लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे टार्गेट दिलं आहे. प्रत्येक मंत्रालयालाही टार्गेट दिलं आहे. काम चांगलं करण्यास सांगितलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1 मे रोजी त्यांचा गौरव होणार
“क्वॉलिटी ऑफ इंडियाची नेमणूक केली. ती प्रत्येक खात्याचं मूल्यमापन करेल. 100 दिवसात किती काम केलं, त्याचा इंडेक्स तयार करू. ज्यांना 50 पेक्षा कमी मार्क मिळतील, त्यांना निगेटिव्हमध्ये टाकू आणि 1 मे रोजी चांगलं काम करणाऱ्या खात्याचा गौरव करू” असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘तिघे एकत्र मिळून निर्णय घेतो’
“काही झालं तर शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली असं माध्यम चालवतात. ही पेड बातमी आहे. कामाला स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाहीये. आम्ही तिघे मिळून निर्णय घेतो. आम्ही चर्चा करूनच स्थगिती दिली आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी फडणवीसांवर ठपका. खात्याच्या मंत्र्याने केंद्राच्या सल्ल्याने, निकषाने स्थगिती दिली तरी शिंदेंच्या खात्यात फडणवीस यांनी स्थगिती दिली असं दाखवलं जातं. एक सांगतो. हे समन्वयाने चालणारं सरकार आहे. आम्ही तिघे एकत्र मिळून निर्णय घेतो. बैठका होतात. काही बैठकांना दादा असतात काहींना शिंदे असतात, काहींना दोघेही असतात. पण जो आला नाही तो नाराज असं दाखवलं जातं. माध्यमांना क्वॉलिटीच्या बातम्या सापडत नाही आणि विरोधकांनाही क्वॉलिटीची टीका करता येत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.