भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमात कोरोनाचा स्फोट, तब्बल 69 ज्येष्ठ नागरिक कोव्हिड पॉझिटिव्ह
भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील खडवली येथे नदी किनारी मातोश्री वृद्धाश्रम आहे. त्या ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापैकी 69 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
भिवंडी : वृद्धाश्रमात राहणाऱ्या तब्बल 69 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात हा प्रकार घडला आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील खडवली येथे नदी किनारी मातोश्री वृद्धाश्रम आहे. त्या ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध नागरिक वास्तव्यास आहेत.
नेमकं काय घडलं?
मागील आठवड्यात येथील काही जणांना ताप आल्याची लक्षणे जाणवू लागली होती. उपचार सुरु करुनही एका वृद्धाचा ताप कमी न झाल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह निघाल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार
मातोश्री वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्वांच्या चाचणीनंतर तब्बल 69 वृद्ध नागरिकांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महिती वृद्धाश्रम व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली आहे.
ओमिक्रॉनची दहशत
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटमुळं सध्या जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेत आढळून आल्यानंतर यूरोपियन यूनियनने तडकाफडकी आफ्रिकेतील विमान उड्डाणं रद्द केली आहेत. ओमिक्रॉन हा डेल्टा वेरिएंटपेक्षा सातपट जास्त संक्रमक सांगितलं जात आहे. मात्र, तो त्यामुळे किती चिंता करण्याची गरज आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अर्थात दक्षिण आफ्रिकेत परिस्थिती गंभीर नसल्याचं तिथल्या आरोग्य विषयक संस्थांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर महाराष्ट्र अलर्ट मोडवर, मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक
ओमिक्रॉनची दहशत जास्त धोका कमी, नवा वेरिएंट आफ्रिकेत 2 महिन्यांपासून, नेमकं काय घडतंय?