मुंबईः गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यावर कोरोनाचं संकट होतं. पण हे संकट काही प्रमाणात कमी होताना दिसतंय. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील या लढाईत मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मिळालाय. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत 26 मार्च 2020 नंतर म्हणजेच गेल्या 18 महिन्यांनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. याकडे मुंबईच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील एक चांगली कामगिरी म्हणून पाहिलं जातंय.
मुंबईत गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत मुंबईच्या कोरोना लढ्याचं कौतुक केलं. मुंबईत गेल्या 24 तासांत 367 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 418 जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचलं. यासोबतच पॉझिटिव्हिटी दर 1.27 टक्क्यांवर आला. विशेष म्हणजे 10 ते 16 ऑक्टोबरमधील पॉझिटिव्हिटी दर केवळ 0.06 टक्के इतका नोंदवण्यात आला. शहरात सध्या 5,030 सक्रिय रुग्ण आहेत.
एकूण शून्य!
आज मुंबई शहरात एकही कोविड-१९ मृत्यूची नोंद झालेली नाही.
आम्ही मुंबईला कोविडमुक्त करण्याकरिता प्रयत्नशील आहोत. आपण देखील काळजी घ्या, व नियमांचे पालन करा.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 17, 2021
राज्यात गेल्या 24 तासांत 1715 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर 2680 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. गेल्या 24 तासांत दुर्दैवानं 29 जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 28 हजार 631 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 65,91,697 वर पोहोचलाय. तर आजवर 64,19,678 जणांनी कोरोनावर मात केली.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, 18 ते 44 वर्षे वयोगटातील 3,38,35,850 व्यक्तींना त्यांच्या पहिल्या लसीचा डोस मिळाला आणि 1 मे पासून या वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 98,95,107 ला दुसरा डोस मिळाला. आतापर्यंत 12,93,707 आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर त्यापैकी 11,04,451 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील 21,45,282 फ्रंटलाईन कामगारांना आतापर्यंत त्यांचा पहिला लसीचा डोस मिळाला आहे आणि त्यापैकी 18,14,514 यांना दुसरा डोस मिळाला आहे.
इतर बातम्या
maharashtra corona virus Mumbaikars, today is Dussehra Diwali, no corona deaths have been reported, the rate of infection has also come down