शिवसेना VS शिवसेना, कोणकोणत्या मतदारसंघांत शिंदे-ठाकरेंचे उमेदवार समोरासमोर? लढाई तीव्र होणार
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 27 जागांवर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात मैदानात असतील.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये प्रचंड घडामोडी घडल्यानंतर आता अखेर विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार? ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने फोडाफोडीचे राजकारण पाहिलं. राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये मोठी फूट पडली आणि दोन पक्षांचे रुपांतर थेट 4 पक्षांमध्ये झालं. शिवसेनेचा एक गट सत्तेत आहे तर दुसरा गट विरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील एक गट सत्तेत आहे तर दुसरी गट विरोधात आहे. केवळ भाजप आणि काँग्रेस पक्षच राज्यात सध्याच्या घडीला एकसंघ आहे. असं असलं तरी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची या राजकारणात सर्वाधिक हानी झाली आहे. कारण शिवसेनेचे फक्त आमदार फुटले नाहीत तर स्थानिक पातळीवरची बरीच संघटना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभी राहिली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता आणखी मोठ्या परिक्षेचा काळ आलेला आहे. कारण विधानसभा निवडणुका आहेत. पक्षफुटीवर सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं? हे मतदानातून स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवारांच्या प्रत्येकी 2 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांनुसार, आतापर्यंत 27 जागांवर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत.
शिवसेना VS शिवसेना, कोणकोणत्या जागांवर?
- कोपरी पाचपाखडीमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरे गटाचे केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर माहिममधून शिंदे गटाच्या सदा सरवणकरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंतांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- भायखळ्यातून शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोज जामसुतकर हे निवडणुकीच्या मैदानात असतील.
- ओवळा मजिवाडामधून शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर ठाकरेंच्या शिवसनेकडून नरेश मणेरा मैदानात आहेत.
- जोगेश्वरी पूर्वमधून शिंदेंच्या शिवसेनेनं रवींद्र वायकरांच्या पत्नी मनिषा वायकरांना उमेदवारी दिलीय. दरम्यान त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनंत बाळा नर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- कुर्ला मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगेश कुडाळकर, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रविणा मोरजकर या मैदानात असतील.
- राजापूरमधून शिंदे गटाच्या किरण सामंतांविरोधात ठाकरे गटाच्या राजन साळवींचं आव्हान असणार आहे.
- कुडाळ मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेच्या निलेश राणेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैभव नाईक मैदानात असतील.
- सावंतवाडीमधून दीपक केसरकरांना ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन तेली आव्हान देणार आहेत.
- रत्नागिरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार उदय सामंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे बाळा माने हे मैदानात असतील.
- महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून भरत गोगावले मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- दापोलीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून योगेश कदम, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय कदम आमनेसामने असतील.
- कर्जतमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र थोरवे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नितीन सावंत मैदानात आहेत.
- मालेगाव बाह्यमधून शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे मैदानात आहेत. भुसेंसमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अद्वय हिरेंचं आव्हान असणार आहे.
- नांदगावमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून सुहास कांदे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश धात्रकांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- पाचोऱ्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर पाटील यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली सूर्यवशींचं आव्हान असेल.
- वैजापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे रणेश बोरणारे यांच्या विरोधात ठाकरेंचे दिनेश परदेशी मैदानात असतील.
- संभाजीनगर पश्चिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या राजू शिंदेंचं कडवं आव्हान असणार आहे.
- संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांच्याविरोधात ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी निवडणुकीच्या रिंगणात असतील.
- सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरेश बनकर हे मैदानात आहेत.
- राधानगरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून के.पी पाटील आमनेसामने असणार आहेत.
- पाटणमधून शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाईंना ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम टक्करे देणार आहेत.
- सांगोल्यातून शहाजी बापू पाटलांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून दीपक आबा साळुंखे मैदानात असतील.
- परांडामधून शिंदेंच्या शिवसेनेकडून तानाजी सावंत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहुल पाटील मैदानात आहेत.
- कळमनुरी मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून संतोष बागर यांना उमेदवारी, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉ. संतोष टाळफेंना निवडणुकीच्या रिंगणात असतील.
- रामटेकमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या आशिष जयस्वालांसमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या विशाल बरबटेंचं आव्हान असणार आहे
- मेहकरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय पायमुलकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे सिद्धार्थ खरात हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
- राज्यातील एकूण 27 जागांवर शिंदेंच्या आणि ठाकरेंचे उमेदवार आमनेसामने आहेत. त्यामुळे 23 तारखेला जनता कोणाला कौल देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.