ना मुख्यमंत्रीपद, ना नेता निवडीचा फैसला; भाजपमध्ये नेमकं काय घडतंय?; दिल्लीत काय निर्णय होणार?
विधानसभा निवडणुकीत भाजपने अजूनही पत्ते उघडलेले नाहीत. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपचं अद्यापही काहीच ठरताना दिसत नाही. मित्रपक्षांनी बैठक घेत गटनेता निवडीचा निर्णय घेतला. पण भाजपमध्ये खूप संथ गतीने हालचाली घडताना दिसत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागांवर यश आलं. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीला 230 जागांवर यश आल्याने महायुतीचं राज्यात सरकार बनणार हे स्पष्ट झालं आहे. असं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबतचा फैसला अद्याप घेण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे महायुतीमधील दोन घटकपक्षांमध्ये विधानसभेच्या निकालानंतर वेगवेगवान घडामोडी घडल्या. पण भाजपच्या गोटात फार काही विशेष हालचाली होताना दिसत नाहीयत. विधानसभा निवडणुकीत 57 जागांवर विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडल्या.
एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या सर्व आमदारांसह काल मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आला. यापैकी एकनाथ शिंदे यांना सर्वानुमते गटनेता बनवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातही काल मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांची पक्षाचा गटनेता म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. पण भाजपमध्ये तशा काहीच घटना घडल्या नाहीत.
भाजपमध्ये सध्या काय सुरु?
विधानसभा निवडणुकीत भाजपने अजूनही पत्ते उघडलेले नाहीत. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपचं अद्यापही काहीच ठरताना दिसत नाही. मित्रपक्षांनी बैठक घेत नेता निवडीचा निर्णय घेतला. पण भाजपने तब्बल 132 जागा जिंकूनही गटनेता निवडीचा निर्णय घेतला नाही. तसेच मुख्यमंत्री कोण बनेल? याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महायुतीचा आगामी मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
फडणवीस दिल्लीला रवाना, रात्री मोठ्या हालचालींचे संकेत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत एका खासगी कार्यक्रमासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील दिल्लीला या कार्यक्रमात जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमानंतर रात्री साडेदहा वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाचा देखील निर्णय होणार असल्याची माहिती आहे. याबाबत आज निर्णय झाल्यास उद्या नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.