महिला शेतकऱ्याला विवस्त्र होईपर्यंत मारहाण, धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या खाजगी सिक्युरिटीची दादागिरी
धाराशिव च्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे हा प्रकार घडला. मुलाला कामावरून का काढले म्हणून विचारण्यासाठी आणि शेतातील नुकसानीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्याला पवनचक्कीच्या खाजगी सेक्युरिटीने बेदम मारहाण केली.

मुलाला कामावरून का काढलं याचा जाब विचारण्यासाठी आणि शेतीतील नुकसानीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्याला पवनचक्कीच्या खाजगी सेक्युरिटीने बेदम मारहाण केल्याची अमानुष घटना धाराशिवजवळ घडली आहे. त्या महिला शेतकऱ्यासह तिच्या मुलाला एवढी मारहाण केली की त्यांचे कपडे फाटले. विवस्त्र होईपर्यंत करण्यात आलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे तुळजापूर तालुक्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून तो पाहणाऱ्यांचे रक्त अक्षरश: उसळलं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणानंतर पीडित महिला तक्रार करण्यास पोलिसांत गेली असता पोलिसांनी त्यांची तक्रारही नोंदवून घेतली नाही. उलट त्या पोलिसांनी नळदुर्गच्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिली. या संपूर्ण घटनेमुळे संतापाच वातावरण असून मारहाण करणाऱ्या सेक्युरिटीच्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
काय आहे प्रकरण ?
धाराशिव च्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे हा प्रकार घडला. मुलाला कामावरून का काढले म्हणून विचारण्यासाठी आणि शेतातील नुकसानीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्याला पवनचक्कीच्या खाजगी सेक्युरिटीने बेदम मारहाण केली. महिला शेतकऱ्यासह तिच्या मुलाला विवस्त्र होईपर्यंत केलेल्या मारहाणीमुळे तुळजापूर तालुक्यामध्ये संताप व्यक्त होतोय. मात्र पोलीसांनी या प्रकरणाची साधी तक्रार ही घेतली नसल्याने गंधोरा गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत.
महिलेला केलेल्या मारहाणीमुळे पवनचक्की कंपनीच्या खाजगी सेक्युरिटी वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गंधोरा येथील ग्रामस्थांनी केलीय. मात्र मारहाण करून 24 तास उलटून गेले तरीही पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेतली नाही. याउलट शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याची धमकी नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाने दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मारहाणीमध्ये जखमी झालेले शेतकरी सुनिता दिगंबर सोनटक्के, पांडुरंग सोनटक्के, सहदेव सोनटक्के या तिघांवर नळदुर्गच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळजापूर तालुक्यामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यावर पवनचक्कीच्या गुंडाकडून हल्ले करण्यात आले आहेत. आता महिला शेतकऱ्याला विवस्त्र होईपर्यंत मारहाण झाली तरी पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत असा प्रश्न या परिसरातील ग्रामस्थ विचारात आहेत. मारहाणीचे व्हिडिओ समोर असतानाही या संपूर्ण प्रकरणामध्ये आमची काही चूक नसल्याचा दावा पवनचक्की कंपनीच्या सिक्युरिटी इन्चार्जने केला आहे.