LIVE : मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने
सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी तसेच पूरग्रस्तांच्या भेटीगाठी घेऊन दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक घेतील.
सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी हरभट रोड परिसरात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं . भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन मदतीची मागणी केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन फाडल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर शिवसैनिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन भाजपविरोधात घोषणा दिल्या.
मुख्यमंत्र्यांचा ताफा आल्यानंतर भाजप नेत्यांनी घोषणाबाजी केल्या. मुख्यमंत्री गर्दीतून निवेदन स्वीकारत होते, त्यावेळी घोषणाबाजी वाढली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे गेला. जवळपास 15 मिनिटे गदारोळ झाला. भाजप कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले. मुख्यमंत्र्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही, लांबून स्वीकारत होते, असा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा
सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. तसेच पूरग्रस्तांच्या भेटीगाठी घेऊन दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक घेतील.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भिलवडी या गावातील नागरिकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
यातून मार्ग काढणारच, किती नागरिकांना मदत करावी लागेल याची माहिती घेत आहो, आपल्याला कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल, काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे माझं वचन आहे, पण कटू निर्णयालाही साथ द्यावी लागेल अन्यथा २००५, २०१९ आणि २०२१ अशी पुरांची मालिका सुरु राहायची, दरवर्षी नुकसान आणि मदत हे चक्र भेदावं लागेल. कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल.
संकट आल्यानंतर पॅकेज जाहीर करतात, पण ते पॅकेज जातं कुठं माहिती नाही. मी प्रामाणिकपणे मदत करणार आहे. हे सरकार तुमचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करु नका. सगळ्या प्रशासनाकडून आढावा आला आहे., जे जे करणे सत्य आहे, ते ते केल्याशिवाय राहणार नाही.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील अंखलखोप या गावात जाऊनही संवाद साधला.
मुख्यमंत्री काय म्हणाले
तुमच्यावर जी आपत्ती ओढावली आहे, त्यातून तुम्हाला उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यातून तुम्हाला बाहेर काढेन पण समोर जी गर्दी केली आहे, ती काळजीची आहे. कोरोनाचं संकट टळलेलं नाही. तुमच्या व्यथा आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्याची काळजी करु नका, बाहेर फिरताना मास्क घाला, अंतर पाळा, पावसाळी आजार पसरत आहेत. आपण आरोग्य कॅम्प लावत आहोत.
पावसाने प्रचंड नुकसान झालं आहे. घरं, संसार वाहून गेले आहेत. घरादारात चिखलाचं साम्राज्य आहे. केवळ नुकसानभरपाई उपयोगाची नाही, कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल. त्यासाठी तुमचं सहकार्य लागेल. हे सरकार तुमचं आहे. तुमचा आशिर्वाद महत्त्वाचा आहे. गर्दी करु नका, मास्क वापरा
कसा आहे उद्धव ठाकरे यांचा दौरा
सकाळी सव्वा दहा वाजता पलूस येथे कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. सांगलीच्या पलुस तालुक्यातील भिलवडी भागातून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. पुरामुळे बाधित भागाची पाहणी करुन मुख्यमंत्री पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पलुस तालुक्यातील अंकलखोप येथे पुरामुळे बाधित झालेल्या भागाची ते पाहणी करतील. त्यानंतर मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज या भागात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री करतील.
ग्रामीण भागातील पाहणीनंतर सांगलीच्या आयर्विन पुलाची पाहणी, तसेच हरभट रोड येथे पुरामुळे बाधित भागाची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक आणि पत्रकार परिषद असा आज सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण दौरा आहे. दोन वाजता कवलापूर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
उद्धव ठाकरेंसोबत दौऱ्यावर कोणकोण
दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण अण्णा लाड, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेना संपर्क नेते नितीन बानगुडे पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, मिलिंद नार्वेकर ही उपस्थित राहणार आहेत.
इतर बातम्या:
कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना