शिधापत्रिकाधारकांना सरकारचं दिवाळी पॅकेज; अवघ्या 100 रुपयात मिळणार ‘या’ चार वस्तू
राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. शिंदे-फडणवीस सरकारने (maharashtra government ) राज्यातील दिवाळी (diwali) गोड जावी म्हणून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना (ration gift) शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या पॅकेजमध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती 1 किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
या शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
दरम्यान, नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला गती देण्यासाठी सुधारित 9279 कोटींच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रकल्पाचा मूळ मंजूर खर्च 8680 कोटी इतका असून त्यात 599 कोटी 6 लाख रुपये इतकी वाढ झाली आहे.
नागपूर मेट्रो रेल टप्पा 1-प्रकल्पामध्ये ऑटोमोटीव्ह चौक ते मिहान मार्गिका क्र.1 व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर ही मार्गिका क्र.2 अशा एकूण 38.215 कि.मी. लांबीच्या दोन मार्गिकांचा व 38 स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पास 2014 मध्ये मंजूरी देण्यात आली होती. प्रकल्पाचा मूळ नियोजित बांधकाम कालावधी एप्रिल, 2013 ते एप्रिल, 2018 असा 5 वर्षांचा होता. प्रत्यक्षात जून, 2015 मध्ये कामास सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या एकूण 38.215 कि.मी. लांबीपैकी 26 कि.मी. वर मेट्रो सुरू आहे. प्रकल्पाची उर्वरीत 12 कि.मी. मार्गिका लवकरच कार्यान्वित होणार आहे.
प्रकल्पाच्या बांधकामास झालेला विलंब, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या क्षेत्रात तसेच किंमतीत झालेली वाढ, दोन अतिरिक्त मेट्रो स्थानकांची उभारणी, मंजूर बाह्य कर्ज अनुदानीत कॉन्ट्रॅक्ट पॅकेजेसच्या किंमतीमध्ये झालेली वाढ इत्यादी कारणांमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे.